डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
Watershed Treatment : विविध परिसंस्थांमध्ये पाणी हे अत्यंत महत्त्वाचे असून, त्याच्या अनुपलब्धतेमुळे या स्थानिक परिसंस्था मोडकळीला आलेल्या दिसतात. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये जल व मृदा संधारण हा मुख्य उद्देश असला तरी त्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे अनेक स्थानिक पर्यावरणीय परिसंस्था पुनरुज्जीवित होतात. पर्यावरणासाठी पाणलोटाच्या कामांचा उत्तम फायदा होण्यासाठी माथा ते पायथा या तत्त्वावर सर्व योग्य ते उपचार करणे अत्यावश्यक असते.
नियोजन आयोगाने (सध्याचा निती आयोग) या कामाच्या प्राधान्यक्रम सांगताना अनेक वेळा माथ्यावरील कामांना प्रथम प्राधान्य देत पायथ्यापर्यंत येण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार तयार केल्या जाणाऱ्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये अनेक वेळा माथ्यावरील उपचार नमूद केले जात असले, तरी तितक्या गांभीर्याने राबवले जाताना दिसत नाहीत. पाणलोट कामांच्या यशकथा म्हणून नावाजल्या गेलेल्या सर्व गावांमध्ये डोंगर माथ्यावरील उपचार अत्यंत योग्य प्रकारे केल्याचे दिसतील.
पाणलोट क्षेत्रामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त उतारावर केवळ आणि केवळ वन निर्मिती करावी, असे पाणलोट क्षेत्राचे तत्त्व सांगते. खरेतर पाणलोट क्षेत्र विकास आणि त्यानंतरच्या व्यवस्थापनामध्ये वन व्यवस्थापनास फार महत्त्वाचे स्थान आहे. ही वनेच कालांतराने त्या पाणलोट क्षेत्रातील गावांना पाण्याचा शाश्वत पुरवठा करतात. जगभरातील बर्फाळ प्रदेश वगळता बऱ्याच बारमाही नद्यांचे उगम जंगलांमध्ये आहेत. आपल्याकडील पश्चिम घाटातून वाहणाऱ्या गोदावरी, कृष्णा, वारणा कोयना यांसारख्या असंख्य बारमाही नद्या हे त्याचेच उदाहरण आहेत.
देश किंवा राज्यातील पाणलोट क्षेत्रे ही तेथील विशिष्ट अशा नैसर्गिक स्थितीमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पाणलोट क्षेत्रातील उपचारानंतर जलसाठा वाढतो व मृदा- संधारणही होते. यामुळे प्रामुख्याने पडीक जमिनीवरील गवतांची वाढ, कुरण क्षेत्रात झालेली वाढ, वन लागवड इ. पर्यावरणीय बदल दिसून येतात.
शेतीक्षेत्रामध्येही फळवर्गीय पिकांची झालेली लागवड, पीक पद्धतीमध्ये झालेला बदल इ. बदल दिसतात. म्हणूनच जल व्यवस्थापन स्थानिक पातळीवरील पर्यावरणाच्या दृष्टीने यशस्वी झाले की नाही, याचा अंदाज येण्यासाठी पाणलोटामुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक (Induced Watershed Eco Index, IWEI) अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
हा निर्देशांक हा काढताना प्रकल्पादरम्यान उपरोक्त नमूद कृतींमुळे पर्यावरणाचे झालेले संतुलन व एकूण भौगोलिक क्षेत्र याचा भागाकार केला जातो. या निर्देशांकाची किंमत जेवढी जास्त, तेवढे त्या गावाचे पर्यावरण संतुलित असे मानले जाते.
महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणाऱ्या नद्यांची संख्या अत्यल्प आहे. अवर्षणप्रवण आणि अन्य अशा प्रत्येक गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकास आणि पुढेही सातत्याने व्यवस्थापनाची कामे केल्यास उत्तम नैसर्गिक संरचना उभी राहू शकेल. हिवरे बाजारमध्ये कुऱ्हाडबंदी, चराईबंदी यामुळे मानवनिर्मित जंगलांचे अस्तित्व टिकून आहे. माथ्यावरील मातीचे संगोपन ही जंगले करतात. गवतामुळे भूजल स्तर वाढला आहे.
“हिवरे बाजार हे एकमेव असे गाव आहे, ज्या गावातील ओढ्याचा प्रवाह कितीही पाऊस झाला तरी स्वच्छच वाहतो” असे श्री. पोपटराव पवार सांगतात. सद्यःस्थितीमध्ये कडवंची गावामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्राच्या जवळपास ४२ टक्के आच्छादन आहे. यामध्ये प्रामुख्याने फळ पिकाच्या स्वरूपात द्राक्ष बागेचा समावेश आहे. या व्यतिरिक्त डाळिंब, पेरू, भाजीपाला आणि झाडेझुडपे यांचा समावेश आहे.
हिवरे बाजारमध्ये १९९४ ते २००२ या दरम्यान माथ्यावरील क्षेत्रांमध्ये वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि गावातील स्थानिक वन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसाधारण दहा लाख झाडे सलग समतल चर करून लागवड केली. ही झाडे उत्तम वाढली असून, त्यांच्या मुळांचा पसारा डोंगरावरील माती व पाणी धरून ठेवतो.
या जंगलामुळेच हिवरे बाजारमधील ओढे नाले चक्क जानेवारी फेब्रुवारीपर्यंत वाहताना दिसून येतात. भूजल वाढल्याने विहिरी व बोअरवेल्स यांची पाणी देण्याची क्षमता वाढली आहे. परिणामी, शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. पर्यावरणाला ओरबाडून काही काळ विकासाचा भास निर्माण होत असला तरी तो शाश्वत असत नाही. पर्यावरणाला विसरून आपल्याला शाश्वत विकास साधता येणार नाही, याची खूणगाठ सर्वांनीच बांधली पाहिजे.
तत्कालीन नियोजन आयोगाच्या २००१ च्या अहवालानुसार, देशभरातील सर्वच पाणलोट क्षेत्रांमध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे पर्जन्यचक्र बाधित होऊन, पर्जन्याची विगतवारी बिघडली आहे. वारंवार पडणाऱ्या दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. या समस्येमुळे दुष्काळ, भूजलाची खालावलेली पातळी, पिण्याच्या पाण्याचे संकट यासह अचानक पावसाचे पाणी वाहून येणारे महापूर अशा आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. देशभरातील सर्व पाणलोट क्षेत्रांमध्ये स्थानिक समुदायाच्या मदतीने पर्यावरणपूरक जलसंधारण व मृदा संधारणाचे उपचार तातडीने राबविण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, भविष्यामध्ये मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते.
या संकटाचे दृश्यरूप महाराष्ट्राने ३० जुलै २०१४ रोजी माळीण (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे जमीन घसरून संपूर्ण गाव गाडले जाण्याच्या आपत्तीतून पाहिले. येथील मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून सुमारे १५१ लोकांचा मृत्यू झाला. येथील जागेचा आढावा घेतला असता ३० टक्क्यांपेक्षा अधिक उतारावरील वनांची तोड करून पडकई विकास कार्यक्रम राबविल्याचे स्पष्ट झाले. उताराच्या जमिनी शेतीसाठी तयार केल्यामुळे पर्यावरणाची मूळ स्थिती बिघडली. खरे तर अशा तीव्र उतारांवर केवळ वन संसाधने असावी, असा पाणलोट शास्त्राचा मूलभूत नियम आहे. या दिशेने केंद्र व राज्य शासनाने काम करण्याची गरज आहे.
पाणलोटाच्या कामांची काही चांगली उदाहरणे पाहू.
कोलंबियातील मिसुरी येथील बेयरड या शास्त्रज्ञाने (१९६४) पाणलोट उपचारित व अनुपचारित पाणलोट क्षेत्रांमध्ये पाण्याचा अपधाव मोजला आहे. त्यांच्या मते, उपचारांपूर्वी पाणलोट क्षेत्रांमध्ये मिळणारा एक इंच अपधाव हा प्रकल्पपश्चात नैसर्गिक आच्छादनाच्या वाढीमुळे केवळ ०.५२ इंच प्रति तास (म्हणजे निम्म्याने) कमी झाला.
नेपाळमधील बागमती नदीखोऱ्यामध्ये पर्यावरणीय स्थितिस्थापकता येण्याकरिता पर्यावरण पूरक पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन कार्यक्रम नेपाळ सरकारद्वारे राबविला जात आहे. नेपाळमध्ये हिवरे बाजारचे मॉडेल वापरणार असल्याचे नुकतेच त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले. (ॲग्रोवन, रविवार ता. २८ ची बातमी.)
तमिळनाडूच्या समुद्रकिनारी असलेल्या नालू वेदपती या गावाने सन २००२ मध्ये गांधी जयंतीच्या दिवशी २४ तासांमध्ये गावाच्या दक्षिण किनारपट्टीवरती कॅसुरीना व निलगिरी या प्रकाराची ८० हजार झाडे लावली. या उपक्रमाची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद केली होती. या झाडांनीच पुढे २६ डिसेंबर २००४ मध्ये आलेल्या सुनामीच्या लाटांच्या तडाख्यातून गावाला वाचविले होते. या सुनामीच्या आपत्तीमध्ये आजूबाजूच्या परिसरात ८००० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी नालू वेदपती गावामध्ये केवळ सात मृत्यू नोंदवले गेले होते.
देशातील सर्वच पाणलोट क्षेत्रांमध्ये पर्यावरणाचे स्थिती स्थापकता पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाच्या माध्यमातून सांधणे किती महत्त्वाचे आहे हे या वेगवेगळ्या उदाहरणावरून दिसून येते.
पाणलोटाच्या कामांमध्ये आदर्श मानल्या जाणाऱ्या कडवंची आणि हिवरे बाजार या गावांची आकडेवारी घेऊन हा निर्देशांक काढून पाहू.
सूत्र :
प्रकल्पादरम्यान पाणलोट क्षेत्रात
वाढलेले नैसर्गिक आच्छादन (हेक्टर)
पाणलोट क्षेत्रातील वाढविलेला
पर्यावरणीय निर्देशांक (IWEI) = त्याच पाणलोट क्षेत्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र (हेक्टर)
कडवंचीमध्ये १८८८ हेक्टर क्षेत्रापैकी ७९३ हेक्टर क्षेत्र हे वर्षभर आच्छादनाखाली राहते. हा निर्देशांक कडवंचीसाठी ०.४२ इतका येतो.
७९३ हे.
IWEI = = ०.४२
१८८८ हे.
तर हिवरे बाजार गावातील ९७७ हेक्टर क्षेत्रापैकी ७३३ हेक्टर क्षेत्र सदाहरित आहे. त्यामुळे हिवरे बाजार या गावासाठी हा निर्देशांक ०.७५ इतका येतो.
७३३ हे.
IWEI = = ०.७५
९७७ हे.
या निर्देशांकाची किंमत शून्य ते एक एवढी येते. ही जितकी जास्त तितकी त्या गावाचे पर्यावरण संतुलित असे मानले जाते. या दोन्ही गावांतील पर्जन्यमान प्रतिवर्षी सरासरी ६०० मिलिमीटरपेक्षा जास्त नाही, तरी देखील पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन यांची जोड दिल्यामुळे ही गावे सदाहरित झाली आहेत.
तक्ता १ - पाणलोट क्षेत्रातील वाढविलेला पर्यावरणीय निर्देशांक
अ.क्र. गावांची नावे प्रकल्पादरम्यान पाणलोट क्षेत्रात वाढलेले नैसर्गिक आच्छादन त्याच पाणलोट क्षेत्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र पाणलोट क्षेत्रातील वाढविलेला पर्यावरणीय निर्देशांक (IWEI)
०१ कडवंची १८८८ ७९३ ०.४२
०२ हिवरे बाजार ७३३ ९७७ ०.७५
डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१,
(इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे)
डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.