Pune News : इंद्रायणी तांदळाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे जिल्ह्याच्या भोर, वेल्हे, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. गाव खेड्यांमध्ये पारंपारिक शेतीसोबतच आधुनिक पद्धतीने शेतीची कामे करण्यात येत आहेत.
मशागतीच्या कामांना गती येत असतानाच मागील आठवडाभर दिवसा ऊन तर सायंकाळी पडणाऱ्या पावसामुळे रान भाजणीला मात्र उशीर होत आहे. या भागामध्ये धूळवाफ पद्धतीने भात पेरणी केली जाते. सर्व तालुक्यांमध्ये तांदळाच्या विविध जातींचे उत्पादन घेतले जाते. या तालुक्यांतील इंद्रायणी तांदळाला राज्यासह देशातून मागणी आहे.
तसेच परदेशातूनही चांगली मागणी असते. तांदळाशिवाय नाचणी, वरई यांचे देखील उत्पादन तालुक्यातील दुर्गम भागात घेतले जाते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी पावसाचे एक आठवडा अगोदरच आगमन होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुढील वर्षी तांदूळ उत्पादनातून चांगला आर्थिक लाभ मिळणार असल्याच्या आशेवर कामाला लागला आहे. सध्या शेतकरी शेत भाजवणी करण्याच्या कामांमध्ये व्यस्त दिसत आहेत. आगामी काळात भात शेतीमध्ये लागणाऱ्या रासायनिक खतांची तजवीज करण्याच्या दृष्टीने शेतकरी नियोजन करू लागले आहेत.
शेतीकामांमध्ये मजूर उपलब्धता ही मोठी अडचण असून हाताजोगी कामे करण्यास संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब सरसावली आहेत. त्यावर पर्याय म्हणून अनेक ठिकाणी पारंपारिक शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जात असल्याचे पाहायला मिळते आहे.
‘यंदा सहा एकरांवर भात लागवडीचे नियोजन आहे. सध्या मशागतीची कामे सुरू आहेत. बैलाच्या सहाय्याने नांगरणी करून शेत तयार करत आहे. शेणखत टाकून कुळवाच्या पाळ्या मारून शेत तयार केले जाईल. त्यानंतर एसआरटी पद्धतीने भाताची टोकण करणार आहे.- श्रीरंग कोंढाळकर, भात उत्पादक शेतकरी, कांबरे खेबा, ता. भोर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.