Indian Politics : कॉँग्रेस-‘आप’चा कलह विकोपाला

Congress AAP Conflict : ‘आप’ला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजप आतूर आहे. काँग्रेस-आपमधील भांडणे त्यांच्या पथ्यावर पडणारी असली तरीदेखील तेवढे पुरेसे नाही. भाजपला आणखी नवकल्पनांचा अवलंब करावा लागणार आहे. काँग्रेस आणि ‘आप’मधील या कुरघोडीमुळे ‘इंडिया’ आघाडीत कलह माजला आहे.
Indian Politics
Indian PoliticsAgrowon
Published on
Updated on

सुनील चावके

Political Article : अकरा वर्षांपूर्वी, दिल्ली विधानसभा निवडणुकीत पदार्पणातच ७० पैकी २८ जागा जिंकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मिळविलेल्या यशातून काँग्रेस बोध घेईल, असा संकल्प काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोडला होता. त्यातून राहुल गांधी आणि काँग्रेस काय शिकले आणि त्याचा किती राजकीय लाभ मिळवला, हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. पण २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या सत्ताधारी ‘आप’ला धडा शिकविण्यासाठी राहुल गांधी यांचा संकल्प सिद्धीस नेण्याची सज्जता भाजपने केलेली आहे. त्यासाठी काँग्रेसकडूनच भाजपला अप्रत्यक्षपणे भरपूर मदत होत असल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीतून काँग्रेसची गच्छंती करण्याची मागणी ‘आप’चे नेते आक्रमकपणे करीत आहेत.

दिल्लीची सत्ता गमावून भाजपला तब्बल २६ वर्षे होतील. १९९८ नंतर २०१३ पर्यंत भाजपची काँग्रेसपुढे डाळ शिजली नाही आणि त्यानंतर सलग तीन निवडणुकांमध्ये ‘आप’नेही भाजपला पार नामोहरम केले. २०१३ पासून दिल्लीच्या बदललेल्या राजकारणात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष शून्य झाला आहे. पण काँग्रेसचे हे शून्य आपल्यासाठी उपयुक्त ठरेल, असे भाजपला वाटत आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आशीर्वादाने दिल्लीत माजी खासदार संदीप दीक्षित आणि काँग्रेसचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन यांनी केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाविरोधात उपराज्यपालांकडे तक्रारी नोंदविणे सुरु केले आहे, त्याचा थेट राजकीय लाभ तूर्तास भाजपलाच मिळत आहे. त्यामुळे ज्या ‘इंडिया’ आघाडीचे आजच्या घडीला काँग्रेसकडे अनौपचारिक नेतृत्व आहे, त्या आघाडीतूनच काँग्रेसला बाहेर काढा, अशी मागणी केजरीवाल करीत आहेत. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्न असला तरीही तसे झालेच तर काँग्रेसविषयी भ्रमनिरास झालेले तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हवेच आहे, यातही शंका नाही.

Indian Politics
Indian Politics : देहबोलीचा राजकीय अन्वयार्थ

काँग्रेसवर ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर होण्याची आणि विशेषतः दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’शी संबंध विच्छेद करण्याची वेळ आली आहे ती मुख्यतः राहुल गांधी आणि काँग्रेसश्रेष्ठींच्या धरसोड वृत्तीमुळे. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत ‘आप’ आणि काँग्रेसच्या आघाडीचा धुव्वा उडाला आणि त्यात हरियाना, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दारुण पराभवाची भर पडली. त्यामुळे काँग्रेसची संगत नको, अशी भावना वाढीला लागली. तशातच दिल्लीत काँग्रेसने भाजपऐवजी ‘आप’ला मुख्य शत्रू मानले आहे. भाजप आणि काँग्रेसने मिळून केलेली कोंडी प्रचारात ‘आप’च्या पथ्यावरच पडणार आहे. याचे कारण जसजशी दिल्लीची विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचेल, तसतसे ‘आप’ आणि भाजप यांच्यातील मतांचे ध्रुवीकरण तीव्र होत जाईल. त्यामुळे आठ-दहा मतदारसंघांमध्ये अस्तित्वासाठी लढत असलेला काँग्रेस पक्ष आणखीच संदर्भहीन होत जाण्याची शक्यता जास्त आहे.

दिल्लीतील काँग्रेसच्या ‘नेत्रदीपक’ अपयशाचे तीन शिल्पकार आहेत. खुद्द राहुल गांधी, अजय माकन आणि संदीप दीक्षित. शीला दीक्षित दिल्लीच्या सलग पंधरा वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात अजय माकन काँग्रेसश्रेष्ठींचे अहोरात्र कान भरत होते. आज त्यांच्याशीच संदीप दीक्षित यांना बदललेल्या राजकीय परिस्थितीत मजबुरीखातर हातमिळवणी करावी लागत आहे. देशाच्या आणि दिल्लीच्या राजकारणात वारंवार अपयशी ठरुनही अजय माकन यांना काँग्रेसने जेवढी संधी दिली, त्यापेक्षा जास्त संधी केवळ राहुल गांधी यांनाच मिळाली आहे. म्हणूनच कदाचित ते राहुल गांधींच्या सर्वाधिक मर्जीतील असावेत. शीला दीक्षित यांच्या पश्चात कोलमडून पडलेल्या काँग्रेसची संघटना राहुल गांधी आणि अजय माकन यांना नव्याने बांधता आलेली नाही. उलट उरलीसुरली पक्षसंघटना गाळात जाण्यासाठी ही जोडगोळी कारणीभूत ठरली आहे.

दुसरीकडे केजरीवाल आणि संदीप दीक्षित एकमेकांना गेल्या दोन दशकांपासून चांगलेच ‘ओळखून’ आहेत. दिल्लीत शीला दीक्षित आणि केंद्रात डॉ. मनमोहन सिंग सरकार असताना संदीप दीक्षित काँग्रेसचे दोनवेळा पूर्व दिल्लीचे खासदार राहिले आहेत. भ्रष्ट शासनव्यवस्था बदलण्याच्या उद्देशाने प्रेरित होऊन भारतीय महसूल सेवेतील नोकरी सोडून त्याच सुमाराला समाजकारणात उतरलेले अरविंद केजरीवाल यांनी ‘परिवर्तन’ नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली होती.

आपल्या लोकसभा मतदारसंघात मोहल्ला स्तरावर नागरिकांमध्ये अधिकारांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी संदीप दीक्षित केजरीवाल यांच्या स्वयंसेवी संस्थेची मदत घ्यायचे. राष्ट्रकूल क्रीडास्पर्धेच्या आयोजनातील भ्रष्टाचारावरुन केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांच्यावर केलेले आरोप, मनमोहन सिंग सरकारच्या विरोधातील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ची स्थापना करुन जनलोकपाल आंदोलनात अण्णा हजारे यांच्या बरोबरीने त्यांनी दाखवलेली सक्रियता आणि आक्रमकता, २०१२मध्ये दिल्लीतील काँग्रेसच्या मुळावर आलेल्या आम आदमी पार्टीची स्थापना करुनही संदीप दीक्षित आणि केजरीवाल यांचे संबंध सौहार्दाचेच राहिले होते.

Indian Politics
Indian Politics : भविष्यातील नवी समीकरणे

पण या ‘एनजीओ’ मानसिकतेचा सर्वाधिक फटका सर्वप्रथम दीक्षित कुटुंबालाच बसला. २०१३ च्या निवडणुकीत नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये शीला दीक्षित यांचा केजरीवाल यांनी दारुण पराभव करीत त्यांची सद्दी संपविली. पाठोपाठ वर्षभरानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या संदीप दीक्षित यांच्याही राजकारणाला विराम लागला. एवढे होऊनही काँग्रेसने बाहेरुन दिलेल्या पाठिंब्यामुळे अरविंद केजरीवाल यांना पहिल्यांदाच ४९ दिवसांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्या ४९ दिवसांमध्येही कमालीच्या कडाक्याच्या थंडीत दोन रात्री संसद भवनाबाहेरच्या पदपथावर झोपून मुख्यमंत्रीपदी असलेल्या केजरीवाल यांनी माजवलेल्या ‘अराजकते’मुळे मनमोहन सिंह सरकारच्या तोंडचे पाणी पळाले होते.

भाजपचे फावले

एकेकाळी केजरीवाल यांंचे आंदोलन आणि त्यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीचे स्वागत करणारे संदीप दीक्षित आज त्यांचे प्रखर विरोधक बनले आहेत. त्याचे कारण दीर्घ कालखंडानंतर संदीप दीक्षित यांना पक्षात काम मिळाले आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात केजरीवाल यांनी अकरा वर्षांपूर्वी केलेल्या आईच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी ते सरसावत आहेत. पण दीक्षित यांच्या बरोबरीने या मतदारसंघात भाजपचे माजी खासदार प्रवेश वर्माही उतरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत दीक्षित यांना त्यांचेच काँग्रेसजन आणि अजय माकन कितपत यशस्वी होऊ देतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

काँग्रेसचे सर्व नेते केजरीवाल आणि ‘आप’विरुद्ध आरोपांच्या तोफा डागत असल्यामुळे भाजपचे आपसूकच फावले आहे. ‘आपच्या मतांचे काँग्रेस विभाजन करुन भाजपचा फायदा होणार असल्यामुळे काँग्रेसला शक्य तितके पडद्याआडून मदत करण्याचे भाजपचे धोरण असेल; पण भाजपला अपेक्षित असलेले मतविभाजन घडवून आणण्याची क्षमता विधानसभा आणि लोकसभेच्या प्रत्येकी तीन निवडणुकांमध्ये पूर्णपणे अस्तित्वहीन झालेल्या काँग्रेसमध्ये उरलेली दिसत नाही. ‘आप''ला काँग्रेसचा उपसर्ग झालाच तर तो सहा ते आठ मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो.

त्याशिवाय फार तर १०-१२ मतदारसंघांमध्ये काँग्रेसमुळे ‘आप''ला फटका बसू शकेल. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना तुरुंगवास घडविणाऱ्या दिल्ली सरकारच्या मद्य धोरणाच्या कथित भ्रष्टाचाराची उपराज्यपालांकडे पहिली तक्रार काँग्रेसनेच केली होती. त्याचा राजकीय लाभ भाजपला मिळाला. पण विधानसभेत बहुमत मिळविण्यासाठी ते पुरेसे नाही, याची जाणीव असलेल्या भाजपला ‘आप’ला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसच्या प्रयत्नांपलीकडे जाऊन आणखी नवकल्पनांचा अवलंब करावा लागणार आहे. मात्र, काँग्रेस आणि ‘आप’मधील या कुरघोडीमुळे ‘इंडिया’ आघाडीत कलह माजला आहे, यात शंका नाही.

(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्युरोचे प्रमुख आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com