Kharif Season : खरिपासाठी ‘महाबीज’चे साडेतीन लाख क्विंटल बियाणे

Seed Supply : या खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने अधिकाधिक बियाणे पुरवण्याचे नियोजन केले होते. परिणामस्वरूप यंदा महाबीजकडे सर्टिफाइड सुमारे तीन लाख ६० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे.
Seed Production
Seed ProductionAgrowon
Published on
Updated on

Akola News : या खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने अधिकाधिक बियाणे पुरवण्याचे नियोजन केले होते. परिणामस्वरूप यंदा महाबीजकडे सर्टिफाइड सुमारे तीन लाख ६० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे.

यात तब्बल तीन लाख १० हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे आहे. या बियाण्याचा २५ टक्क्यांवर पुरवठा बाजारपेठेत झालेला आहे. तसेच गेल्या वर्षाच्या तुलनेत सोयाबीन दर कमी करण्यात आल्याची माहिती महाबीजच्या सूत्रांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

शेतकऱ्यांना खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामासाठी विविध पिकांचे बियाणे पुरवण्याचे काम महाबीज करते. यात खरीप हंगाम हा सर्वांत महत्त्वाचा राहतो. या हंगामाच्या दृष्टीने वर्षभर काम चालते.

गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आघातांमुळे महाबीजकडे बियाणे उपलब्धतेचे प्रमाण घटत चालले होते. मात्र आता बियाणे उपलब्धतेची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. त्यामुळेच या हंगामात सोयाबीनसारख्या प्रमुख पिकाचे सर्टिफाइड बियाणे तीन लाख १० हजार क्विंटलपर्यंत उपलब्ध करून देण्यात महाबीज प्रशासनाला यश आलेले आहे.

Seed Production
Soybean Seeds : स्वतःचे सोयाबीन बियाणे वापरा

या हंगामासाठी सोयाबीनच्या तीन लाख १० हजार क्विंटल बियाण्यासह धानाचे ३२ हजार क्विंटल, उडीद ४५००, मूग ८५०, तूर ५५००, ज्वारी १२००, बाजरी २०० ते ३०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना पुरवले जाणार आहे. तसेच काही प्रमाणात सूर्यफूल, तीळ, मका, नाचणी बियाण्याचाही पुरवठा केला जाणार आहे. महाबीजकडे असलेल्या एकूण बियाण्यांपैकी २५ ते ३० टक्के बियाणे बाजारपेठेत दाखल झाले.

Seed Production
Turmeric Seed : छत्तीसगडला ‘एमपीकेव्ही’च्या हळद बियाण्याची भुरळ

सोयाबीन बियाण्याचा दर कमी

महाबीजने सोयाबीनचे नवीन तसेच जुन्या वाणाचे दर कमी केले आहेत. या वर्षी सोयाबीनचे नवीन वाण ८७०० रुपये क्विंटल, तर जुने वाण ८५०० रुपये प्रतिक्विंटल या दराने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत प्रतिकिलोला १० ते १३ रुपयांपर्यंत या वर्षी दर कमी करण्यात आल्याचा दावाही महाबीजकडून करण्यात येत आहे.

खरिपात ५० हजार हेक्टरवर बीजोत्पादन

पुढील हंगामासाठी बियाणे उपलब्धतेचा प्रमुख स्रोत बीजोत्पादनातून मिळत असतो. यामुळे यंदा महाबीजने खरिपात एकूण ५० हजार हेक्टरपर्यंत बीजोत्पादनाचे नियोजन केले आहे. यात सर्वाधिक सोयाबीन या पिकाचे ३५ ते ४० हजार हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन घेतले जाणार आहे. सोबतच तूर, धान, नाचणी आदी पिकांचेही बीजोत्पादन राहणार आहे. या बीजोत्पादनासाठी राज्यभर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे.

शेतकऱ्यांना खात्रीशीर व दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी महाबीजने नेहमीच पुढाकार घेतला. या हंगामातही वाजवी दरात चांगले बियाणे पुरवणार आहोत. तसेच सोयाबीन व इतर पिकांचे बीजोत्पादनही घेतले जाणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
- सचिन कलंत्रे, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com