Fig Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Fig Orchard : अंजीर बागेत खट्टा बहर व्यवस्थापन

Anjeer sheti Vyavasthapan : अंजिराच्या दर्जेदार उत्पादनाकरिता बहाराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. अंजिराला दोन वेळा बहार येतो.

Team Agrowon

डॉ. प्रदीप दळवे, डॉ. युवराज बालगुडे, नितीश घोडके

Fig Orchard Update : अंजिराच्या दर्जेदार उत्पादनाकरिता बहाराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. अंजिराला दोन वेळा बहार येतो. पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला खट्टा आणि उन्हाळ्यात येणाऱ्या बहाराला मीठा बहार असे म्हणतात.

खट्टा बहारातील फळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर मीठा बहारातील फळे मार्च-एप्रिलमध्ये तयार होतात.

बहराचे नियोजन

१) खट्टा बहराचे नियोजन करताना बागेस मार्च ते मे पूर्ण विश्रांती दिली जाते. ज्या भागामध्ये उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसते, त्या भागात खट्टा बहराचे नियोजन करता येते. कमी पाण्यावर देखील यशस्वीरित्या बहर घेता येतो.

अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रत्येक वर्षी अंजिराची छाटणी करणे अत्यंत जरूरीचे आहे. कारण, अंजिराच्या नवीन येणाऱ्या फुटींवरच फुटीवरच दर्जेदार विक्रीयोग्य फळधारणा होते.

२) अंजीर बागेस जून महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत हलकी छाटणी केली जाते. प्रत्येक फांदीचा जोर पाहून शेंड्याकडून छाटणी केली जाते. त्यामुळे फांदीच्या राहिलेल्या भागावरील नव्या फुटीवर फळे येतात. छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाईड* या संजीवकाची फवारणी केल्यास पंधरवड्यात अधिक डोळे फुटून भरपूर नवीन वाढ मिळते.

३) पुणे जिल्ह्यातील पुरंदर भागामध्ये छाटणी न करता सुप्तावस्थेत गेलेल्या झाडांची हाताने पानगळ केलीजाते. त्यानंतर संजीवकाची फवारणी करून बहार धरला जातो. जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर झाडाच्या वयानुसार व जमिनीच्या मगदुराप्रमाणे खताची मात्रा द्यावी. या बहाराची फळे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून काढणीस तयार होतात.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

१) झाडांची चांगली जोमाने वाढ होण्यासाठी लागवडीच्या सुरवातीच्या काळात नियमित खतमात्रा द्याव्यात. सर्वसाधारणपणे खट्टा बहारासाठी जून-जुलै महिन्यात खतमात्रा द्यावी.

पूर्ण वाढ झालेल्या झाडास शेणखत ५० किलो, नत्र ११२५ ग्रॅम (युरिया २४४१ ग्रॅम), स्फुरद ३२५ ग्रॅम (सिंगल सुपर फॉस्फेट २०३१ ग्रॅम) आणि पालाश ४१५ ग्रॅम (म्युरेट ऑफ पोटॅश ६९३ ग्रॅम) प्रति झाड प्रति वर्ष प्रमाणे द्यावे (नत्राची अर्धी मात्रा तर संपूर्ण स्फुरद आणि पालाश बहार धरताना व उर्वरित ५० टक्के नत्र बहार धरल्यानंतर एक महिन्याने).

२) बागेस जमिनीत अन्नद्रव्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अबलंब करणे आवश्यक असते. अंजीर बागेस सेंद्रिय खते वापरणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी ५ किलो निंबोळी पेंड प्रति झाड प्रति वर्ष प्रमाणे द्यावी.

३) बागेत सेंद्रिय पदार्थांचा तसेच जिवाणू संवर्धक, हिरवळीचे खत, गांडूळ खत, योग्य आच्छादन आणि पिकांच्या अवशेषांचा वापर बहर धरण्यापूर्वी महत्त्वाचा आहे.

४) या पिकास नत्र, स्फुरद, पालाश सोबतच मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, गंधक, बोरॉन, जस्त, मोलाब्द, मंगल, ताम्र, लोह इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात, योग्य वेळी व गरजेनुसार द्यावीत.

पाणी व्यवस्थापन

१) झाडाच्या वाढीबरोबर पाण्याची गरज वाढू लागते. जमिनीच्या मगदरानुसार भारी जमिनीत ५ ते ६ आणि हलक्या जमिनीमध्ये ३ ते ४ दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.

२) फळे पक्व होण्याच्या काळात पाणी योग्य प्रमाणात द्यावे. अन्यथा फळे बेचव बनतात. जमिनीत जास्त ओलावा टिकून राहिल्यास फळ चिरा पडण्याचे प्रमाण वाढते.

३) खोडाभोवती मोठी आळी किंवा वाफे करून बागेस पाणी द्यावे. पाणी देताना बुंध्यापाशी पाणी साचून राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. खोडालगत मातीची भर लावावी.

४) पाणी देण्याकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची ५० ते ७० टक्के बचत होते. तसेच तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

बहर नियोजनातील महत्त्वाच्या बाबी

१) ज्या बागेत खट्टा बहर घेणार आहोत तेथील तापमान, हवेची आर्द्रता, सूर्यप्रकाश, पडणारा पाऊस, पावसाचे एकूण दिवस, धुके, गारा, वादळ, वारा या सर्व बाबींचा अभ्यास असणे गरजेचे आहे.

२) दरवर्षी बागेतील मातीचे परीक्षण करावे.

३) बागेचा जोम प्रभावी राखण्यासाठी, उत्पादनक्षम राहण्यासाठी खताच्या संतुलित मात्रा द्याव्यात. गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर महत्वाचा आहे.

४) बागेस भरपूर प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करावा.

५) तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर व पाण्याची बचत करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. यासाठी प्लॅस्टिक आच्छादन किंवा पालापाचोळा, उसाचे पाचट, वाळलेले गवत, लाकडाचा भुसा यांचा वापर करावा.

६) छाटणीनंतर किंवा पानगळ केल्यानंतर झाडांवर नवीन फुट फुटण्यापूर्वी फांद्या आणि खोडावर १ टक्का बोर्डोमिश्रणाची (एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) फवारणी करावी.

७) खट्टा बहरासाठी पाणी सुरू करत असतानाच खोड आणि फांद्यावर संजीवकाची फवारणी करावी. यासाठी हायड्रोजन सायनामाईड* (५० टक्के) २० मिलि प्रति लिटर पाण्यातून फवारावे किंवा संपूर्ण झाडास चोळावे. त्यामुळे सर्व सुप्त डोळे फुटतात. झाडांना नवीन पालवी येते.

८) एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. मित्र किटकांचा नाश होणार नाही या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे. बागेत सूत्रकृमींचा उपद्रव आहे की नाही हे प्रत्येक वर्षी तपासावे. त्यासाठी अंजिराच्या मुळ्यांची तपासणी करावी तसेच माती परीक्षण करून घ्यावे.

९) बागेत सतत ओलावा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाण्याचा अतिरेकी वापर टाळावा.

१०) बागेच्या पश्चिमेस व उत्तरेस वारा प्रतिबंधक झाडे उदा. सुरू, निरगुडी, तुती, करंज, शेवगा, हातगा, पांगारा, बकाना इत्यादीची लागवड करावी.

११) फळांचा टिकाऊपणा वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याकरिता खतांची संतुलित मात्रा द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरदेखील महत्वाचा आहे. उदा. जर फळांना चिरा पडत असल्यास ३० ते ५० ग्रॅम बोरॉन प्रति झाड द्यावे.

१२) फळे वाढीच्या काळात चार ते पाच वेळा चाळणी करण्याची पद्धत आहे. चाळणीनंतर गरजेनुसार खतांचा पुरवठा करून बागेस पाणी देण्यात येते. त्यामुळे फळांचे आकारमान सुधारते व चांगल्या प्रतिची फळे मिळतात.

१३) कीडग्रस्त फांद्या, बांडगूळ, खोडे कीडग्रस्त असल्यास वेळोवेळी काढून नष्ट कराव्यात. खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी झाडाची खोडे जमिनीपासून २ ते २.५ फुटापर्यंत मोकळी करावीत व खोडावर गेरूची पेस्ट लावावी.

याकरिता ४ किलो गेरू १० लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी त्यात कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम व क्लोरपायरीफॉस ५० मिलि प्रमाणे मिसळून तयार मिश्रणाचा झाडाच्या खोडावर मुलामा द्यावा. (ॲग्रेस्को शिफारस आहे)

१४) कोवळी पाने फुटल्यानंतर साधारणत: छाटणीनंतर २० दिवसांपासून १५ दिवसाच्या अंतराने, करपा रोगाच्या नियंत्रणासाठी

(फवारणी - प्रतिलिटर पाणी)

क्लोरोथॅलोनील २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा

कार्बेन्डाझीम १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम.

यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी. फळ काढणीच्या एक महिना अगोदर फवारणी बंद करावी.

(ॲग्रेस्को शिफारस आहे)

संपर्क - डॉ. प्रदीप दळवे, ८९८३३१०१८५, (अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Pik Pahani : खरीप २०२५ च्या ऑफलाईन पीक पाहणीसाठी समिती गठीत; शासन निर्णय जारी

Nagpur Winter Session: छावणीच्या थकित बिलाबाबत सरकारची ‘तारीख पे तारीख’

Nagzari Rehabilitation: नागझरीचे पुनर्वसन अडकले लालफितीत

Lift Irrigation Scheme: सांगोला तालुक्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना

Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत हरभरा जास्त, तर ज्वारीची पेरणी कमी

SCROLL FOR NEXT