Watershed Development  Agrowon
ॲग्रो विशेष

Watershed Development : पाणलोट कामांनी झाला अंबोडाचा कायापालट

 गोपाल हागे

Watershed Management : बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा तालुका मुख्यालयापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर अंबोडा गाव आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या गावात साधारणतः पाचशे कुटुंबे राहतात. सन २०१८ व २०१९ मध्ये गावाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. या कालावधीत गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यायचा.

गावात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर होती. परंतु गावाला पुरेल इतकेही पाणी नव्हते. गावशिवारात असलेल्या विहिरीही सुमारे ७० ते १०० फूट खोल आहेत. सन २०१८ च्या सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात विहिरींना अवघे काही फूटच पाणी असल्याचे आढळले. मार्च- एप्रिलमध्येही त्या कोरड्या पडायच्या. पावसावर आधारित पीकपद्धती असल्याने रब्बीत जेमतेम लागवड क्षेत्र असायचे. फळबागा तर नव्हत्याच.

अंबोडा गावावर शिक्कामोर्तब

सन २०१८ मध्ये ‘नाबार्ड’ (पुणे)कडून पाणीटंचाई ग्रस्त गावात पाणलोट कामे करण्याच्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यासाठी प्रकल्प देण्यात आला. त्यासाठी कृषी विभागाचे ना हरकत पत्र आवश्‍यक होते.

चर्चेतून मौजे अंबोडा गावाची शिफारस झाली. ‘नाबार्ड’ सह बुलडाणा येथील भारतीय बहुउद्देशीय लोक शिक्षण संस्थेच्या प्रतिनिधींनीही गावाला भेट दिली. ग्रामस्थांनीही प्रकल्पासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. अखेर जानेवारी २०१९ मध्ये नाबार्डकडून गावाच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.

अल्पावधीत पहिला टप्पा पूर्ण

सुमारे १०५० हेक्टर आणि एक कोटी ३४ लाख ७६ हजार किमतीच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. सन २०१९ मध्ये जानेवारी ते जून कालावधीत किमान १०० हेक्टरमध्ये पाणलोट विकासाची कामे करण्याचे नियोजन झाले. त्यानुसार बांधबंदिस्ती, सलग चर, ‘लूज बोल्डिंग, वीस ‘स्प्रिंकलर’ संच आणि ग्रामपंचायतीच्या सामुहीक विहिरीचे खोलीकरण अशा कामांचा क्षमता बांधणी टप्पा पूर्ण झाला.

सुमारे १०० हेक्टरवर झालेल्या कामांमधून पहिल्याच वर्षी परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ झाली. मार्च २०२० मध्ये उर्वरित मुख्य टप्प्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. प्रकल्प नेमका कोरोनाच्या काळात सुरू झाला होता. काम नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह अडचणीचा झाला होता. अशा संकटात कोरोनाच्या नियमांचे पालन करीत गावातील मजुरांना गावातच कामे उपलब्ध करून देण्यात आली.

प्रकल्पात झालेली कामे

सलग चर- ११९६.

मोठे चर- १९६०

गली प्लग- २४

लूजबोल्ड स्ट्रक्चर- ११

बांधबंदिस्ती- ३३,९०० घनमीटर

शेततळी- १४

सिमेंट बंधारे- २

सामूहिक विहिरींचे खोलीकरण.

हवामान बदल कार्यक्रम (Climate Proofing Intervention)

स्प्रिंकलर, ठिबक ५१ जणांना, तर रेनपाइपचा ८० शेतकऱ्यांना लाभ. व्हर्मी कंपोस्ट- ४०, जनावरांसाठी लोखंडी शेड ६ घरगुती सौरऊर्जेवरील दिवे- ५२ फवारणी पंप ३०

मागील तीन वर्षांत ३०० हून अधिक शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, ज्वारी, कपाशी, हरभरा, गहू आदींच्या बियाण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

‘नाबार्ड’चे बुलडाणा जिल्हा विकास व्यवस्थापक रोहित तातेराव गाढे यांचे प्रकल्पासाठी सहकार्य मिळाले.

कामांचे झालेले फायदे

बंद पडलेले सर्व बोअरवेल्स सुरू झाले. गावाच्या मध्यभागी असलेला हातपंप मे महिन्यातही संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करीत आहे. त्यातून उन्हाळ्यातही जनावरांसाठी पाणी उपलब्ध होत आहे.

गावातील विहिरींची पाणीपातळी १ ते २ मीटरपर्यंत वाढली आहे.

पूर्वी ग्रामस्थांना आपल्याकडील पशुधनाची विक्री करण्याची वेळ आली होती. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी आता दुधाळ जनावरे घेतली आहेत. गावात दररोज ३०० लिटरपर्यंत दूध संकलन होते.

५० टक्क्यांहून अधिक शेतकरी स्प्रिंकलर, ठिबकचा वापर करीत आहेत. ६० ते ७० टक्के शेतकरी रब्बी पिके घेतात. उन्हाळी हंगामातही भाजीपाला व फळवर्गीय पिके घेणे शक्य झाले आहे. संत्रा, पेरू, पपई, लिंबू आदी फळबागा लागवडीसाठी शेतकरी पुढे आले आहेत. कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण व आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

जिवामृत निर्मितीसाठी प्रोत्साहन, गांडूळशेतीचे ‘बेड्‌स’, ६० स्प्रिंकलर-ठिबक संच, ८० रेन पाइप शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.

महिला आणि भूमिहीन घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी १२ लाखांचा निधी तसेच लघू व्यवसायासाठी अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. यात लाभार्थ्यांचा हिस्सा ३० ते ५० टक्के राहणार आहे.

माझी पाच एकर शेती असून ८२ फूट खोल विहिरीला पूर्वी मेमध्ये एक थेंबही पाणी राहत नव्हते. जलपुनर्भरण, बांधबंदिस्ती अशी कामे झाल्याने विहिरींना आज ६० फुटांपासून पाणी आहे. पाण्याची उपलब्धता झाल्याने संत्रा लागवड केली आहे. त्यात सोयाबीन, तुरीचे आंतरपीक घेत आहे.

रघुनाथ बावस्कर

विजय राठोड ७५८८८०१४६७

(भारतीय बहुउद्देशीय लोक शिक्षण संस्था, बुलडाणा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

SCROLL FOR NEXT