Nashik News : ‘गाव करील ते राव काय करील’ असं नेहमी म्हटलं जातं. याच सकारात्मक कृतीने काम करणाऱ्या भोकणी (ता. सिन्नर) गावाने पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतला आहे. गावात नक्षत्र वन, सैनिक सन्मान वन, ऑक्सिजन झोन, जांभूळ वन अशा नावीन्यपूर्ण संकल्पना गावात साकारल्या आहेत.
विशेष म्हणजे जवळपास पाच हजार आंब्याची आमराई, दुतर्फा वृक्ष लागवड करून हरित संपन्नतेचा संकल्प गावाने केला आहे. एकंदरीतच हे गाव पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत अग्रेसर झाले आहे.
२०१० मध्ये गावात भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे पिण्यासाठी पाणी नव्हते. ही बाब विचारात घेऊन गावाने लोकसहभागातून हरित संपन्नतेचा ध्यास घेतला. सरपंच अरुण वाघ यांनी लोकसहभागातून ग्रामविकासाला चालना दिली.
२०१२ मध्ये खडकाळ जमिनीवर बंधाऱ्यातील सुपीक गाळ पसरून गावात पर्यावरण संवर्धनाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. या ठिकाणी वड, पिंपळ, तुळस, कडुनिंब, आंबट चिंच असा विविध ४०० झाडांची लागवड करण्यात आली. ही झाडे आता डेरेदार झाली आहेत.
कोरोना काळात रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड करण्याचा संकल्प गावाने केला होता. गावातील तरुणांनी ग्रामविकास मंच स्थापन केला. प्रत्येक सभासदाने १,१०० रुपये वर्गणी काढून पाच हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकर विकत घेतला. सरपंच वाघ यांनी ट्रॅक्टर आणि डिझेल व्यवस्था करून दिली आहे.
नक्षत्र वनाची उभारणी
गावामधील नक्षत्र वनामध्ये नक्षत्रांच्या महतीनुसार २७ प्रकारच्या विविध वृक्षांची लागवड करून संस्कृतीचे झाडांशी असलेले नाते मांडलेले आहे. त्यात नाना-नानी पार्क, अक्युपंक्चर ट्रॅकची निर्मिती केली आहे. या गावाला मुंबई येथील सप्रेम संस्थेकडून पाच हजार आंबा कलमे मिळाली होती. त्याचबरोबरीने ग्रामपंचायतीने १,५०० रोपांची स्वतः लागवड करून संवर्धन केले आहे.
उर्वरित ३,५०० रोपांचे वितरण ग्रामस्थांना करण्यात आले. ‘एक व्यक्ती एक झाड’ ही संकल्पना या माध्यमातून राबविण्यात आली. सर्व मिळून सुमारे ५० हजार वृक्षांचे संवर्धन गावात केले जात आहे.
त्यामुळे येथील वृक्षसंपदा आणि संगोपनाची माहिती घेण्यासाठी परगावातील निसर्गप्रेमी या गावाला भेटी देत असतात. लोकसहभागातून लागवड केलेल्या रोपांच्या संगोपनासाठी ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेतून सात मजुरांची नेमणूक केली आहे.
कामे दृष्टिक्षेपात
गावातील ३० सैनिकांच्या सन्मानार्थ ‘सैनिक सन्मान बाग’.
लवंग, दालचिनी मसाला पिकांची ‘मसाला बाग.’
२०० वृक्षांचे जांभूळ वन.
तुळशी बागेमध्ये विविध प्रकारच्या तुळशी रोपांची लागवड.
कडुनिंब, वड, पिंपळ वृक्ष लागवडीवर विशेष भर.
पाण्यासाठी कूपनलिका. पाणीटंचाई असल्यास गावातील शेततळ्यातील पाण्याद्वारे सिंचन.
सेंद्रिय खतांसह जिवामृताची निर्मिती.
प्लॅस्टिक बंदीसह जलसंवर्धन कामात आघाडी.
पर्यावरण संवर्धनासह हरित संपन्नतेसाठी गावाने पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीला आमराईच्या माध्यमातून हक्काचे उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामविकास मंच आणि पर्यावरण संतुलनासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. सध्या २५ हजार बांबू लागवड प्रस्तावित आहे. यातूनही भविष्यात उत्पन्नवाढ होईल. गावात पर्यावरणपूरक भरीव कामे केल्याने वसुंधरा अभियानात राज्यात पहिला क्रमांक मिळेल अशी आम्हाला आशा आहे.अरुण वाघ, सरपंच, भोकणी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.