Book : पुस्तकाचे नाव : शिवारप्रतिभा
लेखक : डॉ. मिलिंद बागूल
प्रकाशन : अथर्व पब्लिकेशन, जळगाव
पाने : ३९२
किंमत : ६९५ रुपये
निसर्गाने माणसाच्या जगण्याला त्याच्या जीवनाला दिलेली जोड अनन्यसाधारण अशीच आहे. ही जोड माणसाच्या प्रगतीच्या, संवादाच्या वाटा समृद्ध करीत असते. प्रत्येकाच्या जीवनात समृद्धता येण्यासाठी माणसानं माणसाला, एकमेकांना हात देत साथ देण्याची प्रगल्भता खऱ्या अर्थाने निसर्गच शिकवीत असतो.
दातृत्वाची, देण्याची वृत्ती निसर्गाने अव्याहतपणे जपलेली आहे. माणसात ही वृत्ती जपण्यासाठी, जोपासण्यासाठी फार थोडी माणसं कार्यरत असतात, त्यातलं एक नाव प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख होत. त्यांच्या एकूणच जीवनाचा पट उलगडताना लक्षात येते की माती आणि नाती यांच्याशी लळा लावत आपल्या जीवनानुबंधाची शृंखला पुढे नेत ते समाजव्यवस्थेची दिशा बदलण्यासाठी सातत्याने नव्या वाटा निर्माण करीत असतात.
त्यांचा जन्म आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाल्याने गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, वंचित या साऱ्याच घटकांची जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच शिक्षण घेऊन विद्यापीठांत उच्च पदे त्यांनी भूषविली तरी शेती-मातीची नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. त्यांच्या कथा, काव्य, कवितांसह ग्रामीण साहित्यावरील एकंदरीतच लेखांमधून याचा प्रत्यय येतो. शिवारप्रतिभा हा गौरव ग्रंथ त्यांच्या एकूण काव्य संग्रहांचे मराठी साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी केलेली समीक्षा आहे.
इथला शेतकरी हा देश, समाज, संस्कृती आणि निसर्ग यांच्या केंद्रस्थानी आहे. अशी जाण प्रा. केशव देशमुख यांच्या कवितांमध्ये ठळकपणे पाहावयास मिळते, हे या संग्रहाचे बलस्थान आहे, असे डॉ. द. ता. भोसले यांनी आपल्या लेखात म्हटलंय. ‘ग्रामसंस्कृतीचा नवा आलेख’ या लेखात लेखक डॉ. सदानंद देशमुख यांनी ‘पाढा’ कवितासंग्रहातील कविता अवस्थांतरावरच्या एका पिढीच्या संघर्षाचा प्रातिनिधिक पाढा आहे, असे लिहिले आहे.
‘पाढा’ ही गावाकडच्या श्रमगाथेची कविता आहे, जगण्यासाठी जिवाच्या आकांताने संघर्ष करणाऱ्या मायबापांची कथा-व्यथा आहे, हे वास्तव डॉ. एस. एम. कानडजे आपल्या लेखात स्पष्ट करतात. ‘टिळा’ कवितासंग्रहाच्या निमित्ताने प्रा. डॉ. शैलेंद्र शेंडे यांनी म्हटले आहे, की कवीला शेतकऱ्यांचे वर्गचरित्र चांगल्या प्रकारे माहीत आहे. शेतकऱ्यांच्या या वर्गचरित्राचा कवी हे स्वतःच एक जैविक भाग आहेत.
कुणी प्रेम केलं तर प्रतिभेला मनापासून आवडतं. तथापि, या प्रतीक्षेत ती कधीच नसते. पिकांचे हंगाम, दुःखाचे हंगाम, लोकांचे हंगाम आणि हंगामातले हर्षखेद प्रतिभेनं प्रत्यक्ष अनुभवलेले असतात. अशा मग्न प्रतिभेचा प्रज्ञावंत कवी लेखक म्हणून डॉ. केशव देशमुख यांचा लौकीक मराठी भाषेच्या मुलखात सर्वदूर आहे, असे सुप्रसिद्ध कविवर्य फ. मुं. शिंदे लिहितात. डॉ. देशमुख यांच्या पत्नी आणि मुलीसह एकूण ३२ लेखकांचे लेख शिवारप्रतिभा या गौरव गाथेत आहेत. हा गौरव ग्रंथ विचार पाईकत्वाचा, विनयाचा, विनम्रतेचा आणि मातीशी घट्ट अशी नाळ जोडून आकाशाशी नातं सांगणारा असाच आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.