Bitter Gourd Farming : कारले लागवडीत राखले सातत्य

Bitter Gourd Cultivation : सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील अभिजित गणपतराव पाटील यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे.
Abhijit Patil
Abhijit PatilAgrowon

Bitter Gourd Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : कारले

शेतकरी : अभिजित गणपतराव पाटील

गाव : ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, जि. सांगली

एकूण शेती : ५ एकर

कारले लागवड : १ एकर

सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील अभिजित गणपतराव पाटील यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. मागील आठ वर्षांपासून कारली, कोबी, पडवळ अशा विविध भाजीपाला पिकांची दरवर्षी उन्हाळी हंगामात लागवड करण्यात सातत्य राखले होते. भाजीपाला लागवडीला ऊस पिकाची जोड दिली आहे.

ऐतवडे गावाच्या जवळून वारणा नदी वाहते. अभिजित यांच्या आजोबांनी सुमारे ३५ वर्षांपूर्वी वारणा नदीवरून शेतीसाठी पाइपलाइनद्वारे पाणी आणले आहे. याशिवाय सिंचनासाठी विहीरदेखील आहे. अभिजित हे आधी पारंपरिक पद्धतीने ऊस शेती करत होते. त्यांचे मामा प्रताप पाटील जवळील कुरळुप येथे राहतात.

ते गेल्या तीस वर्षांपासून भाजीपाला लागवड करत आहेत. मामांनी अभिजित यांना भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहित केले. मामांकडून भाजीपाला लागवडीतील बारकावे, पीक पद्धती, हंगामनिहाय लागवड तंत्र आदी बाबींची माहिती मिळाली. त्यानंतर अभिजित यांनी २०१४ मध्ये भाजीपाला लागवड करण्याचा निर्धार केला.

सुरुवातीला बाजारपेठेतील आवक, दर यांचा अभ्यास केला. बदलते तंत्रज्ञान, दर्जेदार रोपे आणि अभ्यासपू्र्ण नियोजनामुळे उत्पादनात सातत्य राखणे शक्य झाले. कोणत्याही पिकाच्या उत्पादित मालाला बाजारात अपेक्षित दर मिळेलच असे नाही. दरांता कायम चढ-उतार असतात. अशावेळी योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अभिजित सांगतात.

Abhijit Patil
Bitter Gourd : कारले पिकात मिळवली 'मास्टरी'

भाजीपाला लागवड

पाटील यांची एकूण पाच एकर शेती आहे. त्यापैकी प्रत्येकी एक एकरांमध्ये कारले आणि पडवळ लागवड आहे. तर उर्वरित क्षेत्रात ऊस लागवड आहे. विशेषतः उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड करण्यावर अधिक भर दिला जातो.

कारण या काळात बाजारात दरही चांगले मिळतात. या हंगामात कारले आणि पडवळ लागवड करण्याचे नियोजित आहे. त्यानुसार सध्या पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत रोपांची लागवड केली जाईल, असे अभिजित पाटील सांगतात.

कारले लागवड

लागवडीसाठी नियोजित एक एकर क्षेत्राची जानेवारी महिन्यात नांगरट, रोटर मारून मशागत करून घेतली आहे. मशागतीनंतर शेत उन्हामध्ये चांगले तापू दिले. जेणेकरून मशागतीनंतर कीड-रोगांच्या मातीवर उघड्या पडलेल्या अवस्था आपोआपच नष्ट होतील.

त्यानंतर एकरी ८ ट्रॉली प्रमाणे शेणखत टाकून पुन्हा रोटर फिरवला.

लागवड बेडवर केली जाते. त्यानुसार ट्रॅक्टरद्वारे पाच फुटांचे बेड तयार केले आहेत.

बेड तयार करताना डीएपी, १२ः३२ः१६, पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, गंधक, निबोंळी खत यांचा वापर केला आहे.

बेड तयार केल्यानंतर सिंचनासाठी ठिबकच्या नळ्या अंथरून नंतर मल्चिंग पेपर टाकून घेतला.

सर्व पूर्वतयारी पूर्ण झाल्यावर रोप लागवडीपूर्वी बेड ठिबकद्वारे चांगले भिजवून घेतले.

कारले लागवडीसाठी एकरी साधारण २३०० रोपांची आवश्यकता भासते. त्यानुसार दर्जेदार बियाण्यांची मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खरेदी करून ते रोपनिर्मितीसाठी रोपवाटिकेत दिले जाते. रोपवाटिकेतून सरासरी १ रुपये प्रति दराने रोपनिर्मिती करून मिळते.

सध्या बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपर आणि ठिबकच्या नळ्या अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत रोपांची उपलब्धता करून लागवड करण्याचे नियोजित आहे.

दोन बेडमध्ये पाच फूट अंतर राखले आहे. त्यानुसार दोन रोपांत चार फूट अंतर राखून लागवड करण्यावर भर दिला जाईल.

Abhijit Patil
Bitter Gourd Cultivation : कारले लागवड ठरली आर्थिकदृष्ट्या फायदेशीर

अन्नद्रव्ये व्यवस्थापन

रोपांची लागवड केल्यानंतर साधारण त्यांना अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करण्यावर अधिक भर दिला जातो. त्यानुसार लागवडीनंतर चौथ्या दिवसापासून तीन आळवणी केल्या जातात. पहिली आळवणी एनपीके, बुरशीनाशके यांची दुसरी आळवणी एनपीके, ह्युमिक ॲसिड तर तिसरी आळवणी सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि अमिनो ॲसिडची केली जाते. साधारण २ दिवसांच्या अंतराने आळवणी केली जाते. यामुळे रोपे स्थिरावण्यास मदत होते. त्यानंतर वाढीच्या अवस्थेनुसार ड्रीपद्वारे आठवड्यातून तीन वेळा अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातात.

रोपांची चांगली वाढ होण्याकरिता, पहिला १ महिना १२ः६१ः१०, १९ः१९ः१९, १३ः४०ः१३ यांचा ड्रीपद्वारे वापर केला जातो.

फुले व फळधारणा अवस्थेत, ००ः५२ः३४, १३ः४०ः१३, पोटॅशिअम सोनाइट, कॅल्शिअम, बोरॉन, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर केला जातो.

फळधारणा व काढणीवेळी १३ः००४५, ००ः५२ः३४, पोटॅशिअम सोनाइट, कॅल्शिअम, बोरॉन यांचा वापर केला जातो.

लागवडीनंतर साधारण १५ दिवसांनी रोपांना आधार देण्यासाठी मंडप तयार केला जातो. त्यासाठी बांबू, तारा आणि काठीचा वापर करून संपूर्ण क्षेत्रामध्ये मंडप तयार केले जातात. जेणेकरून फळ धारणेनंतर झाडाला आधार मिळेल.

वाढीच्या काळात तापमानात बऱ्यापैकी वाढ झालेली असते. या काळात कारले पिकावर प्रामुख्याने थ्रीप्सचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. त्यासाठी शिफारशीप्रमाणे रासायनिक कीटनाशकांची फवारणी घेतली जाते.

हवामान बदलानुसार पिकामध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करून आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाते.

अधिकाधिक दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी व्यवस्थापन तंत्रात आवश्यकतेनुसार योग्य ते बदल केले जातात. कारण उत्पादनाचा दर्जा चांगला असेल तर बाजारात दर चांगलेच मिळतात, असा त्यांचा अनुभव आहे.

काढणी नियोजन

लागवड केल्यानंतर साधारण ५५ ते ६० व्या दिवशी कारले काढणी सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात उत्पादन कमी मिळते. मात्र हळहळू उत्पादनात वाढ होते.

साधारण एक दिवसाआड कारले तोडणी केली जाते. तोडणी केलेल्या मालाची प्रतवारी, पॅकिंग करून माल बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविला जातो.

एकरी सरासरी ३० ते ३५ तोडे होतात. संपूर्ण मालाची विक्री कोल्हापूर, कराड आणि मुंबई येथील बाजारात केली जाते.

अभिजित पाटील, ९०११८०११९९ (शब्दांकन : अभिजित डाके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com