New Planet Research : युरोपातील खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या सूर्यमालेतील गुरू या ग्रहापेक्षा आकाराने ५० टक्के मोठा आणि त्याच वेळी अत्यंत कमी घनतेचा ग्रह शोधला आहे. त्याचे नाव WASP-193b असे ठेवले आहे. मोठा आकार आणि तरीही अत्यंत कमी घनता यामुळे आपल्या खाण्याच्या ‘बुढ्ढी के बाल’ (इंग्रजीमध्ये - कॉटन कॅण्डी) सारखा रंगबिरंगी दिसतो. अर्थात, या ग्रहामुळे आजवरच्या ग्रह निर्मितीच्या सिद्धांताना आव्हान मिळाले आहे.
त्याविषयीची माहिती १४ मे रोजी प्रकाशित ‘जर्नल नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ मध्ये देण्यात आली आहे. या अभ्यासामध्ये ‘एमआयटी’ मधील ज्युलियन डे विट (सहाय्यक प्रोफेसर), आर्टेम बुर्दानोव्ह (पोस्ट डॉक संशोधक) यांचा समावेश असून, युरोपमधील वेगवेगळ्या खगोल संशोधन संस्थांची मदत झाली आहे.
पृथ्वीपासून १२३२ प्रकाश वर्षे इतक्या दूर अंतरावर असलेल्या ‘वास्प १९३’ या ताऱ्याजवळ २००६, २००८ आणि २०११ ते २०१२ या काळात केलेल्या खगोलीय सर्वेक्षणामध्ये (Wide Angle Search for Planets यावरूनच WASP असे नाव देण्यात आले आहे.) वास्प १९३ बी हा ग्रह सापडला. या ग्रहामुळे प्रकाश अडवला गेल्याने ‘वास्प १९३’ हा तारा प्रत्येक ६.२५ दिवसांनी पृथ्वीवरून दिसत नाही.
आकाराने इतका मोठा ग्रह जर ताऱ्याच्या जवळ असेल, त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्याच्या प्रकाशामध्ये काही वक्रता निर्माण होते. या वक्रतेच्या प्रमाणावरून ग्रहाच्या वस्तुमानाचा अंदाज खगोलशास्त्रज्ञ मिळवत असतात. अशी वक्रता या ग्रहामुळे होताना दिसत नव्हती. त्यामुळे ‘रॅडीयल व्हेलॉसिटी’ पद्धतीने त्याच वस्तुमान काढण्याचा प्रयत्न करूनही उत्तर मिळत नव्हते. ते शोधण्यासाठी संशोधकांना सतत चार वर्षे माहिती गोळा करावी लागली.
त्यातून मिळत असलेली घनता ही इतकी कमी होती, की शास्त्रज्ञांचा विश्वासच बसत नव्हता. शेवटी हा ग्रह खरोखरच वजनाने अत्यंत हलका असल्याचे मान्य करण्यात आले. त्यांनी या ग्रहाचे काढलेले वस्तुमान हे गुरू ग्रहाच्या ०.१४ टक्का इतकेच होते. ‘वास्प १९३ बी’ या ग्रहाची घनता प्रति घन सेंटिमीटरसाठी ०.०५९ ग्रॅम इतकीच आली आहे. (तुलनेसाठी ः गुरू ग्रहाची घनता १.३३ ग्रॅम प्रति घन सेंटिमीटर असून, पृथ्वीची घनता ५.५१ प्रति घन सेंटिमीटर इतकी आहे.) या ग्रहावर घन पदार्थांऐवजी हायड्रोजन आणि हेलियम या सारखे केवळ हलके वायू असण्याची शक्यता आहे.
...असा आहे हा ग्रह
नाव - WASP-193b
गुरू ग्रहापेक्षा ५० टक्के मोठा आकार
घनता गुरूच्या एक दशांश इतकीच.
हा आजवर आढळलेल्या ५४०० पेक्षा अधिक ग्रहांमध्ये नेपच्यूनसारख्या
दिसणाऱ्या ‘केप्लर ५१ डी’ नंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह. त्यातही इतकी कमी घनता आणि मोठा आकार असलेला हा पहिलाच ग्रह आहे.
प्रचंड मोठा आकार आणि अत्यंत कमी घनता ही बाब खरोखरच अत्यंत दुर्मीळ आहे. अशा प्रकारच्या ग्रहांना ‘पफी ज्युपिटर्स’ या नावाने वर्गीकृत केले जाते. असे ग्रह गेल्या १५ वर्षांपासून रहस्य बनून राहिले आहेत. त्या गटातील हा ‘WASP-193b’ ग्रह अत्यंत टोकाचे उदाहरण आहे.खालिक बारकौई, पोस्ट डॉक, एमआयटी
सध्या उपलब्ध असलेल्या ग्रहनिर्मितीच्या सिद्धांताच्या साह्याने या प्रकारच्या ग्रहाच्या निर्मितीचे उत्तर मिळू शकत नाही. भविष्यात या ग्रहाचा अधिक अभ्यास करून त्यावरील वातावरण आणि वायूंद्वारे कदाचित त्यांच्या जन्मांचे रहस्य उलगडू शकेल.फ्रान्सिस्को पोझ्युलोस, वरिष्ठ शास्त्रज्ञ, इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स ऑफ अॅन्डाल्युसिया, स्पेन.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.