Wrestling Agrowon
ॲग्रो विशेष

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

Team Agrowon

पै. मतीन शेख  

चैत्री उन्हाचा पारा जरा कमी झाला की कुस्तीचा फड निघायची लगबग सुरु होते. कुस्ती फडाची पंच कमिटी, यात्रा कमिटीचे सदस्य जमायला लागतात. चौकात हलगीच्या कडकडण्याचा जोर वाढायला लागतो. सुरुवातीचा नारळ तालमीच्या आखाड्याकडे जातो, पुढे ग्रामदैवत भैरुबाला व शेजारीच असणाऱ्या मारुतीरायाला नारळ फोडला जातो.

फड निघाला असा संकेत मिळताच गावच्या अस्सल कुस्तीशौकींनाचे पाय भैरुबाच्या देवळा मागच्या फडाकडे वळू लागतात. अनेकांचा गाव सुटला पण गावच्या मातीशी नाळ तुटलेली नाही. यात्रेला लोकं गावाकडे येतात, गावातल्या यात्रा कमिटीला सहकार्य करुन यात्रा जोरात रंगते. यात्रा लहान का असेना; पण कुस्त्याचा फड मात्र जोरात रंगला पाहिजे, अशी गावकऱ्यांची धारणा असते.

पंच कमिटी मैदानात पोहोचते. तोवर आठवणीने गावचा एखादा जुना पैलवान एका हलगीवाल्याला घेवून पळत जात शेजारच्या शेतातल्या पीर पठाण सायबाला नारळ वाढवून येतो. हा नारळ फुटला की फडातला नारळ फुटतो. ऊन जरा चपकत असतंयच. कोण देवळाच्या तडबंदीच्या सावलीत तर कोणी लिंबाच्या झाडाखाली तर गावातली पोरं थेट मारुतीच्या, अंबाबाईच्या देवाळावर जावून फडाचा आनंद घेण्यासाठी तयार होतात.

हळुहळू कुस्ती शौकीनांचा थवा मैदानात जमायला लागतो, हलगीचं कडकडणं जसं वाढायला लागतं तशी फडाला रंगत येते. हलगीचा आवाज ऐकताच जुन्या जाणत्या मल्लांच्या पण अंगावर शहारे येतात तरण्या पैलवानांचं अंग तापायला लागलतं. बारक्या जोडीतल्या पैलवानांचा चिगूर अख्खा फड व्यापून टाकतो. डाव प्रतिडावाची समज नसुनही आपणच जिंकणार या इर्षेनं जो तो चपळाईने लढत असतो.

हार जित न पाहता दोघं ही छोटे मल्ल अंगाची माती झाडत पंचाकडे बक्षिस घ्यायला जातात. आधी या मल्लांना मैदानात फोडलेला नारळ बक्षिस म्हणून मिळायचा. नंतर चिल्लर मिळायला लागली. अलीकडे त्यांना दहा, वीस, पन्नासच्या नोटा मिळायला लागल्या. पैसे हातात पडताच आनंदाचा डोह होतो. आपण अफाट काही तरी कमवलंय असं या पोरांना जाणवायला लागतं. अंगावर कपडे चढवून थेट ही पोरं यात्रेत हुदडायला निघतात.

पुढे मध्यम चटकदार लढती रंगायला लागतात. मोठ्या जोडीतल्या पैलवानांच्या लढतीने डोळ्याचे पारणे फिटते. परगावच्या पैलवानानं चांगली कुस्ती मारताच गावातल्या अनेक कुस्तीशौकींनाचा हात खिश्यात जातो. बक्षिस देवून त्याच्या खेळाचं कौतूक होतं. पराभूत मल्लाला देखील ठरलेल्या इनामातली वीस टक्के रक्कम देत त्याची कदर केली जाते.

फडाचा मध्यांतर होताच गावच्या मल्लांची कुस्ती लागते. आपल्या गावचा पोरगा जिंकावा असं भैरुबाला, पठाण सायबाला साकडच जणू गावकरी घालतात. झुंज सुरु होते. गावचा पैलवान म्हणजे गावचं नाक. गावची शान. ही शान टिकलीच पाहिजे अशी मनोमन सर्वांची इच्छा. प्रतिस्पर्धी मल्ल गावच्या मल्लावर ताबा मिळवतो. अख्या फडात शांतता पसरते. फक्त कुस्ती निवेदकाचा आवाज सुरु असतो.

मल्लांच्या ह्रदयाच्या बरोबरीने कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची ही धडधड वाढायला लागते. तोवर गावचा मल्ल कब्जा सोडवतो. आपल्या स्पर्धकावर आक्रमण करत ढाक लावतो. त्याला आस्मान दाखवतो. अख्या मैदानात जल्लोष होतो. गावकरी आपल्या मल्लावर बक्षिसाची खैरात करतात. त्या मल्लाच्या दोन्ही हातात नोटा मावत नाहीत इतकं बक्षिस जमा होतं. वर्षभर घामाचा चिखल करुन केलेल्या कष्टाचं चिज झाल्याची भावना गावच्या मल्लाच्या मनात अवतरते.

पुढे दिवस मावळतीला जातो. अंधार होताच शेवटची कुस्ती पार पडते. मैदानात जोरात चांगभलंचा जयघोष होतो व फड संपतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT