Farmer
Farmer  Maharudra Mangnale
ॲग्रो विशेष

Maharudra Mangnale: शेतातलं गाजरगवत काढतन अजूनही तारांबळ उडतेच!

महारुद्र मंगनाळे

मळ्यातील शेवटचं वावर. चिबाड. त्यामुळं दरवर्षी सर्व प्रकारचं तण अफाट येतं. ईचका, केणा तर विचारू नका. तणनाशक फवारणी, खुरपणी करूनही आटोक्यात येत नाही. रानाला पाणी हमखास लागत असल्याने, पिकं असं तसंच येतं. यावर्षी सोयाबीन पेरणी सरीवर केल्याने आणि पाऊस कमी झाल्याने, सगळ्यात चांगलं सोयाबीन या वावरात आलं. सोयाबीन निघालं तरी, या वावरात पाय जात होते. शिवाय भरपूर तणं उगवली, वाढली. नरेशने वावरात तणनाशकाची फवारणी केली. तरी केणा जळाला नाही. तो थोडासा दबला एवढंच. दोन वेळा उपटूनही गाजरगवत भीतीदायक वाढलं होतं. सीताफळं आणायला त्या वावराच्या बंधाऱ्यांवर गेलो की ते दिसायचंं. घाण दिसतं ते. पण काय करायचं? गाजरगवत काढून ते रान तयार करावं, असं ठरवूनही मेळ लागत नव्हता. तिथं काही पेरणी करू नये असं माझं मत. मात्र नरेशचं म्हणणं होतं, काहीतरी पेरू. बेवड होईल, किमान रान तरी चांगलं होईल. पण या गाजरगवताचं करायचं काय? हा कठीण प्रश्न होता.

गाजरगवत अगदी छोटं असतं तेव्हाच त्याच्यावर तणनाशकाचा नीट परिणाम होतो. एकदा ते मोठं होऊन फुलं लागली की, ते कुठल्याच तणनाशकाला जुमानत नाही. तीन वावरांची मशागत, पेरणी, त्यांना पाणी देणं आणि २० नोव्हेंबरचा रुद्रा हटवरचा कार्यक्रम यामुळं तीन आठवडे गाजरगवताकडं बघणं शक्य झालं नाही.

याकाळात ते भलं मोठं होऊन बसलं. पुरेशी ओल नसल्याने, ते उपसून निघणंही शक्य नव्हतं. विळ्याने कापून काढणं हाच पर्याय होता. तो गैरसोयीचा होता. कापलेल्या बुडाला पुन्हा फुटवा होणार, हेही ठरलेलं. त्यामुळं हे काम रेंगाळत पडलं होतं.

त्यात या आठवड्यात दोन वेळा भीज पाऊस झाला. जमिनीत बऱ्यापैकी ओल झाली. काल सकाळी मी सहज त्या वावरात चक्कर मारली. थोडा जोर लावून गाजरगवत उपटायचा प्रयत्न केला तर, ते मुळापासून उपटत होतं. ठरवलं. रात्री पाऊस झाला नाही तर, उद्या सकाळी गाजरगवत उपट मोहीम सुरू करायची.

गजाननची तब्येत ठिक नाही. त्यामुळं तो आणि त्याची सहचारिणी कामावर येणार नाहीत, हे स्पष्ट झालं. सहजासहजी असं वाढलेलं, फुलात आलेलं गाजरगवत काढायची मजुरांचीही तयारी नसते. अनेकांचं अंग खाजतं. शिंका येतात. गाजरगवताला आमचं शरीर सरावलयं. माझं तर अंग पण खाजत नाही. नरेश,अनिता आणि पुष्पा मावशी या तिघांना हे काम एका दिवसात संपणारं नव्हतं. मी रात्रीचं ठरवलं होतं. पूर्ण क्षमतेने अंग मोडून काम करायचं. आम्ही चौघे साडे दहा वाजता गेलो. दोन वाजता सगळं गाजरगवत, परतपापडी काढणं संपलं. या दरम्यान सगळ्यांनी एक एक पेरू खाल्ला. सवितानंही हातभार लावलाच.

दुपारी जेवण करून ट्रँक्टर घेऊन गेलो. सगळं गाजरगवत एका ट्रालीत दाबू दाबू भरून माळाच्या पोटाला टाकलं. ते वाळल्यावर जाळून टाकायचं. लवकरच त्या वावरात पिवळी ज्वारी पेरली जाईल.

सोयाबीन काढणीनंतर,पहिल्यांदा मी हे कठीण काम केलं. एकतर मला बसून असं काम करता येत नाही, शिवाय गाजरगवत उपसायला थोडासा जोर लावावा लागत होता. त्यामुळं मी पूर्णवेळ वाकूनच हे काम केलं. थकलो मात्र विशेष त्रास जाणवत नाहीय. शरीराची अधूनमधून अशी परिक्षा घेतली की बरं वाटतं. यात पास झालो, याचं कारण सकाळचा व्यायाम हे आहे.

परवा मला एकाने प्रश्न केला, तुम्ही शेतीतील या घडामोडी लिहून फेसबुकवर का टाकता? त्याचा काय उपयोग? मी म्हटलं, मी लिहितो, याचं पुढे पुस्तक निघतं, हे एक कारण. दुसरं महत्त्वाचं कारण, कोरडवाहू शेतीतील अनुभवांचा हा वास्तव दस्तऐवज आहे. यात शेतीतील माझं जगणं मी मांडतो. यात रडणं नाही, कौतूक नाही. निसर्गाला वा माणसांना दोष देणं नाही. कोणाला कसला सल्ला नाही, मार्गदर्शन नाही. यातून कोणी काही घ्यावं म्हणून मी लिहित नाही. किंवा लिहिण्यासाठी म्हणून मी ही कामं करीत नाही. हे शेती,निसर्गासोबतचं माझं वास्तव जगणं आहे. ते मी मनापासून स्विकारलयं. ते कोणी बघितलं, वाचलं ,न वाचलं ,कोणाला आवडलं, न आवडलं तरी मला काहीच फरक पडत नाही! कारण विशिष्ट हेतू ठेवून मी लिहित नाही. जगतो ते लिहितो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : आनंदाची बातमी! दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सूनच्या सरी बरसल्या

Mango Festival : बुलडाण्यातील आंबा महोत्सवात ४० प्रजाती; विक्रीही सुरू

Afghanistan Floods : अफगाणिस्तानात पुरामुळे विध्वंस, ६८ जणांचा मृत्यू; ३०० हून अधिक जनावरेही दगावली

Leopard Terror : चाकूर तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत

Pune Municipality : पुणे महापालिकेचा एसटी महामंडळाला अनधिकृत होर्डिंगप्रकरणी दंड

SCROLL FOR NEXT