
प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार
Bhartachya Mahila Shetkari Book :
भारताच्या महिला शेतकरी
लेखिका : मैत्रेयी कृष्णराज आणि अरुणा कांची
अनुवाद : डॉ. विजया साळुंके
प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली
पृष्ठे : १६५
किंमत : ९५ रुपये
भारतीय शेतीमध्ये महिलांचे मोलाचे योगदान असूनही आजवर ते वेगवेगळ्या कारणाने अदृश्यच राहिले आहे. विविध क्षेत्रांतील कणखर महिलांचे उल्लेख जितक्या प्रमाणात केले जातात, तेवढे श्रेय ग्रामीण शेतकरी महिलांना दिले जात नाही. याचा अनुभव समाजामध्ये काम करत असलेल्या मैत्रेयी कृष्णराज आणि अरुणा कांची यांना सतत येत होता. या अनुभवावर आधारित लेखनाचेच ‘भारताच्या महिला शेतकरी’ हे इंग्रजी पुस्तक. डॉ. कृष्णराज या मुंबईच्या नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्राच्या निवृत्त संचालक आहेत. तर अरुणा कांची या सार्वजनिक वित्त या विषयातल्या तज्ज्ञ असून, विकासाच्या धोरणांचा लिंगभावावर होणारा परिणाम या विषयाच्या अभ्यासक आहेत. या पुस्तकाचा अनुवाद डॉ. विजया साळुंके यांनी केला आहे.
या पुस्तकात भारतातल्या महिला शेतकऱ्यांच्या स्थितीचा आढावा लिंगभाव विषमता, कृषी क्षेत्रातील स्त्री रोजगाराची सर्वसामान्य स्थिती, महिला शेतकऱ्यांची ‘अदृश्यता’, न्याय्य हक्क आणि सुलभतर प्रवेश, लिंगभाव आणि धोरण या प्रकरणांमधून घेतला आहे. शेतीचा शोध स्त्रीनेच लावला आणि शेतीत स्त्रियांचं योगदान अनादि काळापासून खूप महत्त्वाचे असूनही शेतकरी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर पुरुषाचीच छबी उभी राहते. खरेतर घरातील सर्व जबाबदाऱ्या निभावून पुन्हा सहयोगी शेतकरी, कौटुंबिक शेतमजूर, रोजंदारी शेतमजूर, व्यवस्थापक आणि पूर्ण वेळ शेतकरी अशा विविध जबाबदाऱ्या स्त्रिया निभावत असतात.
निवडक बी बियाणे जपण्यासोबतच देखभाल, साठवण ही कामे प्रामुख्याने स्त्रियांच करतात. फलोत्पादन, पशुपालन, मत्स्यपालन अशी शेतीपूरक कामांतही त्याच्याच मोलाचा वाटा असतो. पुरुषमंडळी संधीच्या शोधात शेतातून बाहेर जात असून, शेतीचे भवितव्य स्त्रियांच्याच हाती असल्याचे प्रतिपादन लेखिका करतात. मात्र सार्वजनिक व धोरणात्मक व्यवहारात शेतकरी म्हणून पुरुषाचीच प्रतिमा पुढे केलेली दिसते.
मिळणाऱ्या शेती उत्पन्नात महिलांच्या श्रमाचे योगदान असले तरी त्यावर त्यांचा हक्क आणि त्याच्या खर्च संदर्भातील स्वायत्तता ही प्रदेशनिहाय व लोकसमूहांप्रमाणे भिन्न असली ती सामान्यतः शून्य ते अल्प दिसून येते. स्त्रियांना फक्त वारसा हक्कानेच जमिनीची मालकी मिळते. त्यातही बहुतांश स्त्रिया माहेरचा आधार कायमचा तुटेल या भीतीने कायद्याचा आधार घ्यायचा टाळतात.
एकूण ग्रामीण महिलांपैकी तीन चतुर्थांश स्त्रिया शेतीमध्ये काम करतात. मात्र त्यांना पुरुषांपेक्षा नेहमीच कमी मजुरी दिली जाते. घरातल्या कष्टदायक व दिवसभर राबविणाऱ्या कामांची मोबदला कधीही मोजला जात नाही. अशा प्रकारे प्रत्यक्षात भरपूर काम करूनही अधिकृत सांख्यिकी सामग्रीत त्यांचे काम ‘अदृश्य’ असते. १. हंगामी आणि विखंडीत स्वरूपाचे काम, २. बहुतांशी कामे विना मोबदला व कौटुंबिक स्तरावरील असतात, ३. पुरुषप्रधान समाजरचनेमध्ये स्त्रियांच्या कामाची दखल किंवा नोंदच घेतली जात नाही, ४. ‘काम’ म्हणजे नक्की काय, या बाबत नोंद घेणाऱ्यांची असलेली मर्यादित कुवत असे काही प्रमुख घटक महिला शेतकऱ्यांच्या अदृश्यतेला कारणीभूत ठरत असल्याचे लेखिका नोंदवतात.
जमिनीचा अधिकार, संयुक्त वनव्यवस्थापन, पाणलोटक्षेत्र व्यवस्थापनात स्त्रियांची भागीदारी, पाण्यावरील महिलांचा अधिकार, बचतीतून वाढलेली पत, आधुनिक यंत्रे व तंत्रज्ञान, माहिती व संप्रेषण इ. घटकांमुळे शेतकरी स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आलेले दिसतात. ‘शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय धोरण’चे अध्यक्ष डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या मते, ‘‘पुरुषांच्या स्थलांतरामुळे शेती महिलाधिष्ठित होत आहे म्हणून लिंगभाव संवेदनशील शेती आणि पत धोरण याकडे विशेष लक्ष पुरवण्याची आवश्यकता आहे.
त्याचे पालकत्व कृषी व्यवसाय आणि सर्व सेवांच्या संदर्भातील संशोधन, विकास आणि विस्तार कार्यक्रम यांच्याकडे असावे.’’ या पुस्तकात भारतीय शेती क्षेत्र, शेतकरी आणि शेती क्षेत्रातल्या स्त्रिया यांच्या एकमेकांशी असलेल्या सहसंबंधांची आकडेवारीच्या साह्याने अभ्यासपूर्ण मांडणी केलेली असल्यामुळे सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासकांसाठीचा हा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज ठरतो. त्याचे प्रकाशन २०१३ मधील असून, त्यानंतर आता एक तप उलटून गेले असून, या काळातील बदलांचाही असाच आढावा घेण्याची गरज वाटते.
(लेखक स्त्री प्रश्नाचे अभ्यासक आहेत.)
- प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.