Maharudra Mangnale : ‘ॲग्रोवन’मध्ये लिहिणं मला का आवडतं?

Agrowon Diwali Ank : शेतकऱ्यांमध्ये बदल करण्याच्या हेतूने मी लेखन करत नाही. तरीही या लेखनाचा हळूहळू, पण निश्‍चितपणे परिणाम होतोय. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचा शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय.
Maharudra Mangnale
Maharudra MangnaleAgrowon

Writer Story : शेतकऱ्यांमध्ये बदल करण्याच्या हेतूने मी लेखन करत नाही. तरीही या लेखनाचा हळूहळू, पण निश्‍चितपणे परिणाम होतोय. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचा शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय.

मात्र ‘ॲग्रोवन’ने स्वत:च्या या बलस्थानाचा अधिक सकारात्मक पद्धतीने वापर करून घ्यायला हवा असं वाटतं. असा एकाच विषयात रस असलेला एवढा मोठा वाचकवर्ग क्वचितच कोणा नियतकालिकाला लाभला असेल. मी या दैनिकात लिहितो हे अभिमानाने सांगतो. कारण इथं लिहिणं खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आहे.

मी शालेय, महाविद्यालयीन जीवनात फारसं लेखन केलं नाही; मात्र भरपूर वाचन केलं. पाचवी ते बी.ए.पर्यंतचा काळ माझ्या वाचनाचा सुवर्णकाळ होता. या काळात कथा, कादंबऱ्या, ललित, प्रवासवर्णन, आत्मकथन, चरित्र, रहस्यकथा अशा सर्व प्रकारच्या पुस्तकांचं अफाट वाचन केलं. वेडच होतं ते. वृत्तपत्रांचाही नियमित वाचक होतो. शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील श्रीगणेश वाचनालय ही बैठकच होती माझी.

या काळात माझ्या डायरीत अधूनमधून सुचेल ते लिहायचो. ‘वाचकांची पत्रे’ या सदरात दोन पत्रंही छापून आली होती माझी. याच काळात माझ्या मनात पत्रकारितेविषयी आकर्षण निर्माण झालं असावं.

त्यामुळंच बी.ए.नंतर कायद्याची पदवी घ्यायची म्हणून औरंगाबादला गेलो. पण प्रत्यक्षात पत्रकारितेच्या पदवीसाठी विद्यापीठात प्रवेश घेतला. वाचन, लेखन हाच या अभ्यासक्रमाचा पाया होता. साहजिकच ती पदवी गुणवत्तेत मिळवून पत्रकार झालो.

Maharudra Mangnale
Cotton Crop : वैतागलेल्या शेतकऱ्याने उभ्या कापसाच्या पिकालाच लावली आग

केवळ पदवी मिळवून कोणी पत्रकार होत नाही. त्यासाठी पत्रकारिताच करावी लागते. लगेच लातूरमध्ये दै. ‘लोकमन’चा मुख्य संपादक बनलो. तुलनेने वाचन कमी झालं. सतत विविध विषयांवर लिहिणं सुरू झालं. संपादकाला स्वत:ला सर्वज्ञ मानावंच लागतं. एखाद्या विषयातील मला कळत नाही, असं म्हणता येत नाही. इकडून तिकडून माहिती मिळवा, संदर्भ घ्या पण लिहाच.

त्यात त्या काळी जिल्हा दैनिकाचा संपादक म्हणजे एकखांबी तंबू. चार पानांचा मजकूर भरायचाच. २००० पर्यंत माहितीचा एवढा स्फोट झालेला नव्हता. सोशल मीडिया नव्हता. त्यामुळं कुठलाही मजकूर कॉपी पेस्ट करून स्वत:च्या नावाने खपवायची सोय नव्हती.

पानंच्या पानं पेनने लिहावं लागायचं. अग्रलेखापासून ते वाचकांच्या पत्रांपर्यंत. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, ग्रामीण प्रश्‍न, शहरी प्रश्‍न...असा कोणताच विषय वर्ज्य नव्हता. वाचकांचा प्रतिसाद होता, त्यामुळं लेखनाला हुरूप यायचा.

पण दैनिकाचं काम म्हणजे मान वर करायला वेळ नसायचा. सतत लिहिणं, लिहिणं आणि लिहिणं. दहा वर्षांनी कंटाळलो. तोच तोचपणा यायलाय असं वाटलं. मग दैनिकातून बाहेर पडलो. साप्ताहिकाचा संपादक बनलो. पडद्यामागचं राजकारण हा मुख्य विषय. आठवड्यातून एकदा पेपर काढायचा, त्यामुळं भरपूर वेळ मिळेल असं वाटलं. पण इथं अधिक मेहनत होती. कव्हरस्टोरीवर साप्ताहिक विकलं जायचं.

त्यामुळं कव्हरस्टोरीच तीन-चार दिवस खायची. हे काम अधिक आव्हानात्मक होतं. सात-आठ वर्षे विभागीय, राज्य पातळीवर साप्ताहिक गाजवलं. पुढं त्यालाही कंटाळलो. नंतर प्रकाशनात जास्त लक्ष घातल्यानंतर हे साप्ताहिक नावालाच चालू होतं. शेवटी २०१८ ला या साप्ताहिकाची मालकी दुसऱ्याला दिली आणि खऱ्या अर्थाने दैनंदिन पत्रकारितेतून मुक्त झालो.

मी २०११ पासून गावी शेतात राहून शेती करू लागलो. फेसबुकवर शेतीतले अनुभव नियमितपणे लिहू लागलो. त्याला प्रतिसादही चांगला मिळू लागला. एकूणच शेतीपुढे एवढे प्रश्‍न आहेत, की नवनवे विषय मिळतच राहतात. हळूहळू इतर विषयांवरील लेखन कमी होऊन, शेती व निसर्गाच्या संदर्भातील लेखन वाढलं.

सोशल मीडिया हे माध्यम प्रभावी असलं, तरी त्याच्या मर्यादा आहेत. मी फेसबुकवर शेतीवर लिहितो. पण बहुसंख्य शेतकरी फेसबुकवर नाहीत. म्हणजेच माझं लेखन ज्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नव्हतं. ती उणीव मला सतत जाणवत होती. माझी शेतीसंदर्भातील एक नोंद साधारण सहा-सात वर्षांपूर्वी ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित झाली.

त्या नोंदीला शेतकरी वाचकांचा मिळालेला प्रतिसाद माझ्यासाठी अभूतपूर्व असाच होता. मी चकितही झालो. कारण असा प्रतिसाद मला सोशल मीडियावर मिळालेला नव्हता. शिवाय तिथं प्रतिसाद नोंदविणारे शेतकरी नव्हते.

ॲग्रोवनचं वेगळेपण माझ्या लक्षात आलं. थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं ते प्रभावी माध्यम आहे. त्यानंतर माझं या दैनिकात लिहिणं वाढलं. दिवाळी अंकासाठी हमखास लिहू लागलो. एक वर्षभर पंधरा दिवसांतून एकदा असं सदर चालवलं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्या लेखांचं पुस्तक केलं. तेही वाचकप्रिय ठरलं.

Maharudra Mangnale
Women Empowerment : मिळून साऱ्याजणी, घालू आकाशाला गवसणी

माझं सगळं लिखाण थोडसं पठडीबाहेरचं आहे. मी शेतकऱ्यांना उत्पन्न कसं वाढवावं, त्यांनी कोणत्या तंत्राने शेती करावी, कोणती बी-बियाणे वापरावीत, कोणती खते वापरावीत याबद्दल कसलंच मार्गदर्शन करीत नाही. कारण असं सांगणाऱ्यांची संख्या हजारात आहे. अशा मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग होत नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. शेतकरी हा हुशार, बुद्धिमान आहे.

त्याच्या शेतीतलं त्याच्याएवढं इतर कोणालाही कळत नाही. पण तो स्वत:च्या बुद्धीचा वापर करीत नाही. इतर कोणाचं तरी अनुकरण करून, सल्ला ऐकून तो अडचणीत येतो. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या अनुभवाचा, डोक्याचा वापर करून शेती करावी. सरकार हे शेतकऱ्यांचे शत्रूच आहे. सरकारकडून त्याचं भलं होणं शक्य नाही.

शेतकऱ्यांनी सतत रडगाणे न गाता आपला मार्ग शोधावा. कुठल्याही परिस्थितीत शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहू नये, शक्य झालं, चांगला पर्याय मिळाला तर शेती सोडावी. जे शेतीवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून नाहीत, ज्यांची पैसे खर्च करण्याची ऐपत आहे, त्यांनी आनंदासाठी शेती करावी.

शेतीएवढा आनंद बाहेर कुठंही मिळत नाही, असं माझ्या लेखनाचं एकूण सूत्र आहे. माझी सगळी मांडणी या चौकटीत होते. ही मांडणी कायम त्रस्त, अस्वस्थ असणाऱ्या शेतकऱ्यांना आवडू लागलीय असं मला दिसतं.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com