Maharashtra Election 2024  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Increased Voter Turnout : गुरुवारी निवडणूक आयोगाने ६५.११ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले होते. मात्र शुक्रवारी दुपारी ६६.०५ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (ता. २३) दुपारपर्यंत स्पष्ट होणार असला, तरी सत्तेवर स्वार होण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने लहान पक्ष, बंडखोर उमेदवार आणि अपक्षांच्या नाकदुऱ्या काढण्यास शुक्रवारी सुरुवात केली.

दरम्यान, गुरुवारी निवडणूक आयोगाने ६५.११ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले होते. मात्र शुक्रवारी दुपारी ६६.०५ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत ६५.२१ टक्के महिलांनी मतदान केले आहे.

राज्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महाविकास आणि महायुतीचे प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या नेत्यांनी आतापासूनच सत्तेची चावी आपल्याजवळ ठेवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आपल्या पक्षाच्या आमदारांना एकत्र ठेवण्याबरोबरच अपक्ष आमदारांना तातडीने सोबत घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

काँगेसने विदर्भ आणि मराठवाड्यातील आमदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. विभागनिहाय आमदारांची जबाबदारी काही नेत्यांवर सोपविली आहे. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्यासह प्रमुख नेते तयारीला लागले आहेत. तर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी अपक्षांशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून श्रीकांत जोशी, उद्योगमंत्री उदय सामंत, बालाजी खतगावकर आणि सचिन जोशी यांनी यंत्रणा कार्यन्वित केल्याचे समजते. तर भाजपचे नेते रावसाहेब दाववे, केंद्रीय मंत्री आश्‍विनी वैष्णव, भूपेंद्र यादव यांच्यावर संपर्काची आणि अन्य जबाबदारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने संजय राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.

उच्चांकी मतदानाचा नेमका कुणाला फायदा होईल यांचे अंदाज बांधत सर्वपक्षीय नेत्यांनी सत्तेचा दावा केला असला तरी काठावरच्या बहुमताची चाहूल लागल्याने संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी अवघ्या तीन दिवसांचा कालवाधी असल्याने कमी वेळात वेगाने घडामोडी घडत आहेत.


विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (ता. २३) लागणार आहे. सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणी सुरू होणार आहे. त्यानंतर साडेआठच्या सुमारास ईव्हीएम मशिनवरील मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे दुपारपर्यंत कल स्पष्ट होऊन निकाल स्पष्ट होईल. त्यानंतर घडामोडींना वेग येणार आहे.

मतांचा टक्का वाढला

या निवडणुकीत नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांपैकी ६ कोटी ४० लाख ८८ हजार, १९५ मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री ६५.११ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी दुपारी ६६.०५ टक्के मतदानाची आकडेवारी जाहीर केली.

या निवडणुकीत ४ कोटी ६९ लाख ९६ हजार ५७९ महिलांपैकी ३ कोटी, ६४ लाख, ९ हजार ३१८ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महायुती सरकारची संपूर्ण मदार ही ‘लाडकी बहीण’ योजनेवर होती. त्यामुळे महिलांचा कल कोणाच्या बाजूने जाणार यावर सत्तेचे गणित जुळू शकते असा अंदाज बांधला जात असला तरीही महायुतीच्या नेत्यांनी बंडखोर उमेदवारांसह अपक्ष आणि घटकपक्षांना संपर्क करण्यास सुरुवात केली आहे.

लहान पक्षांचा सत्तेकडे कल

वंचित बहुजन आघाडीने आपण सत्तेसोबत राहू, असे सांगितले आहे. जर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ, असे समाज माध्यमांवरून जाहीर केले आहे.

तर तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडू यांनी आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. आमचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केला आहे. तर रासपच्या महादेव जानकर यांनी आमचा विचारसरणीशी काहीही संबंध नाही. आम्ही सत्तेत जाऊ, असे सांगून सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले.

दोन्ही गटांकडून बी प्लॅन तयार

या निवडणुकीत तब्बल २०८६ अपक्ष उमेदवार उभे आहेत. यात बंडखोरांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे सहा पक्ष आणि अपक्ष अशी विखुरलेली ही निवडणूक लक्षवेधी ठरली. अपक्षांना लॉटरी लागण्याचे अंदाज असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पायघड्या घालून बी प्लॅन तयार ठेवला आहे.

स्पष्ट बहुमत न मिळाल्यास अपक्षांची मदत घेण्यासाठी नाकदुऱ्या काढल्या जात आहेत. बच्चू कडू, महादेव जानकर, हितेंद्र ठाकूर या प्रमुख नेत्यांसह बंडू बच्छाव, समीर भुजबळ, वामनराव चपट, गीता जैन, शिवाजी पाटील, धर्मराज काडादी, हीना गावित यांच्यासह अन्य अपक्ष नेत्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT