Fakiriche Vaibhav Book Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review: वाचकांचा ताबा घेणारे आत्मकथन

Fakiriche Vaibhav Book: "फकिरीचे वैभव" हे विजय विल्हेकर यांचं आत्मकथन आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन ते एका चळवळीचं आणि कार्यकर्त्याच्या समर्पणाचं जिवंत चित्रण करते. इंद्रजित भालेराव यांनी केलेलं हे परीक्षण वाचकांना आतून हलवून टाकणारं आहे.

Team Agrowon

इंद्रजित भालेराव

पुस्तकाचे नाव : फकिरीचे वैभव - एका कार्यकर्त्याचे वेदनाकथन

लेखक : विजय विल्हेकर

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

पाने : २२९

किंमत : २५० रु.

मी शेतकरी संघटनेचा बिल्लाधारी कार्यकर्ता कधीच नव्हतो. पण माझ्या वर्तमानातली, माझ्या आस्थेच्या विषयावरची ती सगळ्यात मोठी चळवळ होती. शेतकरी संघटनेच्या विजय विल्हेकर यांनी लिहिलेले आत्मकथन वाचून मला फार आनंद झाला. या आत्मकथनात लेखकाने स्वतःविषयी कमी आणि शेती, शेतकरी, चळवळ आणि कार्यकर्ते यांच्याविषयी जास्त लिहिलेले आहे. त्यांनी स्वतःला चळवळीत विरघळून टाकलेलं आहे. त्यामुळं त्यांना जरी वाटत असलं की आपण आत्मकथन लिहीत आहोत तरी ते चळवळकथन म्हणूनच लेखनात उतरलं जातं.

विल्हेकर संकटात सापडलेल्या माणसासाठी जीव तोडून मदत करतात, डोकं लढवतात, मार्ग काढतात, काहीही करून समोरच्याला संकटमुक्त करतात. त्यासाठी ते भांडतात, संघर्ष करतात, भीक मागतात. विल्हेकर नेत्याचा आदेश नसतानाही, चळवळी बाहेरच्याही काही गोष्टी करतात. पण त्यांच्या कृतीत इतका निर्मळपणा असतो की, त्यामुळं चळवळ बदनाम होण्याऐवजी सुप्रसिद्ध होते.

शेतकरी चळवळीत मी असे अनेक कार्यकर्ते पाहिले आहेत, ज्यांना आवरता आवरता शरद जोशी यांच्या नाकी नऊ यायचे. विल्हेकर म्हणजे सुशिक्षित गाडगेबाबाच! योगायोगानं गाडगेबाबांच्याच परिसरात ते जन्मले. कदाचित तो त्या मातीचाच गुण असावा. तेच भारावलेपण, तेच झोकून देणं, तीच समर्पणमती, तेच अवलियापण, तीच तळमळ. यानं कितीएक मरताना वाचवले, यानं कित्येकांची दुखणी बरी केली, कित्येकांची मनं दुरुस्त केली. त्यात त्यांच्या चळवळीचे नेते शरद जोशीही येतात. त्यांच्याकडून शिकता-शिकता एखादी गोष्ट त्यांनाही शिकवणारा हा माणूस.

शेतकरी प्रश्‍नांविषयीची तडफ कशी असावी, कुणबीकीसाठी कसं तडफडावं असं जर मला कोणी विचारलं तर मी म्हणेल विजय विल्हेकर यांच्यासारखं. किर्तन ही जशी गाडगेबाबांची ताकद होती, तेच त्यांचं हत्यार होतं; तसं गाणं ही विल्हेकरांची ताकद आहे. विल्हेकर चळवळीत तर गाणी म्हणतातच, पण ते इतरत्रही सतत गाणी म्हणतात. रेल्वेत गाणी म्हणून पैसे गोळा करतात आणि एका आजाऱ्याची सोय करतात. इतकंच नाही, तर आपल्या गाण्यातून एका खतरनाक गुंडालाही माणुसकीचा पाझर फोडतात. आणीबाणीत जेलमध्ये गेल्यावर गाणं म्हणून जेलरचं मन जिंकतात आणि त्याचा उपयोग पुढं संघटनेच्या एका कोवळ्या कार्यकर्त्याला झालेल्या शिक्षेतून सवलत मिळविण्यासाठी करतात.

लिहिता लिहिता विल्हेकर तात्त्विक पातळीला पोहोचतात. त्यातूनच या लेखनात अनेक ठिकाणी तत्त्वज्ञान स्रवायला लागतं. या माणसाचं वाचन खूप आहे हे तर जाणवतच पण गाडगेबाबांसारखं उपजत शहाणपण आणि तत्त्वचिंतनात डुंबून जाण्याची एक वृत्तीही आहे. त्यामुळेच हे लेखन अनेक ठिकाणी तात्त्विक पातळी गाठतं. हे आत्मकथन वाचताना आणखी एक गोष्ट लक्षात येते, की विल्हेकर अनेक शब्द घडवतात. दोन शब्दांच्या जोडणीतून हे शब्द तयार होतात. या पुस्तकातले जवळ जवळ दहा टक्के शब्द विल्हेकरांनी असेच घडवलेले आहेत. उदा. मित्रभेद, शिवीसल, रागगुण, जीवगुंता, बापदोस्त, शब्दभांडण, मित्रमार्ग, मित्राकांक्षा, बापनिमित्त, मित्रदुर्गुन, घाणप्रपंच, स्वखुलासा, वेदनासल, कष्टकर्तव्य, कष्टयोग इ.

प्रसंगातलं नाट्य हेरून ते नेमक्या शब्दात पकडण्याची लेखनकला विल्हेकरांजवळ आहे. त्यामुळे लेखन वाचनीय होतं. त्यांच्या लेखनातलं हे लालित्य मराठीतल्या भल्याभल्यांजवळ नाही. काही प्रकरणं अतिशय उत्कट उतरली आहेत. त्यात कार्यकर्त्यांच्या मुलांविषयीचं प्रकरण आहे, कार्यकर्त्यांच्या बायकांविषयीचं प्रकरण आहे. आई-वडिलांच्या निधनाविषयीचं, आत्महत्येच्या टोकावर गेलेल्यांना वाचवण्याविषयीचं तसंच शरद जोशी यांच्या निधनाविषयीचं शेवटचं प्रकरण. ही सारी प्रकरणं हेलावून सोडणारी आहेत. शरद जोशींशी त्यांचं नातं किती उत्कत होतं, याची अनेक उदाहरणे या आत्मकथनात सापडतात. त्यांच्या निधनाविषयीच्या प्रकरणाने विल्हेकरांनी आत्मकथनाचा शेवट केला आहे. जणू शरद जोशी गेले आणि विल्हेकरांचं भावविश्व संपलं. शरद जोशी यांच्या जाण्यानंतरची आपली भावना व्यक्त करताना त्यांनी अभंगाचा एक चरण उद्‌धृत केला आहे,

मरायचे नाही । घेवू आणाभाका ।

माझा मला धाक । आहे आता ।।

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT