संदीप नवले
Bitter Gourd Production : ग्रामीण भागातील व्यसनाधीनता हा एक चिंतेचा विषय आहे. एक व्यक्ती जरी व्यसनाधीन असला, तरी संपूर्ण कुटुंबाला भोग भोगावे लागतात. मात्र या नरकातून बाहेर पडून कुटुंब सावरणारी व्यक्ती पाहिली, की आशा निर्माण होते. आंबळे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील ‘कारलेकिंग’ म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र फुलपगर यांची कहाणी प्रेरणादायी आहे. ‘दारू कडू होऊन, कारले गोड’ झालेले पाहताना सर्वांना अभिमान वाटावा असा त्यांचा जीवन प्रवास आहे.
राजेंद्र फुलपगर हे सहा वर्षांपूर्वी आंबळे गाव परिसरात गवंडी (मिस्तरी) काम करत असे. दररोज सकाळी उठून मिळेल तेथे कष्ट उपसत. अंगी कसब असल्याने मिस्तरी कामातही त्यांचा हातखंडा बनला होता. त्यातून दररोज घरखर्चासाठी दोन पैसे मिळत. मात्र अशातच त्यांना दारूचे व्यसन जडले. कालांतराने त्यात वाढ होत गेल्याने कुटुंबातील सदस्यही त्यांच्या व्यसनाला त्रासले होते. अशातच त्यांनी स्वत:च दारू सोडण्याचा निर्णय घेतला.
गावातील अनिल जगताप, स्वप्नील घायतडक यांच्या संपर्कात आल्यानंतर फुलपगर यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, त्यांच्याकडून विविध पिकांची माहिती घेतली. शेतीकडेच लक्ष देण्याचे निश्चित केले. दैनंदिन घरखर्चासाठी कोणते पीक चांगले आहे, याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर दीड एकरात वेगवेगळी तीन प्रकारची पिके घेण्याचे ठरविले. सुरुवातीला दीड एकरातील शेतीची ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत करून झेंडू, काकडी, कारले या पिकांची निवड केली.
त्यादृष्टीने नियोजन करून पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यासाठी संचाची खरेदी केले. बेड करून मल्चिंग टाकले, त्याला छिद्रे पाडून रोपांची लागवड केली. साधारणपणे तीन ते चार महिन्यांत तिन्ही पिकांपैकी कारले पिकातून बारा गुंठ्यांमध्ये सर्वाधिक दीड लाख रुपयांचे, तर झेंडू पिकातून एक लाख रुपये, काकडी पिकांतून ३० ते ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर कारले पिकाकडे वळण्याचा निर्णय घेत दुसऱ्या वर्षी कारले पिकांची लागवडीवर भर देण्याचे ठरवले. त्यासाठी पत्नी सारिका, मुलांची साथ मिळत आहे. गेली पाच वर्षे ते कारले पीक घेत आहेत.
दोन टप्प्यांत लागवड
कारले पिकांमध्ये आलेल्या अनुभवाचा आधार घेत दुसऱ्या वर्षी योग्य नियोजन केले. दीड एकर असलेल्या शेतीमध्ये दोन टप्पे केले. त्यासाठी बांबूच्या काठ्यांचा मंडप केला जातो. त्यात योग्यप्रकारे लागवड करून उत्पादन घेण्यासाठी दोन ओळींतील सहा फूट रुंदीचे अंतर ठेवून बेडवरील मल्चिंगवर अडीच ते तीन फुटांवर बियांची लागवड केली जाते. रोग-किडीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.
कारले पिकाचा अनुभव
श्री. फुलपगर यांना गेल्या सहा वर्षांत आलेला अनुभवावरून ते म्हणतात, ‘‘कमी क्षेत्र असल्याने मी कारले पिकाकडे वळलो. सुरुवातीला अडचणी आल्या, त्यांना सामोरा गेलो. कामात सातत्य ठेवले गेले. त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी पैसे मिळत असून चांगले उत्पन्न मिळत आहे. सध्या दुसऱ्या प्लॉटमधील उत्पन्न तर, तिसऱ्या टप्प्यातील कारले बियांची लागवड सुरू आहे. भविष्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. प्रामुख्याने शेडनेटमध्ये कारले पीक घेण्याचे प्रयत्न आहे.’’
कारल्याचे वैशिष्ट्ये
एकाच जातीची लागवड. कारल्याला चांगली चकाकी. बाजारात चांगली मागणी. वेलावर कारल्याची संख्या अधिक. तोडायला सोपे. वजन कमी. वाहतुकीला सोईचे. बाजारात चांगले दर.
वर्षभरात तीन पिके...
साधारणपणे वर्षभरात तीन वेळा कारले पीक घेतात. रोज सकाळी काढणी करून प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये शेतीमाल भरले जातात. दुचाकी गाडीला दोन्ही बाजूंना कॅरेट बांधून विक्रीसाठी नेले जातात. रांजणगाव, शिरूर येथे कारल्याची विक्रीला नेल्यानंतर बाजारातील व्यापारी एक-दोन कॅरेटची खरेदी करतात. एक कॅरेट सुमारे अकरा किलोचे असते. बाजारात इतर कारल्यापेक्षा प्रति किलो मागे पाच ते दहा रुपयांचा अधिक दर मिळतो. परंतु काही वेळा कमीअधिक दर होतात. सध्या बाजारात प्रति किलो ५५ ते ६० रुपये दर मिळत असला तरी बारा गुंठे क्षेत्रात सुमारे तीन टन उत्पादन मिळते. त्यातून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असले तरी खर्च वजा जाता सुमारे एक लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.
राजेंद्र फुलपगर ९७३०१३५९००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.