Mumbai's Economic Transformation : मुंबई महाराष्ट्राचा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. तो सतत लावून धरावाच लागेल. पण तेवढाच महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मुंबईचे आर्थिक रसरसलेपण ! मुंबईच्या इतर सर्व रसरसलेपणाचा तोच स्रोत आहे. आम्हाला तीच मुंबई हवी आहे ज्यासाठी ती गेली अनेक दशके ओळखली जाते. तिची तीच ओळख कायम राखली पाहिजे.
मराठी- हिंदी वाद आता अपरिहार्यपणे मुंबई कोणाची, कोणी उभी केली यावर येत आहे. सहाजिक आहे. कारण मराठी भाषिक लोकांच्या हक्काच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये `मुंबई कोणाची` हा प्रश्न केंद्रस्थानी होता. मुंबई स्वातंत्र्यापासूनच नाही, तर त्याआधी अनेक दशके भारताचे धडकणारे हृदय राहिले आहे. याचे पायाभूत कारण तिची रसरसलेली अर्थव्यवस्था होती आणि अजूनही बहुतांश शाबूत आहे
मुंबईचे बहुभाषिकपण, मुंबईचे सांस्कृतिक विश्व, तिची खाद्यसंस्कृती, ती कॉस्मोपॉलिटन असणे याबद्दल भरभरून लिहिले जाते. हे सगळे साध्य झाले ते मुंबईतील माणसे जन्माने वेगळी निपजली म्हणून नव्हे तर मुंबई गेल्या दीडशे वर्षाच्या देशाच्या भांडवली विकासाच्या अग्रस्थानी राहिल्यामुळे.
ज्यावेळी गोष्टी `मास स्केल`वर घडतात त्यावेळी ‘सिस्टिम’ केंद्री विश्लेषणच करावे लागते; व्यक्तिकेंद्री किंवा समूहकेंद्री नव्हे. म्हणजे कोणता विशिष्ट समूह त्यासाठी कारणीभूत झाला, अशी मांडणी गैरलागू ठरते. मुंबईला तिच्या लाखो कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय नागरिकांनी आकार उकार दिला आणि मुंबईच्या या लाखो नागरिकांना मुंबईची राजकीय अर्थव्यवस्था आकार देत आली आहे.
मुंबईच्या राजकीय अर्थव्यवस्थेचे जे तगडे खांब आहेत, त्यामध्ये प्रचंड बदल घडवले जात आहेत. खरे तर हा मुद्दा मराठी व्यासपीठांवर सार्वजनिक चर्चांचा विषय झाला पाहिजे.
१. आंतरराष्ट्रीय बंदर ः
विविध देशांशी आयात-निर्यातीचे व्यवहार करण्यासाठी बंदर महत्त्वाचे ठरतात. देशाचे मुंबई बंदरावरचे अवलंबित्व झपाट्याने कमी होत आहे. गुजरातमधील आणि दक्षिणेतील बंदरे आयात निर्यात व्यापारातील आपला हिस्सा वाढवत आहेत.
२. निर्मिती उद्योग ः
कापडगिरण्या, इंजिनिअरिंग, रसायने, औषधी आदी क्षेत्रातील अनेक निर्मिती (मॅन्युफॅक्चरिंग) उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. ऐंशीच्या दशकापासून अनेक मॅन्युफॅक्चरिंग कारखाने इतर राज्यांत हलवले गेले. आणि आता तर अर्थव्यवस्थेत एकूणच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा हिस्सा कमी झाला आहे.
३. बँकिंग / वित्त क्षेत्रे ः
गुजरातमधील GIFT सिटी पद्धतशीर पणे विकसित केली जात आहे. नेट बँकिंग / इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फर अशा मुळे बँकिंग / वित्तीय संस्था लोकेशन न्यूट्रल झाल्या आहेत.
४. चित्रपट उद्योग ः
दक्षिणेतील चित्रपट निर्मिती बॉलिवूड पेक्षा जास्त आहे आणि अधिक सोयी सुविधा, पूरक उद्योग उभे राहिले तर हिंदी चित्रपट निर्मिती तिथे मोठ्या प्रमाणावर होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूड उत्तरप्रदेश मध्ये हलवण्याची गर्जना केली होती. ती हलक्यात घेणे महागात पडणार आहे.
५. पर्यावरणात होणारे भीतीदायक बदल ः
वातावरणातील बदल, तापमान वाढण्याचा पहिला दृश्य परिणाम समुद्राची पातळी वाढण्यात होणार आहे. आणि आपली मुंबई तर जन्माने पाण्याने वेढलेले बेटच आहे.
या यादीचा उद्देश कोणते स्ट्रक्चरल बदल होऊ घातले आहेत, हे अधोरेखित करण्याचा आहे. ही यादी आणखी मोठी होऊ शकते.
कोणतेच शहर कधीच न मरण्याची अमृत कुंडले घेऊन जन्माला येत नाही, ना कोणत्याच शहराची अर्थव्यवस्था शंभर- दीडशे वर्षांपूर्वी होती तशीच राहू शकते. प्रचंड गतिशील असते कोणत्याही शहराची अर्थव्यवस्था. मुद्दा आहे मूल्यवृद्धीचा. मुद्दा आहे उत्पादक कामांचा. त्यातून कामगारवर्ग, मध्यमवर्ग तयार होतो. त्यातून त्या शहरातील नागरिक देखील आतून भरीव होत जातात. हे नसेल तर पोकळ होतात.
भीती ही आहे. पुढच्या काही दशकांत, मुंबईत १० ते १५ टक्के श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय आणि त्यांना विविध सेवा पुरवणारे गिग वर्कर्स म्हणून बाकीचे नागरिक असतील. मुंबईच्या आर्थिक रसरसलेपणाचा, मुंबईच्या जीडीपीशी किंवा करसंकलनाशी काही संबंध नाही. ते आकडे कायम राहू शकतात. मुंबई शहराची `जान` मात्र गेलेली असेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.