Mumbai News : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहिली. रात्री साडेअकरा वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर राज्यात गेल्या २९ वर्षांत प्रथमच उच्चांकी ६५.११ टक्के मतदान झाल्याने वाढलेला टक्का नेमका कुणाच्या पथ्यावर पडणार आणि कुणाचा पत्ता कापणार याची धाकधूक वाढली आहे.
दरम्यान मागील निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते. या वेळी वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याची खलबते सुरू झाली आहेत. १९९५ मध्ये काँग्रेसचे सरकार पडल्यानंतर युती सरकार सत्तेत आले. त्या वेळी तब्बल ७१.३९ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या वेळी वाढलेला टक्का सत्तांतर घडविणार की राज्यभर वापरण्यात आलेल्या मनी, मसल पॉवरच्या जोरावर सत्ता राखणार हे शनिवारी (ता. २३) स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, निवडणूक संपताच वर्तवण्यात आलेल्या अंदाजामध्ये अपवाद वगळता सर्वांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. तरीही काठावरचे बहुमत मिळणार असून अपक्षांना पायघड्या घालाव्या लागतील, असे अंदाज आहेत. राज्यातील सहा प्रमुख पक्षांसह तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य लहान मोठ्या पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवले.
तसेच राज्यातील २८८ पैकी निम्म्या मतदार संघांत अटीतटीची लढत झाली आहे. लोकसभा निवडणुकीत विजेत्या आणि पराभूत उमेदवारांच्या मतांचा फरक काही हजार किंवा लाखात असे. मागील निवडणुकीत मात्र, शेकड्यात मताधिक्य आल्याने विधानसभा निवडणुकीतही तोच ट्रेंड राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बुधवारी सकाळी सातला मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सायंकाळी सहापर्यंत जे मतदार आवारात आले, त्यांचे मतदान घेण्यात आले. राज्यात रात्री साडेअकरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. साडेअकरा वाजता निवडणूक आयोगाने एकत्रित आकडेवारी जाहीर केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६.२५ टक्के मतदानाची नोंद झाली.
या जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, प्रकाश आबिटकर, राहुल आवाडे, विनय कोरे या दिग्गज उमेदवारांच्या मतदार संघांत चुरशीने मतदान झाल्याने टक्केवारी वाढली आहे. राज्यातील सर्वांत कमी मतदान नागपूर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या मतदार संघांत झाले. तर कोल्हापूर, गडचिरोली, जालना, सांगली, अहिल्यानगर, सातारा, चंद्रपूर, हिंगोलीसह अन्य जिल्ह्यांमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीने आक्रमक प्रचार केल्यामुळे राज्यातील प्रचारात रंगत आली होती. भाजपकडून ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा देत हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणला. शिंदे गटाने लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांच्या माध्यमातून दिलेले लाभ आणि हिंदुत्वाचा मुद्दा तापवला.
तर महाविकास आघाडीने पक्षफूट, शेतीमालाचे भाव आणि स्थानिक मुद्द्यांवर भर देत महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अखेरच्या टप्प्यात उमेदवारांना जिंकून देण्यापेक्षा फुटीर आमदारांना पाडा, असा संदेश जाहीर सभांमधून देत फुटीर आमदारांना टार्गेट केले. उद्धव ठाकरे यांनीही आक्रमकपणे पक्षफुटीवर प्रहार करत भावनिक वातावरण तयार केले.
भाजपची घसरण
२०१४ मध्ये ६३.३८ टक्के मतदान झाले होते. देशभरात पंतप्रधान मोदी यांची लाट होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपने तब्बल १२५ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेने ६३ तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहात झाली होती. २०१९ च्या निवडणुकीत ६१.४४ टक्के मतदान झाले होते. या वेळी भाजपच्या जागा कमी होऊन १०५ वर आल्या होत्या. या वेळी भाजप १४९ जागा लढवत असून भाजप हा सगळ्यात जास्त जागा जिंकणारा पक्ष असेल, या जागा ८० च्या दरम्यान असतील असा अंदाज एजन्सींनी व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणूक अंतिम मतदान (टक्के)
कोल्हापूर - ७६.२५
गडचिरोली - ७३.६८
जालना - ७२.३०
सांगली - ७१.८९
अहिल्यानगर - ७१.७३
सातारा - ७१.७१
चंद्रपूर- ७१.२७
हिंगोली - ७१.१०
परभणी - ७०.३८
बुलढाणा - ७०.३२
गोंदिया - ६९.५३
भंडारा - ६९.४२
नंदुरबार- ६९.१५
यवतमाळ - ६९.०२
छत्रपती संभाजीनगर - ६८.८९
वर्धा - ६८.३०
सिंधुदुर्ग - ६८.४०
बीड - ६७.७९
नाशिक - ६७.५७
सोलापूर - ६७.३६
रायगड - ६७.२३
लातूर - ६६.९२
वाशिम - ६६.०१
पालघर - ६५.९५
अमरावती - ६५.५७
रत्नागिरी - ६४.५५
अकोला - ६४.९८
धुळे - ६४.७०
नांदेड - ६४.९२
जळगाव - ६४.४२
धाराशिव - ६४.२७
पुणे - ६१.०५
नागपूर - ६०.४९
ठाणे - ५६.०५
मुंबई उपनगर - ५५.७७
मुंबई शहर - ५२.०७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.