Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : साखर उताऱ्यासाठी खत, पाणी व्यवस्थापनाचे नियोजन

Sugarcane Cultivation : माती परीक्षण आणि उतींचे परीक्षण करून रासायनिक खतांची मात्र पिकास देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण निर्माण झाला तर पानांची संख्या घटून साखर उत्पादन कमी होते, तसेच कांड्यांची संख्या व कांड्या आखूड होतात.

Team Agrowon

डॉ. गणेश पवार

Sugarcane Crop Management : शरद ऋतूतील ऊस लागण ही जुनीच, परंतु नावीन्यपूर्ण अशी संकल्पना आहे. उन्हाळ्यातील महिन्यामध्ये होणारे गाळप व घसरत जाणारा उतारा टाळण्यासाठी आणि ऑक्टोबरमध्ये (शक्य झाल्यास) गाळप हंगाम लवकर सुरू करण्यासाठी ही संकल्पना आहे.

त्या हेतूने अनुकूल अशा जातींची लागण ही शरद ऋतूमध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) करणे गरजेचे आहे. काही संशोधन प्रयोगाअंती असे दिसून आले आहे, की उत्पादन आणि उताऱ्यामध्ये घट न होता लवकर पक्वता गटातील ऊस जातींची लागण ही शरद ऋतूमध्ये करून ऑक्टोबरला तोडणी करता येऊ शकते.

पीक व्यवस्थापन

तीन मुख्य अन्नद्रव्यापैकी नत्र खत हे उसाच्या गुणवत्तेवर अतिशय परिणामकारक आहे. उशिरा व मोठ्या प्रमाणात (शिफारशीपेक्षा जास्त) दिलेल्या नत्र खतामुळे ऊस गुणवत्ता कमी होते.

उशिरा, जास्तीत दिलेल्या नत्र खतामुळे उसाची उभार वाढ अवस्था लांबते, पक्वतेस उशीर व उसाच्या उतीमधील ओलाव्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा उसात साखरेचे प्रमाण कमी होणे, रिड्युसिंग शुगर वाढणे, शुद्धता कमी होणे, रसामध्ये नत्राचे अधिक प्रमाण, उशिरा फुटवे येणे, त्यातून पाण फुटवे वाढणे अशा समस्या निर्माण होतात.

मुख्य अन्नघटक

संतुलित व योग्य वेळेतील अन्नद्रव्यांचा उपयोग हा पीक व्यवस्थापनातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. या सर्वांमुळे साखर उताऱ्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होतात. बहुतांश परिस्थितीमध्ये जेव्हा नत्र खतांची मात्रा ३०० किलो प्रति हेक्टरपेक्षा जास्त दिली असता उसाच्या रसाचे विविध गुणवत्ता मापदंड खालावण्यात होतो. काही भागांमध्ये यापेक्षा कमी नत्राची असलेली मात्रा सुद्धा धोकादायक ठरते.

माती परीक्षण आणि उतींचे परीक्षण करून रासायनिक खतांची मात्र पिकास देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. खत देण्याच्या योग्य वेळेबाबत वेगळ्या प्रयोगाअंती असे दिसून आले आहे, की सुरू पिकास (१२ महिने) खतांची मात्रा चार महिन्यानंतर दिली असता रसाची गुणवत्ता घसरते. परंतु आडसाली पिकास खत देण्याचे वेळ ही सहा महिन्यांपर्यंत उपयुक्त ठरते.

योग्य प्रमाणात स्फुरद खतांची मात्रा लागणीच्या वेळी देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे उसाला येणारे फुटवे एकावेळी येतात, ते समप्रमाणात वाढून त्यांचे गाळपायोग्य उसामध्ये रूपांतर होऊन चांगले उत्पादन व उतारा मिळू शकतो.

लागणीच्या वेळच्या (अर्ध्या मात्रेची) खतांची कमतरता ही बऱ्याच कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दिसून येते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. स्फुरदयुक्त खतांच्या योग्य वापरामुळे रसातील स्फुरदाचे प्रमाण वाढून गाळप प्रक्रियेला मदत होते. वेगवेगळ्या विकरांच्या अभिक्रियेसाठी पालाश हे अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चयापचय प्रक्रिया घडून येतात. साखरेचे वहन व संचय होण्यासाठी पालाशची गरज असते.

अवर्षण परिस्थितीत ऊस व्यवस्थापनामध्ये पालाश खतांची पानावर फवारणी केली असता उसाच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये ऊस पिकांमधून फायदा व चांगला उतारा मिळण्यासाठी या फवारणीचा उपयोग होऊ शकतो. वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी जस्त व बोरॉन हे उसातील रसाच्या दर्जावर परिणाम करतात.

ऊस उतारा आणि सिंचन

वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण निर्माण झाला तर पानांची संख्या घटून साखर उत्पादन कमी होते, तसेच कांड्यांची संख्या व कांड्या आखूड होतात. त्यामुळे एकूणच साखरेचा कांड्यातील संचय व साखर उतारा घटतो. त्यामुळे पाण्याचा ताण टाळण्यासाठी योग्य प्रमाणात सिंचनाची आवश्यकता महत्त्वाची ठरते.

जास्त प्रमाणातील पाणी हे सुद्धा पिकास हानिकारक आहे. कॅनॉल व नदीच्या भागातील जास्त प्रमाणातील सिंचनामुळे तसेच अयोग्य निचरा प्रणालीमुळे वाढ व दर्जावर परिणाम होतो.

पक्वता अवस्थेमध्ये अधिकतम साखर उताऱ्यासाठी संतुलित पाणी व्यवस्थापन ही अत्यंत कठीण बाब आहे. पक्वता अवस्थेमध्ये अगदी छोटासा ताण देणे

महत्त्वाचे आहे. पन्हाळीमधील ओलावा ७४ ते ७६ टक्के पर्यंत असावा लागतो, परंतु तो प्रत्यक्षरीत्या

तेवढा ठेवणे शक्य होत नाही. संतुलित सिंचन पाळ्या देऊन तो त्या टक्केवारीपर्यंत खाली आणणे शक्य आहे.

वालुकामय मृदेमध्ये सुरुवातीच्या वाढ अवस्थेमध्ये पाण्याच्या पाळ्या ८ ते १० दिवसापासून १२ ते १५ दिवसापर्यंत वाढवत न्यायला हव्यात. गाळाच्या भारी व काळ्या कापसाच्या जमिनीमध्ये १२ ते १५ दिवसाच्या अंतराऐवजी २० दिवसांनी पाण्याची पाळी द्यायला हवी. या सर्व परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये योग्य ओलावा राखणे महत्त्वाचा आहे.

पक्वता कालावधीमध्ये पाण्याचा मोठा ताण आल्यास साखर संश्‍लेषण व संचय प्रक्रियेमध्ये बाधा येते. पक्व झालेल्या पिकाच्या काळजीकडे शेतकऱ्याचे तोडणी अगोदर मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते. त्यामुळे उशिरा तुटणाऱ्या उसासाठी उन्हाळ्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे.

तोडणी व्यवस्थापन

तोडणी व्यवस्थापन हे जरी शास्त्रीय तत्त्वावर आधारित असले तरी ते तसे पूर्णतः अंमलात आणणे शक्य होत नाही. त्यामुळे उपलब्ध उसाच्या पक्क्वतेनुसार योग्य तोडणी कार्यक्रम राबवून जास्तीत जास्त साखर उतारा रोजच्या गाळपातून कसा मिळेल हे उद्दिष्ट असायला हवे.

तोडणीचे वय

कमी वय आणि अतिवयाचा ऊस हे असंतुलन साखर उताऱ्याचे मुख्य कारण आहे. तोडणीचे अधिकतम वय व लागणीची तारीख यावरून तोडणी व्यवस्थापन कार्यक्रम योग्यरीत्या राबविणे महत्त्वाचे आहे.

तोडणीपूर्व पक्वता सर्वेक्षण

पिकातील सूक्ष्म हवामान बदलामुळे एकाच वेळी लागण केलेली व चांगले पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब केलेल्या जातींच्या अधिकतम साखर उताऱ्यासाठी तोडणीपूर्व पक्वता सर्वेक्षण करणे महत्त्वाचे आहे.

पक्वता सर्वेक्षणासाठी हॅन्ड रिफ्रँक्टोमिटर व शक्य झाल्यास लघु मिल गाळप चाचणी करावी. हंगामी नियुक्त तंत्रज्ञाकडून अशी पक्वता सर्वेक्षण चाचणी करून त्यानुसार ऊस पुरवठा नियोजन कार्यक्रम आखावा.

सुरुवातीच्या टप्प्यातील ऊस गाळपासाठी पक्वता सर्व्हेक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सांख्यिकीदृष्ट्या याचा विचार केला असता पक्वता सर्वेक्षणातून उतारा वाढण्यास मदत होते. त्यातून चांगल्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळतो.

जमिनीलगत तोडणी

जमिनीलगतच्या ऊस कांडीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जमिनीलगत तोडणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीलगत तोडणीमुळे जास्तीचे टनेज व चांगला साखर उतारा मिळतो.

शेतामध्ये १०० ग्रॅम वजनाची ऊस कांडी तोडणीनंतर शिल्लक राहिल्यास प्रतिहेक्टरी एक लाख गाळपयोग्य उसाची संख्या धरल्यास १० टन उसाचे उत्पादन (१ टन साखर) घटू शकते.

जेथे ऊसा खोडक्या तोडल्या जात नाहीत अशा ठिकाणी जमिनीलगत तोडणीमुळे खोडवा पीक चांगले येण्यास मदत होते.

बाह्य घटक टाळणे

अति प्रमाणातील ऊस पाचट, बांधणीचे वाढे, वाळलेला व सुकलेला ऊस यामुळे उतारा कमी होऊ शकतो. त्यामुळे उसाव्यतिरिक्त इतर बाह्य घटक टाळायला हवेत. त्यासाठी हंगामामध्ये स्वच्छ ऊस गाळपास येण्यासाठी नियोजन हवे.

तत्काळ वाहतूक

तुटलेला ऊस वाहतुकीस होणाऱ्या विलंबामुळे किंवा तुटलेला ऊस शेतात तसाच पडून राहणे हे टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुटलेला ऊस हा २४ तासांपेक्षा जास्त वेळ राहिला तर त्याचा ऱ्हास सुरू होतो. काही नैसर्गिक व अपरिहार्य कारणास्तव तुटलेला ऊस तसाच राहिला तर त्यावरती पाचट पसरावे किंवा अशी वाहने सावलीत उभे करावीत.

दर्जेदार उत्पादनासाठी नवीन लागवड तंत्रज्ञान

खोल खड्ड्यातील लागवड, आळे पद्धत लागवड आणि प्लास्टिक पिशवीतील तयार केलेल्या रोपांची लागवड या सर्व नवीन पद्धतीच्या लागवड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते.

पहिल्या दोन पद्धतीमध्ये जास्तीचा फुटवा कमी होतो. गाळपायोग ऊस संख्या ही मुख्यत्वे करून लवकर फुटणाऱ्या मातृ कोबांवर तसेच कमी प्रमाणातील भिन्न फुटवे व एकसमान तयार होणाऱ्या फुटव्यावर अवलंबून असते. प्लॅस्टिकच्या पिशवीतील रोप लागवडीमध्ये एक समान येणारे व वाढणाऱ्या फुटव्यामुळे गाळपायोग उसांची पक्वता ही एक समान असते.

निरोगी बेणे लागण कार्यक्रम

व्यावसायिकरित्या जातींची लागवड करताना विविध रोगामुळे (खोडवा वाढ खुंट रोग, गवताळ वाढ, काणी, मर इत्यादी), खराब पीक वाढ अवस्थेमुळे (क्षारपड व चोपण जमीन), पाण्याचा ताण, अतिरिक्त पाणी, पाण्याखालील पीक आणि अयोग्य पीक व्यवस्थापन व असंतुलित पोषण द्रव्ये यामुळे जातींचा ऱ्हास वाढत आहे. यामुळे उत्पादन क्षमता, गुणवत्ता कमी होत आहे. त्यामुळे अधिकतम साखर उताऱ्याचा स्तर राखण्यासाठी त्रिस्तरीय बेणेमळा कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. सर्व साखर कारखान्यामध्ये उष्ण बाष्प हवा संयंत्र द्वारे बेणे प्रक्रिया सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

ऊस लोळणे, कांड्यांना मुळ्या सुटणे टाळण्यासाठी उपाय

ऊस लोळल्यामुळे, अनसा व कांड्यांना मुळ्या फुटल्यामुळे गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. चांगली मोठी बांधणी, खोलवर लागवड, ऊस एकमेकांना बांधणे व जोड ओळ पद्धतीमुळे ऊस लोळण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते.

हिरवळीच्या पिकांचा वारा रोधक म्हणून उपयोग केल्यामुळे वाऱ्याची गती आणि ऊस लोळण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते.

वाळलेली पाने काढल्यामुळे अनसा फुटणे कमी करता येणे शक्य आहे. जास्त प्रमाणातील सिंचनामुळे व आद्रतेमुळे कांड्यांना मुळ्या सुटतात, त्यामुळे जमिनीतून पाण्याचा निचरा केल्यास ही समस्या दूर करता येते.

ऊस दर्जा आणि उताऱ्यातील असमानतेची हंगामातील कारणे

प्रतिकूल हवामान.

कमी पक्वतेचा वा अति वयाचा ऊस.

शिफारशीत नसलेल्या इतर जातींची निवड. 

केंद्रित लागवड. 

अशास्त्रीय ऊस तोडणी व्यवस्थापन.

उतारा कमी येण्याची कारणे

अति प्रमाणात व उशिरा दिलेल्या नत्र खताच्या मात्रा. 

स्फुरदयुक्त खतांची लागणीच्या वेळच्या मात्रेचा अभाव आणि अपुऱ्या पालाश खताचा वापर. 

अयोग्य पीक व्यवस्थापन. 

क्षारपड, चोपण जमिनी, पूरपरिस्थिती व अति सिंचन.

हंगामनिहाय साखर उताऱ्यातील फरकाची कारणे

हवामान बदलाचे संकट.

जतींच्या जनुकीय शुद्धतेतील बदल.

पीक व्यवस्थापनातील बदल आणि त्रुटी.

तोडणी व्यवस्थापनातील बदल.

गाळप कालावधीमध्ये झालेला बदल.

कारखान्याच्या कार्यक्षमतेतील बदल.

- डॉ. गणेश पवार, ९६६५९६२६१७

(लेखक ऊस पिकाचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT