Agriculture Management Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Economic : विक्री व्यवस्थेतील बदलच तारेल शेतीला

Indian Agriculture : शेतीतून आर्थिक प्राप्ती झाली तरच पुढील पिढी शेती व्यवसाय चांगल्या मानसिकतेतून करेल. दोन पिढ्यांमधील हा प्रवास अत्यंत संवेदनशील वळणावर येऊन थांबलेला आहे. यासाठी गरज आहे परिवर्तनाची आणि हे परिवर्तन होऊ शकते विक्री व्यवस्थेतील मोठ्या बदलांमुळेच!

डॉ. भास्कर गायकवाड

डॉ. भास्कर गायकवाड

Agriculture Economic Management : कृषिक्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे. ग्राहकाभिमुख उत्पादनावर भर देणे ही काळाची गरज आहे. हरितक्रांती झाली त्या वेळी परिस्थिती वेगळी होती. त्या काळात पिकविण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. पिकविलेले विकण्याची काळजी नव्हती. आज पिकविलेले विकण्यासाठी मोठी धडपड करावी लागते.

त्या काळात अन्नधान्य स्वावलंबन हा प्रश्‍न होता. आज अन्नधान्य स्वावलंबन झाले परंतु शेतकरी परावलंबी होऊ लागलेला आहे.शेतीमधील उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. खते, कीडनाशके, मशागती, मजूर, वीज, पाणी, वाहतूक या सर्व बाबींच्या किमती भरमसाट वाढून गगनाला टेकलेल्या असताना शेतीमालाचे दर मात्र जमिनीवरच रेंगाळत आहेत.

शेती ही अनेकदृष्ट्या किफायतशीर राहिलेली नाही. जमीनधारणा कमी होत आहे. हवामान चक्रात बदल होऊन थंडी, उन्हाळा, पावसाळा यांच्यातील वैविध्यता आणि अनिश्‍चितता वाढत चालली आहे.

त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम शेतीवर होत आहे. पिकाचे नुकसान झाले तर जेवढे नुकसान झाले त्या प्रमाणात भरपाई देण्यासाठी विमा कंपन्या पुढे येण्यास तयार नाहीत. तयार झाल्या तर त्यासाठी द्यावी लागणारी रक्कम शेतकऱ्‍यांच्या आवाक्याबाहेरची आहे.

या सर्वांवर मात करून जास्त उत्पादन काढले तर उत्पादन वाढले म्हणून भाव कोसळतात. त्यामुळे शेती तोट्यात जाते. शेतकरी कर्जबाजारी होतो. उत्पादन घटले तर मध्यस्थ-विक्रीव्यवस्था नफेखोरी करतात. शेतकऱ्‍यांना त्याचा लाभ होत नाही. ग्राहकांना शेतीमाल जास्त दराने द्यावा लागला म्हणजे त्यांची नाराजी वाढते.

शासन तत्काळ कार्यवाही करून आयात वाढविते किंवा निर्यातीवर बंधन आणते. शेतीमालाचे दर पडतात. परत शेतकरी त्या पिकापासून दूर जातो. एखाद्या पिकाचे उत्पादन वाढले आणि भाव पडले तर शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की तुम्हाला दुसरे पीक करता आले नाही काय? एकाच पिकाच्या मागे का लागतात.

शेतकऱ्‍यांनी कोणते पीक करावे म्हणजे त्याला हमखास भाव मिळेल, त्याची शेती तोट्यात जाणार नाही, अशी खात्री देणारी यंत्रणा सध्या तरी अस्तित्वात नसताना त्यांना सांगितले जाते, की मार्केटचा आणि ग्राहकांच्या मागणीचा अभ्यास करून पिकाचे नियोजन केले पाहिजे. ग्राहकांची खाण्याची सवय बदलत आहे.

त्यानुसार त्याची मागणी बदलत आहे. याचा विचार उत्पादक म्हणून शेतकऱ्‍यांना करावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणाला तोंड द्यावे लागते. कृषी निविष्ठांची वाढलेली किंमत गुपचूप मोजावी लागते. मजूर मागेल तेवढे मोल द्यावे लागते. समाजात कमी दर्जाचे काम म्हणजे शेती अशी सामाजिक मानसिकता ठेवून शेतीमध्ये शारीरिक कष्ट करावे लागते. काही करता आले नाही म्हणून शेती करतो अशी हेटाळणी ऐकावी लागते.

या मानसिकतेमुळेही युवा पिढी या व्यवसायापासून दूर जाण्याचाच प्रयत्न करते. तंत्रज्ञान आत्मसात करून पिकाचे उत्पादन काढून बाजारपेठेपर्यंत पोहोचवावे लागते. एवढे करून त्याच्या मालाची नासाडी, हेटाळणी सहन करावी लागते. अनेकदा तर मानसिक त्रास आणि अपमान सहन करून अडते- व्यापारी ठरवतील त्या किमतीत शेतीमाल द्यावा लागतो.

मग ती किंमत त्याच्या उत्पादन खर्चाचा काहीही विचार न करता ठरविलेली कवडीमोल असेल तरी ती स्वीकारावी लागते. शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या शेतीमालाचे दर त्याच्यासमोर दोन पट-तीन पट होतात. त्यावेळी त्याला काय वाटत असेल याचा विचार होत नाही. सहा महिने- वर्षभर कष्ट करून जेवढे मिळत नाही त्यापेक्षा जास्त एक-दोन तासांत मध्यस्थ घेतात.

शेतकरी आत्महत्या करतो. अनेक प्रसार माध्यमातून त्यावर चर्चा होते. आजची तरुण पिढी हे पाहते. शिक्षण करूनही नोकरी मिळत नाही म्हणून शेती करावी लागते. तरुण मुलगा शेती करतो म्हणून समाजात चर्चा होते. घरातही इतर भावंडांबरोबर तुलना होते. लग्नाच्या बोहल्यावर उभे राहिल्यावर कमी भाव आणि मुलींचा तुटवडा हे ठरलेले.

अशा नकारात्मक मानसिकतेमध्येही युवा पिढी नवनवीन प्रयोग करून अशाश्‍वत व्यवसायातून शाश्‍वत उत्पादन काढून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करते आणि इतरांच्या तोंडापर्यंत अन्न घेऊन जाते. याची जाणीव समाजाला ठेवावी लागेल. निसर्गात होणारे बदल, जमीन-पाणी यांसारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा तुटवडा, वाढलेला उत्पादन खर्च या सर्व बाबींचा विचार केला तर शेती किफायतशीर होणे अवघड वाटते. त्यामुळे विक्री व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे.

उत्पादन तंत्रज्ञानाबरोबरच विक्री व्यवस्थेमधील तंत्रज्ञानाचा अवलंब वाढणे गरजेचे आहे. शेतीतून आर्थिक प्राप्ती झाली आणि त्याला योग्य मानसन्मान मिळाला तरच पुढील पिढी शेती व्यवसाय चांगल्या मानसिकतेतून करेल. दोन पिढ्यांमधील हा प्रवास अत्यंत संवेदनशील वळणावर येऊन वेग कमी झालेला, किंबहुना काही ठिकाणी थांबलेला आहे.

यासाठी गरज आहे परिवर्तनाची आणि हे परिवर्तन होऊ शकते विक्री व्यवस्थेतील मोठ्या बदलांमुळे! दुसऱ्‍या हरितक्रांतीचे बीज या व्यवस्थेतील बदलामध्येच दडलेले आहे. त्याला योग्य खत-पाणी देऊन, चांगला सांभाळ करून जपले तर निश्‍चितच शेतकरी यातून पुढे जाईल.

देशाच्या एकूण विकासाचा दर १० अंकी, किंबहुना त्यामध्ये वाढ करण्याची क्षमता कृषिप्रधान देशातील शेतकऱ्‍यांमध्ये आहे आणि त्यासाठी कमीत कमी चार ते पाच टक्के कृषी विकासाचा दर गाठणे हेच उद्दिष्ट घेऊन यापुढील उपाययोजना कराव्या लागतील. रिटेल क्षेत्राची गुंतवणूक वाढल्यानंतर पणन व्यवस्थेमध्ये मोठे बदल होणे अपेक्षित आहेत.

आज आपण शेतात जे पिकवितो ते विकण्यासाठी प्रयत्न करतो. विकत नसेल तर जे मिळते ते पदरात पाडून घेऊन समाधान मानतो. परंतु रिटेल क्षेत्रात सहभागी होत असताना पिकविलेले विकण्याऐवजी विकणारे पिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण रिटेल क्षेत्रात उतरणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने ग्राहक हा त्यांचा केंद्रबिंदू असणार आहे.

त्यांच्या खिशातून पैसे काढत असताना त्यांना जी वस्तू ज्या स्वरूपात आणि ज्या वेळी पाहिजे त्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर कंपन्या त्यांचे लक्ष केंद्रित करतील. शेतकरी हा या कंपन्यांचा पुरवठादार असेल. त्यामुळे पुरवठादारांकडून त्या प्रकारची वस्तू तयार करून पुरवठा करण्यासाठी सूचना देतील.

जे शेतकरी तसा शेतीमाल तयार करून देतील त्यांना या कंपन्या चांगली रक्कम मोजायला तयार होतील. कारण ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन मिळत असेल, तर कंपनीला निश्‍चितच त्यांचा व्यवसाय वाढविता येईल. म्हणूनच शेतकऱ्‍यांना मानसिकता बदलावी लागेल.

बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतीमाल तयार करावा लागेल. शेतीमाल मोंढा लावणे, कमी प्रतीचा माल मिसळणे, शेतीमाल हाताळताना योग्य काळजी न घेणे, शेतीमाल स्वच्छ न करणे, निवड न करता मार्केटमध्ये पाठविणे यासारख्या सवयींना यापुढे मूठमाती द्यावी लागेल. आपला शेतीमाल हा जगातील कोणताही भाग असो मग तो प्रगत देश किंवा अप्रगत, तेथे कोणत्याही परीक्षेत पास झाला पाहिजे. याप्रमाणे उत्पादन घेण्याची मानसिकता ठेवावी लागेल. त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल.


(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT