Banana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : शिरपूर तालुक्यातील पद्माकर पाटील यांचे केळी लागवड नियोजन

Team Agrowon

शेतकरी - पद्माकर जगन्नाथ पाटील

गाव - तरडी, ता. शिरपूर, जि. धुळे

एकूण क्षेत्र - ४० एकर

केळी लागवड - १० एकर (१३ हजार झाडे)

पद्माकर पाटील यांची तरडी (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे अनेर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात ४० एकर शेती आहे. जमीन मध्यम व पाण्याचा निचरा होणारी आहे. सिंचनासाठी चार कूपनलिका आहेत. केळी प्रमुख पीक असून त्यात नवती किंवा मृग बहर केळी असते.

दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस केळी लागवड केली जाते. लागवडीसाठी ग्रॅण्ड नैन जातीच्या ऊतिसंवर्धित रोपांचा वापर केला जातो. बेवडसाठी पपई लागवड केली जाते. पीक फेरपालटीवर विशेष भर दिला जातो.

जमिनीचा पोत, स्थिती लक्षात घेऊन केळीच्या वाण निवड व इतर कार्यवाही केली आहे. निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याचा प्रयत्न ते करतात. मागील हंगामात सुमारे १८ एकरांत ३१ हजार केळी रोपांची लागवड केली होती. संपूर्ण लागवड ५ बाय ६ फूट अंतरावर होती.

उत्पादित सर्व केळीची परदेशात एका खासगी कंपनीच्या मार्फत निर्यात केली. निर्यातक्षम उत्पादनासाठी फ्रूट केअर तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. केळी तज्ज्ञ के. बी. पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाते.

लागवड नियोजन

- यंदा १० एकरांत केळी लागवडीचे नियोजन केले आहे. त्यानुसार दीड फूट उंच व तीन फूट रुंद गादीवाफे तयार करून घेतले.

- लागवडीपूर्वी गादीवाफ्यांवर प्रति १ हजार झाडांसाठी पाच गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट (१ गोणी ५० किलो) आणि प्रति दीड हजार झाडांसाठी १ टन जिप्सम याप्रमाणे मात्रा दिली. त्यानंतर गादीवाफ्यांवर वखर किंवा बैलजोडीचलित कोळपे उलटे ठेवून ओढून घेतले. जेणेकरून खते मातीमध्ये व्यवस्थित मिसळली जातील. त्यानंतर गादीवाफे एकसारखे सपाट करून व्यवस्थित केले.

- ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करण्यावर भर दिला जातो. त्यानुसार एका गादीवाफ्यावर दोन लॅटरल टाकून घेतल्या. त्यानंतर गादीवाफे साधारण १५ तास चांगले भिजवून घेतले. जेणेकरून लागवडीनंतर रोपांची मर होणार नाही.

- गादीवाफे व्यवस्थित भिजल्यानंतर लागवडीसाठी ५ बाय ६ फूट अंतरावर खुणा करून घेतल्या.

- लागवडीसाठी रोपवाटिकेतून ऊतिसंवर्धित रोपांची उपलब्धता करून घेतली. रोपे आणून लागवडीपूर्वी ३ ते ४ दिवस शेतामध्ये निवाऱ्याखाली ठेवली.

- साधारण ६ जूनला लागवडीस सुरुवात केली. लागवडीसाठी १३ हजार रोपे लागली.

- लागवडीनंतर कमाल तापमान साधारण ४१ ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान होते. त्यामुळे तिसऱ्या दिवसापासून ठिबकद्वारे दोन तास सिंचनास सुरुवात केली.

- उष्णतेचा परिणाम रोपांवर होऊन रोपे मरण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी योग्य काळजी घेतली. महिला मजुरांकरवी रोपांना मातीची भर लावून घेतली.

- प्रति एक हजार रोपांना मायकोऱ्हायझा १०० ग्रॅम तसेच ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनॉस प्रत्येकी २५० ग्रॅम प्रमाणे आळवणी केली.

सिंचन व्यवस्थापन

- संपूर्ण क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यात मिनी ऑटोमेशन यंत्रणेचा वापर केला आहे. यामुळे सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे सोपे होते.

- उष्णता अधिक असल्याने लागवडीनंतर सलग ८ तास सिंचन केले. त्यानंतर प्रतिदिन २ तास प्रमाणे सिंचन सुरू आहे.

पुढील १५ दिवसांतील नियोजन

- पाऊस झाल्यानंतर प्रति एक हजार झाडांना युरिया ५० किलो, पोटॅश ५० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट २५ किलो याप्रमाणे रासायनिक खतांचे बेसल डोस देण्यात येतील. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातील.

- १२ः६१ः० व १९ः१९ः१९ आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे द्रावण तयार करून त्याची आळवणी केली जाईल.

- सध्या उष्णता अधिक आहे. यापुढील काळात तापमानाचा अंदाज घेऊन सिंचनाचे नियोजन केले जाईल. कारण, रोपांना प्रमाणाशीर पाण्यचा पुरवठा होणे गरजेचे आहे. तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल्यास रोज दोन तास ठिबकद्वारे सिंचन केले जाईल.

- ठिबकमधून पोटॅश, युरिया, मॅग्नेशिअम सल्फेट आणि १२ः६१ः० यांचा वेळापत्रकानुसार वापर सुरूच राहील.

- पावसानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी एकवेळ बैलजोडीचलित कोळपे फिरवून गादीवाफे व्यवस्थित करून घेतले जातील.

- आर्द्रतेचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाईल.

- कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य (सीएमव्ही) रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेतली जाईल. तसेच बागेचे सातत्याने निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जातील.

पद्माकर पाटील, ९३७१७२२१००, (शब्दांकन - चंद्रकांत जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत केळी दर

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीला गती नाहीच

Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेकडून ६०० कोटींवर पीककर्ज

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्‍न कायम

Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

SCROLL FOR NEXT