Nashik News : नाशिक जिल्हा बँकेने (Nashik District Bank) सुरू केलेली सक्तीची कर्जवसुली तत्काळ थांबवावी व शासनाने कर्जमुक्ती करावी, या मागणीसाठी शेतकरी समन्वय समितीच्या माध्यमातून विविध शेतकरी संघटना एकवटल्या असून निफाड तहसील कार्यालयासमोर सात दिवसांपासून धरणे आंदोलन (Protest) सुरू आहे.
या काळात आंदोलनस्थळी कुणीच न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सहायक निबंधक कार्यालयावर धडक देत निवेदन दिले.
या वेळी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला होता. शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर बँकेचे नियमबाह्य नाव का लावले जाते, असा जाब विचारत अधिकाऱ्यांना घेराव घातला. संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. दरम्यान अधिकाऱ्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेली शेतकऱ्यांच्या जमिनींची जप्ती व लिलावाची प्रक्रिया थांबविण्यात यावी, येत्या ४८ तासांत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे यांनी या वेळी दिला.
निफाड तहसील कार्यालयासमोर जिल्हा बँकेच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाठिंबा दर्शविला आहे.
मनसे जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे, तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे यांच्या उपस्थितीत सहायक निबंधक कार्यालयाचे सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
सांगळे म्हणाले, की जिल्हा बँक तसेच जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधक यांनी शेतकरी विरोधी संगनमत करून शेतकऱ्यांना अंधारात ठेवून घाईघाईने एकतर्फी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनीवर १०१/१०७ व १००/८५ अशा प्रकारची बेकायदा कारवाई केली.
शेतकऱ्यांना त्यांची बाजू मांडण्यास वेळ दिला गेला नाही. शेतकऱ्यांकडील कर्जाच्या मुद्दल रकमेच्या दहा ते पंधरा पट व्याजाच्या रकमा वाढल्याने शेतकरी कर्ज भरण्यास समर्थ राहिला नाही. अशा कठीण प्रसंगात जिल्हा बँकेने जमीन जप्ती व लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे.
अनेक कर्जदार शेतकरी व त्यांचे कुटुंब तणावग्रस्त असून भविष्यात त्यांच्या जीवितास बरे वाईट झाल्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.
यावेळी सुधाकर मोगल, भगवान बोराडे, दत्तात्रय सुडके, विनायक घोलप, दत्ता गवळी, अब्दुल शेख, संजय पाटोळे, उमाकांत शिंदे, नवनाथ गावले, मोतीराम पाटील, केशव पानगव्हाणे, बाळासाहेब सुरवाडे, दिलीप निकम, बाळू ढोमसे, राजेंद्र निफाडे, शामराव निफाडे, बारकू ढोमसे, केदाबाई पानगव्हाणे, एकनाथ चौधरी, विष्णू होळकर, दिलीप पानगव्हाणे, अण्णासाहेब अनारसे, कारभारी कोल्हे, राजेंद्र आहेर, संजय झाल्टे, हेमंत जाधव आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.