Mango Orchard  Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Orchard Management : नवीन अतिघन आंबा बागेत घ्यावयाची काळजी

Mango Farming : या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस बऱ्यापैकी झाला असून, पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल नवीन आंबा लागवडीकडे वाढला आहे.

Team Agrowon

डाॅ. भगवानराव कापसे

Mango Farming Management : या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस बऱ्यापैकी झाला असून, पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल नवीन आंबा लागवडीकडे वाढला आहे. विविध प्रशिक्षण कार्यक्रमामध्य अतिघन आंबा लागवडीविषयी माहिती मिळाल्याने त्या विषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता दिसते. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या आंबा लागवडी अद्यापही अनेक ठिकाणी सुरू आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत नवीन लागवडी होतील, अशी अपेक्षा आहे. आंबा हे पीक बहुवर्षायू असून, लागवडीनंतर ३० ते ४० वर्षे उत्पादन देत राहते. बाग दीर्घकाळ उत्पादनक्षम राहण्यासाठी लागवडीआधीच संपूर्ण शास्त्रीय पद्धतीने लागवडीचे नियोजन करावे. नवीन बागेमध्ये पुढील प्रमाणे काळजी घेतल्यास फायदा होतो.

नवीन लागवड केलेल्या कलमाच्या दोन्ही बाजूंनी दोन चांगल्या काठ्या रोवून त्यास दोन ठिकाणी आडव्या छोट्या काठ्या बांधाव्यात. म्हणजे शिडीसारख्या रचना तयार होईल. या आधाराला दोन ठिकाणी कलम सैलसर बांधून घ्यावे.

बागेचे भटकी जनावरे, रानडुकरांसारखे वन्यप्राणी यांच्यापासून संरक्षण करावे. अलीकडे वेगवेगळ्या प्रकारची आधुनिक कुंपणे (फेन्सिंग) उपलब्ध होत आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांचा वापर करावा. हे कुंपण सहा फूट उंचीपर्यंत केल्यास वानरेसुद्धा आत येऊ शकत नाहीत.

कलमांची खतांची साधारण गरज तक्ता १ मध्ये दिली आहे. तर या गरजेनुसार तक्ता २ मध्ये दर्शविल्याप्रमाणे ठिबकद्वारे खतांचे नियोजन करावे. घन स्वरूपातील खते देणार असाल, जमिनीमध्ये ओलावा असताना ती व्यवस्थित मातीआड करून द्यावीत.

बागेमध्ये कमी उंचीचे आंतरपीक घ्यावे. खरीप, रब्बी आणि उन्हाळी आंतरपिकांची पीक पद्धती ठरवताना मातीची सुपीकता जपली जाईल, यांचाही विचार करावा. पावसाळी किंवा हिवाळी आंतरपीक घेतले न घेतले तरी चालू शकते. पण उन्हाळ्यामध्ये (एप्रिल - मे महिन्यामध्ये) आपल्या शेतात कमी उंचीचे आंतरपीक घेण्याचा प्रयत्न करावा. कारण त्यामुळे बागेत आंबा झाडांच्या मुळांच्या परिसरात सावली, गारवा राहून, एकूण तापमान कमी राहते. हवेतील आर्द्रता वाढून आंबा झाडांच्या जोमदार वाढीसाठी हमखास फायदा होतो.

कलमामध्ये आंतरपीक घेतलेले असल्यास, आंतरपिकामध्ये आंतरमशागत करताना आंबा झाडांना इजा होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.

नवीन लागवड असलेल्या झाडांचे हुमणी किंवा वाळवी यांचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होते. या किडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी सप्टेंबर -ऑक्टोबर या काळात झाडाच्या मुळाच्या परिघामध्ये क्लोरपायरिफॉस ३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे आळवणी करावी.

Chart

नवीन लागवड केलेल्या बागेत शक्यतो नवीन चांगली नवती येऊन झाडे चांगली मुळे धरेपर्यंत छाटणी शक्यतो टाळावी. मात्र ज्या बागांची लागवड जून, जुलैमध्येच झाली आणि आता चांगली पालवी आलेली आहे, अशा कलमांना दीड फुटावर शेंडा मारून घ्यावा. त्यावर तीन फांद्या ठेवाव्यात. त्या तीन फांद्या पुन्हा ३० ते ४० सेंटिमीटर वाढल्यानंतर त्यांचेही शेंडे मारून घ्यावेत. त्यावर प्रत्येकी दोन ते तीन फांद्या ठेवाव्यात. अशाप्रकारे झाडाचा तीन वर्षापर्यंत एकावर तीन, तिनावर ९, आणि नऊ फांद्यावर २७ अशा प्रकारचा झाडाचा सांगाडा तयार करून घ्यावा. मात्र नवीन लागवड उशिरा (आता) झालेली असल्यास पालवीचे प्रमाण पाहून त्याची छाटणी फेब्रुवारीमध्ये करता येईल. वर्षात प्रत्येक हंगामाच्या शेवटी (म्हणजे उन्हाळ्याच्या शेवटी जूनमध्ये आणि पावसाळ्याच्या शेवटी सप्टेंबरमध्ये, तसेच हिवाळ्याच्या शेवटी फेब्रुवारीमध्ये) छाटणी करण्याची योग्य वेळ असते. त्यातून आपल्या झाडांचा सांगाडा व्यवस्थित तयार करून घ्यावा.

पावसाळा संपताच बागेला पॉलिथिनचे किंवा उसाचे पाचट, वाळलेले गवत यांचे आच्छादन करावे. आच्छादनाखाली वाळवी लागणार नाही, याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे केलेले आच्छादन उन्हाळाभर राहिल्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला एक- दोन पावसातच कुजू लागते. पुढे त्याचे चांगले खत तयार होते. ते कल्टीवेटरच्या साह्याने जमिनीत मिसळून द्यावे. अलीकडे फळबागांमध्येही प्लॅस्टिक मल्चिंगचे प्रमाण वाढत आहे. मात्र हे करण्यापूर्वी त्याखालीही उसाचे पाचट, वाळलेले गवत किंवा अन्य पिकांचे अवशेष टाकून घ्यावेत. त्यामुळे प्लॅस्टिक तापून मुळांच्या परिसरातील तापमान वाढण्याचा धोका कमी होईल. अशा कोणत्याही आच्छादनामुळे पाण्याची बचत होते, तण वाढीला प्रतिबंध होतो आणि मुळांच्या परिघात योग्य तापमान राहिल्यामुळे पांढरी मुळे कार्यक्षम राहतात.

Chart

बागेत विशेषतः झाडाच्या भोवती कुठल्याही प्रकारचे तण राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

बागेत सप्टेंबरमध्ये नवती येण्यास सुरुवात होते. अशा नवीन पालवीवर पान खाणारी अळी, रस शोषक कीडी, शेंडेअळी, करपा रोग आणि माॅलफॉर्मेशनसारख्या दुर्धर रोगापासून काळजीपूर्वक संरक्षण करावे.

नवीन बागेमध्ये शक्यतो ठिबक सिंचन करण्याचा प्रयत्न असावा. प्रत्येक झाडाच्या दोन्ही बाजूंनी नऊ इंचावर दोन ड्रीपर येतील असे नियोजन असावे. हे दोन्ही ड्रीपर व्यवस्थित चालू असल्याची बागेच्या निरीक्षणादरम्यान खात्री करत राहावी. कारण अनेकदा लॅटरल किंवा ड्रीपर चोकअप होतात किंवा गळती होऊन पाणी साचते. या दोन्ही बाबी नव्या झाडांसाठी हानिकारक ठरू शकतात.

अशाप्रकारे अतिघन लागवडीच्या बागेमध्ये व्यवस्थापन केल्यास तिसऱ्या वर्षापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होईल. शास्त्रशुद्ध व्यवस्थापनातून तिसऱ्या वर्षी दोन टनांपेक्षा जास्त उत्पादन नक्कीच प्राप्त होऊ शकते.

डाॅ. भगवानराव कापसे, ९४२२२९३४१९

(लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT