
डॉ. गणेश पवार
भाग १
Indian Agriculture: भारतातील साखर उतारा आणि त्याचा एकूण कल हा वेगळ्या हंगामानुसार आणि प्रत्येक तोडणी हंगामामध्ये कमी जास्त होत असतो. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीनुसार बहुतेक साखर कारखान्याची साखर उताऱ्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीत कमी होत असल्याचे दिसत आहे. संतुलित साखर उतारा स्तर हा नफ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दरवाढीनुसार तसेच राष्ट्रीय परिपेक्षातून प्रति हेक्टर उत्पादन वाढ व संतुलित उतारा राखणे हे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच दरडोई साखरेची गरज भागविणे आणि इथेनॉल मिश्रण धोरणाच्या पूर्ततेसाठी गरजेचे आहे.
सद्यस्थितीतील साखर उतारा आणि कल :
भारताचे उसाखालील क्षेत्र ५९.०० लाख हेक्टर (महाराष्ट्र १४.८८ लाख हेक्टर) एवढे होते. त्यातून ३२१२.०१ लाख टन (महाराष्ट्र १०९३.९१ लाख टन) एवढे गाळप होऊन सरासरी ९.९५ टक्के एवढा साखर उतारा मिळाला. यातून ३२९.७१ लाख टन (महाराष्ट्र १०५.४४ लाख टन) एवढे साखरेचे उत्पादन झाले. देशाचा सरासरी उतारा हा २०२२-२३ मध्ये ९.९५ टक्क एवढा होता. २०२२-२३ साखर उताऱ्यात घसरण होऊन तो ९.९५ टक्के एवढा झाला. त्या तुलनेत २०१८-१९मध्ये ११.१० टक्के असल्याचे दिसून आले आहे.
चौकट : उसाखालील क्षेत्र, गाळप, उत्पादन आणि सरासरी उतार
साखर उतारा वाढीतील शक्यता :
भारतातील उष्णकटिबंधीय राज्यातील (दक्षिण भारत) सरासरी साखर उतारा हा १९९४-९५ मध्ये १०.२० टक्के होता. समशीतोष्ण (उत्तर भारत) राज्यांमध्ये तो ९.२८ टक्के होता. सध्याची कृषी हवामान परिस्थिती आणि तंत्रज्ञानानुसार उष्णकटिबंधीय भागात तो बारापेक्षा जास्त व समशीतोष्ण प्रदेशात १०.५० पेक्षा जास्त असायला हवा आहे. त्यामुळे आपल्याला उतारा वाढविण्यामध्ये तसेच देश पातळीवरील साखर उताऱ्याचे उद्दिष्ट गाठण्यामध्ये भरपूर वाव आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे.
अ) सध्याचा साखर उताऱ्याचा आकृतिबंध :
वेगवेगळ्या साखर कारखान्याच्या गळीत हंगामातील उताऱ्याचा अभ्यास करून हा आकृतिबंध निश्चित केला आहे, त्यातून सुरुवातीच्या गाळप हंगामात साखर उतारा हा कमी आढळून आला. त्यानंतर तो वाढायला लागतो. एका ठरावीक कालावधीत उच्चतम पातळीवर असतो. हंगामाच्या मध्यात स्थिर राहतो. त्यानंतर कमी कमी होत जाऊन हंगामाच्या शेवटी सुरुवातीच्या पातळीवर येतो. शास्त्रीयदृष्ट्या साखर उतारा हा सुरवातीपासून शेवटपर्यंत गाळप हंगामात तो एकरेषीय असायला हवा.
आलेख : सद्यःस्थितीतील गाळप हंगामातील साखर उतारा आकृतिबंध
ब) असमान व कमी साखर उताऱ्याची कारणे :
साखर उतारा हा कारखान्याची कार्यक्षमता उसाच्या प्रतीवर अवलंबून असते. साखर कारखाना अधिक कार्यक्षमतेने चालवण्यासाठी व साखर उताऱ्यातील चढ-उतार नियंत्रित ठेवून जास्तीत जास्त लक्ष हे उसाच्या उत्पादन वाढीवर व दर्जेदार ऊस पुरवठ्याकडे द्यावे लागेल, तरच उच्चतम साखर उतारा गाठता येईल.
गाळप हंगामाच्या सुरुवातीस कमी साखर उतारा येण्याची कारणे :
१) तोडणीपूर्व प्रतिकूल हवामान परिस्थिती.
२) कमी वयाचा/ अपक्व ऊस.
३) अयोग्य जातींची लागवड.
४) अशास्त्रीय ऊस तोडणी.
१) तोडणीपूर्व प्रतिकूल हवामान परिस्थिती :
- देशातील बऱ्यापैकी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. त्या अगोदर परतीचा मॉन्सून (उत्तर-पूर्व) संपल्यानंतर पाठीमागील महिन्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता असते.
- या महिन्यामधील रात्रीचे कमाल तापमान जास्त असल्यामुळे साखर कांड्यामध्ये साखर भरण्यास पोषक परिस्थिती नसते. ही परिस्थिती उसाच्या वाढीसाठी पोषक असते. काही भागांमध्ये तुरा आलेला व नुकताच पोंग्यातून तुरा बाहेर पडलेल्या उसाची पक्वता व उच्चतम साखर उतारा येण्यास महिना ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो.
- तटबंधीय प्रदेशात मॉन्सूनच्या अनिश्चिततेमुळे ऊस पिकावर परिणाम होतो. काही भागांमध्ये गाळप हंगाम मॉन्सूनच्या परतीनंतर लगेच सुरू होतो. काही प्रदेशात मे, जून महिन्यांनंतर लगेच सुरू होतो.
२) कमी वयाचा (अपक्व) ऊस :
- कमी वयाचा ऊस व तोडणीपूर्वीची प्रतिकूल हवामान परिस्थिती या दोन संयुक्त समस्या दिसून येतात. ज्या कारखान्याच्या गाळप हंगाम जवळपास सहा महिन्यांपर्यंत आहे, ऊस लागण हंगाम हा फक्त दोन ते तीन महिन्यांमध्ये केंद्रित झाला आहे, अशा कारखान्यांमध्ये ही परिस्थिती निर्माण होते. उदा. तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये ऊस लागण होते. गाळप हंगाम हा नोव्हेंबरपासून सुरू होऊन एप्रिल, मेपर्यंत चालतो.
- दक्षिण कर्नाटकामध्ये लागण हंगाम हा जुलै, ऑगस्ट दरम्यान असतो. गाळप हंगाम हा जून ते फेब्रुवारी असा असतो. समशीतोष्ण प्रदेशात (उत्तर भारत) प्रामुख्याने मार्च, एप्रिल दरम्यान लागण होते. नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू होतो, त्यामुळे कमी वयाचा, अपक्व ऊस सुरुवातीच्या वेळी गाळपास उपलब्ध होतो. अशा प्रकारची केंद्रित लागण ही काही कारणामुळे होत असते. त्यामध्ये जमीन दुसऱ्या पिकाखाली असणे, प्रतिकूल जमीन व हवामान परिस्थितीमुळे लवकरची केंद्रित लागण, सिंचनाची उपलब्धता व इतर समस्या असतात. जे कारखाने संपूर्ण गाळप हंगामासाठी एक किंवा दोन वाणांवरती पूर्णतः अवलंबून आहेत, त्या ठिकाणी ही समस्या फार गंभीर होते.
३) शिफारशीत नसलेल्या जातींची निवड :
- बऱ्याच ऊस जाती चांगल्या पक्वतेसाठी हवामान शास्त्रीय विविध मापदंडावर अवलंबून असतात (तापमान, सूर्यप्रकाश व आर्द्रता इत्यादी). जाती मोठ्या प्रमाणात तापमानावर अवलंबून असतात. हवामानाचे विविध घटक गाळप हंगाम लवकर सुरू करून चांगला साखर उतारा मिळण्यास अनुकूल नसतात, त्यामुळे ज्या जाती प्रामुख्याने तापमान, इतर हवामान घटकांवर मुख्यतः अवलंबून असतात, त्यातून कमी प्रतीचा ऊस तयार होतो.
- तापमान असंवेदनशील ऊस जातींच्या पक्वतेसाठी आपल्याकडे फारसे प्रमाणबद्ध संशोधन झाले नाही. तापमान संवेदनशील जातींमध्ये सक्षम असणाऱ्या ऊस जाती तापमान नियंत्रण कक्षेमध्ये चांगल्या प्रकारची साखर वाढ करू शकतात. साखर साठवण्यासाठी या जाती प्रतिकूल असू शकतात.
- काही अंशांमध्ये चांगली साखर असणाऱ्या कमी कालावधीच्या व लवकर पक्वतेच्या जाती या तापमान असंवेदनशील असल्याचे दिसून आले आहे. अशा जातींची सुरुवातीच्या कालावधीमध्ये लागवड केल्यास साखर उतारा वाढविण्यास मदत होते.
४) अशास्त्रीय ऊस तोडणी :
- सद्यःस्थितीत ऊस पुरवठ्याची रचना ही वेगवेगळ्या निकषावर अवलंबून आहे. ऊस लागण तारखेच्या ज्येष्ठतेनुसार बरेच कारखाने चालू लागण आणि खोडव्याचा तोडणीचा अग्रक्रम ठरवितात. ही व्यवस्था एकाच वेळच्या केंद्रित लागणीमुळे किंवा एकाच वेळी खोडवा राखल्यामुळे अपयशी ठरते.
- कोणत्याही ठराविक वेळेत कमाल साखर उतारा हे ध्येय असल्यास गाळप हंगामाचे काटेकोर नियोजन करावे लागेल. त्यासाठी ऊस तोडणीचे शास्त्रीय नियोजन (हंगाम व जातनिहाय) करून चांगल्या दर्जाचा ऊस दररोजच्या गाळपास येईल हे पाहायला हवे.
- काही परिस्थितीत खोडव्याची तोड सुरुवातीस केली जाते. खोडवा लवकर पक्व होतो अशी धरणा आहे. आपल्याला बऱ्याच जातींमध्ये अकरा महिने वयाच्या उसापेक्षा बारा महिन्यांच्या खोडवा उसामध्ये दर्जा व गुणवत्तेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
गाळप हंगाम संपताना उतारा कमी होण्याची काही कारणे:
१) प्रतिकूल हवामान परिस्थिती :
- अधिक साखर उतारा येणाऱ्या अनुकूल/ पोषक हवामान परिस्थितीपेक्षा देशाच्या बऱ्याच भागांमध्ये मार्चनंतर तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते.
- अति तापमान वाढ ही साखर उताऱ्यावर व्यस्त स्वरूपात परिणाम करते. यामध्ये साखरेचे विघटन, प्रत्यावर्तन, जास्त प्रमाणातील श्वासोच्छ्वासामुळे साखरेचा ऱ्हास होणे, उसातील चोयट्याचे (दशी) आणि तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढणे, रसाचे प्रमाण फारच कमी होणे इत्यादी. कारणे दिसून येतात. त्यामुळेच उन्हाळ्यातील महिन्यामध्ये (एप्रिल- मे) आणि त्यानंतर लांबलेल्या गाळप हंगामातील उसाचा साखर उतारा हा फेब्रुवारी, मार्च मधील गाळपापेक्षा कमी असतो.
२) अति वयाचा ऊस :
- गाळप हंगाम हा अतिवयाच्या उसामुळे नुकसानकारक ठरतो. बऱ्याच कारखान्यावर गाळप हंगाम संपताना अतिपक्व व शिल्लक राहिलेला ऊस गाळपासाठी येत असतो. विशेष करून जे कारखाने एक किंवा दोन जातींवर आणि दोन ते तीन महिन्यांमध्ये होणाऱ्या केंद्रित लागणीवर, उशिरा गाळपास लागणाऱ्या जातींवर अवलंबून असतात, त्यांच्यासाठी हे पूर्णतः खरे ठरते.
- अति कालावधीमुळे ऊस रस कमी होणे, दशीचे प्रमाण वाढणे, रसाचे प्रमाण व तंतुमय पदार्थांचे पदार्थ वाढणे आणि इतर अनेक बदल उसामध्ये होऊन साखरेचा उतारा तीव्रपणे कमी होताना दिसतो.
३) तुरा आलेल्या उसाची तोडणी :
- तुरा आलेला ऊस हा एक प्रकारे फायदेशीर आणि नुकसान करणारा घटक आहे. याचा परिणाम उसाचा साखर उतारा वाढण्यास आणि उत्पादन घटण्यात होते. उसाला आलेला व येत असलेला तुरा हा फायदेशीर ठरतो. कारण या उसामध्ये तुरा आल्यानंतर आठ ते दहा आठवड्यांपर्यंत साखर सर्वोच्च पातळीवर जाते, त्या वेळेस जर ऊस तोडला गेला तर त्यातून चांगल्या प्रमाणात साखर उतारा मिळतो.
- नुकताच तुरा आलेला ऊस आणि तुरा येऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त झालेल्या उसाची तोडणी केली तर साठलेल्या साखरेचे विघटन होऊन वजन व उताऱ्यात घट येते.
४) खराब झालेला वाळलेला, सुकलेला ऊस :
- गाळप हंगाम संपताना वाळलेल्या उसाचे प्रमाण जास्त असते. यामध्ये पडलेला, अनसा व मुळ्या फुटलेला अतिवयाचा ऊस गळपास येतो. तसेच नवीन लागणीच्या उसामुळे, पाण्याच्या कमतरतेमुळे खोडवा उसाकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती शेतकऱ्यांमध्ये दिसून येते. त्यामुळे खोडव्याचे उत्पादन घटते. त्याची चांगलीच किंमत शेतकऱ्यांना व कारखान्यांना मोजावी लागते यालाच खर्चिक दुर्लक्ष असे म्हटले जाते.
५) अति लांबलेला गाळप हंगाम कालावधी :
- ज्या वेळेस काही कारणामुळे गाळप हंगाम लांबतो तेंव्हा तो नेहमीच कमी उताऱ्यास कारणीभूत ठरतो. ऱ्हास झालेला ऊस हे याचे प्रमुख कारण असते.
- अति वयाच्या ऊसाबरोबर वाढलेले तापमान उसाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरते.
ऊस दर्जा आणि उताऱ्यातील असमानतेची हंगामातील कारणे :
१) प्रतिकूल हवामान.
२) कमी पक्वतेचा वा अति वयाचा ऊस.
३) शिफारशीत नसलेल्या इतर जातींची निवड.
४) केंद्रित लागवड.
५) अशास्त्रीय ऊस तोडणी व्यवस्थापन.
उतारा कमी येण्याची कारणे :
१) अति प्रमाणातील व उशिरा दिलेल्या नत्र खताच्या मात्रा.
२) स्फुरदयुक्त खतांची लागणीच्या वेळच्या मात्रेचा अभाव आणि अपुऱ्या पालाश खताचा वापर.
३) अयोग्य पीक व्यवस्थापन.
४) प्रतिकूल वाढ परिस्थिती जसे की, क्षारपड व चोपण जमिनी, पूरपरिस्थिती व अति सिंचन.
हंगामनिहाय साखर उताऱ्यातील फरकाची कारणे :
१) हवामान बदलाचे संकट.
२) जतींच्या जनुकीय शुद्धतेतील बदल.
३) पीक व्यवस्थापनातील बदल आणि त्रुटी.
४) तोडणी व्यवस्थापनातील बदल.
५) गाळप कालावधीमध्ये झालेला बदल.
६) कारखान्याच्या कार्यक्षमतेतील बदल.
क) संतुलित व उच्चतम साखर उतारा साध्य करण्यासाठीचे टप्पे :
१) जाती आणि हंगामनिहाय वेळापत्रक ः
- विभागनिहाय वैयक्तिक कारखाना कार्यक्षेत्रावर योग्य जातींची निवड करणे ही महत्त्वाची बाब आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील विविध गटानुसार व विभागानुसार जातींची कामगिरी ही भिन्न असते. तसेच जमिनीचा प्रकार, सिंचन क्षमता व गुणवत्ता, निचरा प्रणालीची सुविधा, रोग, किडींचा प्रादुर्भाव इत्यादी घटकांवर जातींची योग्यता अवलंबून असते.
- या सर्व कारणांचा अभ्यास करून योग्य प्रकारच्या जातींची निवड करावी. या कारणांची स्विकृती करून कारखानानिहाय आणि जमिनीच्या प्रकरणानुसार जातींची निवड करावी. त्यासाठी कारखान्यांनी गटनिहाय वेगवेगळ्या जातींच्या अनुकूलन चाचण्या घेऊन चांगल्या व अनुकूल जातींची निवड करावी.
- अति लवकर, लवकर, मध्यम व उशिरा पक्व होणाऱ्या जातींचे पक्वता गटानुसार वर्गीकरण केले जाते. या पक्वता गटानुसार जातनिहाय व हंगाम निहाय लागवड वेळापत्रकामध्ये विविध जातींचा समावेश करणे गरजेचे आहे.
खंडित लागवड :
- साखर उताऱ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी जात व हंगामनिहाय, प्रोबधनात्मक, धोरणात्मक कृती आराखडा व प्रोत्साहनपर योजना राबवून खंडित लागण करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या गाळप महिन्यानुसार दर्जेदार ऊस पुरवठा होण्यासाठी जात आणि हंगामनिहाय खंडित लागण करणे आवश्यक आहे.
- आपल्याला विविध जाती आणि त्यांच्या लागणीचे क्षेत्र ठरवावे लागेल. खंडित लागणीमुळे कमी वयाचा व अति परिपक्क्व झालेल्या उसाचा पुरवठा टाळला जाईल.
लवकर पक्व होणाऱ्या, जास्त साखर असणाऱ्या जातींचा वापर :
- साखर उतारा सुधारण्यासाठी लवकर पक्व होणाऱ्या व जास्त साखर उतारा असणाऱ्या जाती निवडाव्यात. त्या पक्वता गटाच्या टक्केवारीवर साखर उतारा अवलंबून आहे.
- चांगला साखर उतारा आणि लवकर पक्वता गटातील जातींची टक्केवारी याचा तंतोतंत संबंध दिसून आला आहे. लवकर पक्वता गटातील जातींचे जास्तीचे प्रमाण (टक्के) हे साखर उताऱ्यात सुधारणा आणू शकते. कारण सुरुवातीच्या गाळप हंगामामध्ये कमी साखर उतारा हे वैशिष्ट्यपूर्णरीत्या दिसून येतो.
- पक्वता गटाच्या प्रमाणानुसार कृती आराखडा करून चांगला साखर उतारा मिळाल्याचे काही कारखान्यास अनुभवास आले आहे.
- लवकर पक्वता गटातील जाती कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर डिसेंबर, जानेवारीस लावल्या जातात. या जाती १० ते ११ महिन्यात गाळपास तयार होतात. काही प्रयोगाअंती असे दिसून आले आहेत की या जाती बारा महिन्यांपर्यंत चांगला साखर उतारा देतात, त्यामुळे लवकर पक्व होणाऱ्या जाती हे हंगामाच्या सुरुवातीस लावून गाळप हंगामाच्या सुरुवातीस गाळल्या असता त्यापासून चांगल्या उताऱ्याबरोबर चांगले उत्पादन सुद्धा मिळू शकते. २५ टक्क्यांपर्यंत प्रमाणातील लवकर पक्व होणाऱ्या जातींचा सुरुवातीच्या गाळप हंगामात वापर केल्यास तसेच इतर गाळप हंगामामध्ये सुद्धा वापर केल्यास जास्तीचा उतारा टिकवता येऊ शकतो.
- काही विभागांमध्ये तुरा येत नसल्यास किंवा लवकर पक्वता गटातील जास्त साखर उतारा देणाऱ्या जाती हे तुरा न येणाऱ्या किंवा काही प्रमाणात येणाऱ्या जाती उशिरा लावून त्या उशिराच्या गाळप हंगामामध्ये गाळल्यास उशिरा गाळप हंगामामध्ये कमी होणारा उतारा कमी करता येईल.
- वेगवेगळ्या पक्वता गटातील नवीन आशादायक जाती तयार होत आहेत. वैयक्तिकरित्या कारखान्यांनी या जातींच्या अनुकूलन चाचण्या घेऊन यांच्या क्षमतेचा वापर करून घ्यायला हवा.
संपर्क : डॉ. गणेश पवार, ९६६५९६२६१७
(लेखक ऊस पिकाचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.