सुनिल चावके
Political Strategy India: लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी पाकिस्तानविरोधातील प्रखर राष्ट्रवादाचा मुद्दा भाजपसाठी अधिक उपयुक्त ठरू लागला आहे. पहलगामचा दहशतवादी हल्ला, त्यापाठोपाठ भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेली लष्करी कारवाई आणि स्थगित करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरून निवडणुका नसतानाच्या काळात सुरु झालेला ‘ऑफ सीझन’ प्रचार त्याकडेच अंगुलिनिर्देश करतो आहे. भाजपच्या निवडणूक प्रचारातील हिंदुत्वाचा पारंपरिक मुद्दा मागे पडून प्रखर राष्ट्रवाद केंद्रस्थानी आल्याचे दिसते.
विधानसभा निवडणुकांच्या आघाडीवर भाजपपुढे गेल्या साडेतीन दशकांपासून हुलकावणी देत असलेले बिहार स्वबळावर जिंकण्याचे आव्हान आहे. शिवाय पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि पंजाबसारखी राज्ये जिंकता येत नसतील तर किमानपक्षी आपले संख्याबळ वाढवून तेथील प्रादेशिक पक्षांना हातमिळवणी करण्यास भाग पाडण्याचे भाजपचे पहिले उद्दिष्ट असेल. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून या राज्यांतील विधानसभा निवडणुकांत हिंदुत्वाचा मुद्दा निष्प्रभ ठरला आहे.
त्यामुळे येत्या पाच ते दहा महिन्यांत या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रखर राष्ट्रवादाच्या मुद्यावर भाजप भर देणार हे उघड आहे. त्याची सुरुवात बिहारपासून झाली आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातून पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना कायमची स्मरणात राहील, अशी कारवाईचा संदेश दिला. या मुद्यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजप राजकारण करीत आहेत, हे उघड आहे. पण तशी नुसती ओरड करून विरोधी पक्षांना काही साध्य होणार नाही.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताचा इतिहास घडविणाऱ्या भाजपच्या प्रचारात पाकिस्तानविरोधातील मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेच्या आवरणाखाली सूचकपणे मांडला जात होता. केंद्रात सत्तेत आल्यानंतरच्या देशभरात मोदीलाट असूनही पहिल्या दोन वर्षांमध्ये भाजपची केवळ हरियानामध्ये स्वबळावर सत्ता आली. महाराष्ट्र, झारखंड, जम्मू आणि काश्मीर आणि आसाममध्ये भाजपला सत्तेत येण्यासाठी शिवसेना, आजसू, पीडीपी, आगप-बीपीएफसारख्या मित्रपक्षांसोबत हातमिळवणी करणे भाग पडले.
२०१५ मध्ये दिल्ली आणि बिहारमध्ये तर भाजपचा धुव्वा उडाला आणि २०१६ मध्ये पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळ ही तीन राज्ये मिळून भाजप केवळ चारच जागा जिंकू शकला. लोकसभेच्या ७३ जागांच्या जोरावर केंद्रात २८२ जागांचे बहुमत मिळाले, त्या उत्तर प्रदेशात २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काय होणार, असा प्रश्न भाजपला भेडसावत होता. १८ सप्टेंबर २०१६ ला उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करीत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पाठोपाठ पंतप्रधान मोदींनी नोटबंदीच्या घोषणेतून दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाची ग्वाही दिली.
मोदी सरकारने दहशतवाद्यांना घरात घुसून तर मारलेच, शिवाय त्यांना कफल्लकही केले, हा प्रचार उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत केंद्रस्थानी होता. यासाठी भाजपने आक्रमक प्रचारनीती आखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली आणि त्यावेळचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना ‘सर्जिकल स्ट्राईक’चे श्रेय देत भाजपने उत्तर प्रदेशात त्यांच्या ‘रोड शो’चे आयोजन केले.
परिणामी, उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावरील ३१२ जागांच्या बहुमतासह ‘न भूतो न भविष्यती’ असे यश मिळाले. हिंदुत्वाच्या मुद्याच्या तुलनेत निवडणुकांमध्ये पाकिस्तानविरुद्धचा लष्करी कारवाईची परिणामकारता हमखास यश देणारी ठरते, याची पहिली प्रचिती भाजपला त्या निवडणुकीत आली. केवळ उत्तरप्रदेशच नव्हे, तर मार्च २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंजाब वगळता भाजपने उत्तराखंड, मणिपूर, गोव्यातही सत्ता स्थापन केली. अर्थात, गोव्यात मुख्यमंत्रिपद पटकावण्यासाठी मनोहर पर्रीकर यांना राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’ करावा लागला.
‘घरात घुसून मारले’
यानंतर केंद्रात मोदी सरकारला पुन्हा सत्तेत परतण्यासाठी बहुमत मिळेल की नाही, याविषयी संघ-भाजपच्या गोटात साशंकता असताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा येथे भीषण दहशतवादी हल्ल्यात ४१ जवान हुतात्मा झाले. त्यानंतर मोदी सरकारने प्रत्युत्तरादाखल बालाकोटवर हवाई हल्ला करीत पुन्हा दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार हा प्रश्न औपचारिक ठरला. भाजपने लोकसभेच्या ३०३ जागा जिंकून यशाचे नवे शिखर गाठले. पाकिस्तानला ‘घरात घुसून मारले’ हे वाक्य भाजपच्या निवडणुकीतील यशाचे पासवर्ड ठरले.
लोकसभेच्या २०१९ च्या यशानंतर पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, झारखंड, तेलंगण, हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांचा अपवाद वगळता विधानसभा निवडणुका जिंकणे भाजपच्या हातचा मळ ठरला. पण केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणुका जिंकता येतीलच याची शाश्वती नसते हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले. यावेळी तीन महिने आधी अयोध्येतील भव्य राम मंदिर आणि प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जबरदस्त वातावरण निर्मिती करूनही भाजपला बहुमताने हुलकावणी दिली.
प्रचारामध्ये राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हिंदुत्वाच्या तुलनेत अधिक यश मिळवून देणारा ठरतो हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले. सप्टेंबर २०१६ मधील सर्जिकल स्ट्राईकचा प्रचारातील प्रभावकाळ मार्च २०१७ पर्यंत टिकून राहिला, तर तुलनेत भाजपच्या त्याच अजस्त्र प्रचारयंत्रणेला २२ जानेवारी २०२४ चा अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा प्रभाव मे २०२४ पर्यंतही टिकला नाही.
कलम ३७० रद्द करण्याआधीच जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ले विविध निवडणुकांमध्ये भाजपच्या पथ्यावर पडत होते. उरी, पुलवामा आणि पहलगाम येथील हल्ले आणि दिलेल्या प्रत्युत्तराचे भाजपने राजकीय यशात रूपांतर करून दाखवले. भारताच्या सीमांशी निगडित प्रखर राष्ट्रवादाने देशवासीयांच्या भावना ढवळून निघतात आणि निवडणुकांमध्ये त्याचे घसघशीत यशात रूपांतर होते, हा फॉर्म्युला गेल्या नऊ वर्षांमध्ये सिद्ध झाला आहे.
या मुद्दांना प्रभावीपणे मांडण्याची क्षमता असलेले पंतप्रधान मोदी यांनी २४ एप्रिलपासून बिहार, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे दौरे करून ‘ऑपरेशन सिंदूर’ वरून वातावरणनिर्मिती सुरु केली आहे. मात्र, यावर कुरघोडीसाठी धडपडणाऱ्या विरोधी पक्षांना निवडणुकीतील यशाची ही क्रोनॉलॉजी नीट समजून घ्यावी लागणार आहे.
(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्युरोचे प्रमुख आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.