Baap Ani Shillak Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review : बाप अनेक अर्थांनी भेटतो तेव्हा...

Baap Ani Shillak : कविता या साहित्यप्रकाराकडे गांभीर्याने पाहून नव्या शक्यतांचे विविध अंगांनी प्रयोग करणारे मोजके कवी सध्या मराठी साहित्य अवकाशात आहेत.

Team Agrowon

धीरज कुलकर्णी

Ajit Abhang :
कविता या साहित्यप्रकाराकडे गांभीर्याने पाहून नव्या शक्यतांचे विविध अंगांनी प्रयोग करणारे मोजके कवी सध्या मराठी साहित्य अवकाशात आहेत. अशा आश्‍वासक कवींपैकी अजित अभंग हे एक नाव..‘गैबान्यावान्याचं’ या त्यांच्या कवितासंग्रहानंतर पुढील ‘बाप आणि शिल्लक’ हा नवा कवितासंग्रह दाखल झाला आहे. बाप आणि शिल्लक अशा दोन भागांमध्ये याची विभागणी आहे.

स्वतः बाप झाल्यानंतर आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय काय केले याचे एक भान प्रत्येकाला येऊ लागते. वडिलांचे स्थान मनामध्ये वेगळ्या प्रकारे घट्ट होत जाते. नाते जास्त गहिरे होते. प्रत्येकाने अनुभवलेली ही भावना कवी नेमक्या शब्दात पकडतो. वडिलांशी प्रत्येकाचे एक खास नाते असते. करडी शिस्त ठेवणारा, अजिबात न रडणारा, दररोजचा संघर्ष करत कुटुंबाचे पोषण करणारा आपला हीरो म्हणजे आपले वडील, ही एक प्रतिमा लहानपणापासून आपल्या मनात असते. आईच्या मायेच्या सावलीत मुलाला जसे सुरक्षित वाटते, त्यापेक्षा वेगळ्या वाटेने जाऊन जगात खंबीरपणे जगायला लायक बनविण्यासाठी बाप आपल्या मुलांना उभे करत असतो.

संवेदनशील मनाच्या कवीला हा बाप अनेक अर्थांनी भेटतो. त्याचे हे भेटणे शब्दबद्ध करताना कवी समकाळातील, तसेच प्राचीन प्रतिमांचा, रूपकांचा चपखलपणे वापर करतो.

स्वप्न पाहणे सर्वथैव
स्वप्नच वाटले त्याला
अशा ओळी असोत किंवा
बाप बापच असतो का अर्धंनारीनटेश्‍वर?
बाप नसतो रे ईश्‍वर

अशा ओळी असोत, अजित अभंग यामधून बाप ही संकल्पना आणि कवितेलाही एका उंचीवर नेऊन ठेवतात. या उंचीवरून बाप बघणे ही त्या संकल्पनेची खरी थोरवी.
अनेकदा आपल्याला वडिलांचा राग येतो. पण त्यांनी केलेले परिश्रम आपल्याला आपण मोठे झाल्यावर खऱ्या अर्थाने समजतात. गरिबीच्या दिवसांत, ग्रामीण भागात, वंचित समाजात, प्रतिकूल परिस्थिती असताना वडील आपल्यासाठी जे काही करतात, त्याचे ऋण फेडताना कवीला शब्द अपुरे वाटतात. म्हणूनच,

झिरपू नये आपला भूतकाळ
येत्या पिढीला बसू नयेत अशा झळा
म्हणून सोफिस्टिकेटेड गल्ली निवडली,
सोसून झळा सराउंडिंग नेहमी व्हाइट कॉलर
ठेवलं तेव्हा फुशारलो समाधान..
पण जेव्हा लेकरू बोल्लं,
तिकडं गरीब लोक राहतात न रे बाब्या?
तेव्हा चांदण्या चमकल्या.
अशा ताकदवान ओळींमधून कवी प्रखर सामाजिक जाणीव दाखवून देतो.

शिल्लक या विभागात अभंग यांच्या इतरत्र प्रकाशित झालेल्या कविता संग्रहित केल्या आहेत. व्यष्टीहून मोठी समष्टी दाखविणाऱ्या या कविता मुक्तछंदाचा जबाबदारीने उपयोग करतात. नेमक्या आणि मोजक्या शब्दांतून वाचकाला भिडणारा आशय अधिक दाहक आहे.
हा कवी उंच मनोऱ्यात बसून कविता करणारा नव्हे, तर जमिनीवर उतरून स्वतः संघर्ष करणारा, इतरांचे जगणे जवळून पाहणारा आहे. त्यामुळे या कवितांमध्ये एक सच्चेपणा उतरतो.

उडत्या सवालाचा
उडता पंछी
त्याचा डोळाच
झालेला पिंजरा

तो कविमित्र त्याच्या चार दोन विद्रोही कविता ऐकवून
झोपायला घरी निघून गेल्यावर
मी शहराची रात धुंडाळतोय
पाऊलखुणांचा वास घेत

यांसारख्या ओळी कवीची शब्दांची ताकद दाखवून देतात.
सामाजिक जाणीव व समानता ही फक्त गप्पा मारण्याची बाब नसून आपल्या रोजच्या जगण्यात ते सहजपणे येणे गरजेचे असल्याचे ठाम प्रतिपादन कवी करतो. आशिष शिंदे यांनी साक्षेपाने संपादन केल्याने संग्रह आटोपशीर व देखणा झाला आहे. स्वतःच्या सामाजिक जाणिवांचा परिप्रेक्ष्य तपासून पाहायला अशा कलाकृती आवश्यक ठरतात.


पुस्तक ः बाप आणि शिल्लक
कवी ः अजित अभंग
प्रकाशक ः न्यू ईरा पब्लिकेशन
किंमत ः २५० रु
पाने ः ११२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT