Watershed Development : पाणलोट क्षेत्र विकासातील लोकसहभागाचा निर्देशांक

Watershed Management : मागील लेखापासून आपण पाणलोट क्षेत्र विकासातील लोकसहभागाचा निर्देशांक समजून घेत आहोत. त्यासाठी उदाहरण म्हणून हिवरे बाजार या आदर्शगावाची माहिती घेऊ.
Hivare Bajar Gaon
Hivare Bajar GaonAgrowon

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

Index of People's Participation in Watershed Development : मागील लेखापासून आपण पाणलोट क्षेत्र विकासातील लोकसहभागाचा निर्देशांक समजून घेत आहोत. त्यासाठी उदाहरण म्हणून हिवरे बाजार या आदर्शगावाची माहिती घेऊ.त्या आधारे सूत्रातील नमूद निकष उदा. लोकसहभाग, व्यवहारातील पारदर्शकता, पाणलोट क्षेत्र विकास आराखडा तयार करणे, पाणलोट क्षेत्रामधील लाभार्थ्यांची संस्थात्मक रचना, पाणलोट विषयक बैठका, जमाखर्च तपशील, संनियंत्रण व बहिर्गमन धोरण, सामूहिक नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण, पाणलोट विकास समिती आणि समानता या आधारे तपासून पाहणार आहोत.

हिवरे बाजार हे गाव सह्याद्रीतील पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते. येथे पडणारा पाऊस अत्यल्प आहे. परिणामी कोरडवाहू शेती, नैसर्गिक साधन संपत्तीची कमतरता यासोबतच अन्य सामाजिक समस्याही तीव्र होत्या. १९८९ मध्ये पोपटराव पवार पहिल्यांदा सरपंच झाले. त्यावेळी गावातील या समस्यांवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामसभा घेण्यात आली. कामामध्ये वनीकरणापासून सुरुवात झाली. गावातील मोडकळीस आलेली प्राथमिक शाळा लोकसहभागातून करण्यात आली. पुढे आदर्श गाव योजना राबवत त्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापनाची कामे सुरू केली. यामध्ये ‘माथा ते पायथा’ या पाणलोट शास्त्राच्या नियमाचे तंतोतंत पालन केले. पाणलोट कामासाठी निधी कमी पडला तर विविध शासकीय योजनांचे एकत्रिकरणातून निधी उपलब्ध करण्यात आला. लोकसहभागातून सर्व कामे पूर्ण केली.

जलसंकल्प

हिवरे बाजार गावात प्रतिवर्षी पाण्याचा ताळेबंद ग्रामसभेमध्ये सादर करण्यात येतो. उपलब्ध जलसाठ्याच्या आधारे पावसावर आधारित पिकांची पेरणी करण्याबाबत ग्रामसभा निर्णय घेते. हे सर्व निर्णय शेतकरी स्वीकारतात. हिवरे बाजार मधील सन २०२३ मधील पावसाची सरासरी ५३८ मिलिमीटर इतकी होती. त्या माध्यमातून जवळपास ५२५.१५ कोटी लिटर इतका जलसाठा प्राप्त झाला. या जलसाठ्याची विगतवारी तक्ता १ मध्ये दिली आहे.

खाली नमूद जलसंकल्पाप्रमाणे हिवरेबाजारमध्ये जल व्यवस्थापनाची काळजी घेतली जाते. त्यासाठी लोकसहभागातून व्यवस्थापनाची तत्त्वे गावानेच तयार केलेली आहेत. अशी व्यवस्थापनाची तत्त्वे भारतातील अन्य कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये फारशी दिसत नाहीत. यामुळेच हिवरेबाजारमधील विकास गेली ३५ वर्षे शाश्वत टिकून आहे.

Hivare Bajar Gaon
Watershed Development : पाणलोट क्षेत्र विकासातील लोकसहभागाचा निर्देशांक

वनग्राम समितीने गावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अपधाव क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र व साठवण क्षेत्र अशा तीन भागांमध्ये विहिरी निश्चित केल्या आहेत. दर महिन्याला १ व १६ तारखेला विद्यार्थ्यांद्वारे विहिरीतील पाणी पातळी मोजली जाते. एखाद्या वर्षी पर्जन्याची सरासरी कमी जास्त होईल, त्याप्रमाणे आणि विहिरीतील पाणी पातळीवर आधारित जलसंकल्प तयार केला जातो. त्यात ग्रामसभेत पिकांची निवड व पेरणी बाबत निर्णय घेतला जातो.

वरीलपैकी कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही विहिरीमध्ये उन्हाळ्यामध्ये एक मीटर इतकीच पाणी पातळी शिल्लक राहिल्यास पाणी उपसा पूर्णपणे बंद करण्यात येतो. हा जलसाठा पिण्यासाठी व जनावरांसाठी शिल्लक ठेवला जातो. २०१८ या वर्षी परिसरामध्ये अशी परिस्थिती आली होती. जेमतेम पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र त्यानंतरच्या सर्व पेरण्या थांबविण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये सरपंच पोपटराव पवार यांनी ग्रामस्थांना समजावून सांगत घेतला. वरवर विचार करता आर्थिकदृष्ट्या अडचणीचा वाटणारा हा निर्णय फलदायी ठरला. कारण शेतकऱ्यांचे मशागत, बियाणे व खतांचे पैसे वाचले.

हिवरे बाजारमध्ये १६.८ कोटी लिटर इतके पाणी भूपृष्ठांतर्गत साठवून ठेवण्यात येते. यातच या गावाची शाश्वतता दिसून येते. शिवाय हिवरे बाजारमध्ये आजही पारंपारिक पीक पद्धती दिसून येते. इतर गावांमध्ये सर्व जलसंधारणाच्या कामानंतर शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेनंतर नगदी पिकास प्राधान्य देतात. या पिकांसाठी भूपृष्ठावरील आणि खालील दोन्ही पाणी अमर्याद वापरले जाते. परिणामी पाणलोट कामांचा परिणामच संपून जातो. जलसंकट ‘जैसे थे’ परिस्थितीला येते.

तक्ता १ : हिवरे बाजार मध्ये प्रतिवर्षी

पाण्याचा ताळेबंद

हिवरे बाजार जलसाठा जलसाठा कोटी लिटर

उपलब्ध अपधाव ५२५.१५

अ. उपलब्ध पाण्याचे वर्गीकरण

बाष्पीभवनाद्वारे उडून जाणारे पाणी १८३.८०

भूपृष्ठावरील अपधाव ४२.०१

भूजल पुनर्भरण ८९.२८

जमिनीतील आर्द्रता १५७.५४

भूपृष्ठावरील जलसाठ्यांमधील उपलब्धता ५२.५१

पाणलोट क्षेत्र उपचारांमधून मिळणारे पुनर्भरण ५०.७८

ब. वापरासाठी एकूण उपलब्ध पाणी ३५०.११

क. गावासाठी आवश्यक असणारे पाणी

पिण्यासाठी आवश्यक असणारे पाणी (मानवी गरज व जनावरे) ७.७१

शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी ३१८.६१

खरीप पिके ८७.७

रब्बी पिके १७८.००

उन्हाळी पिके १५.७

वार्षिक ३७.२०

इतर वापरासाठी आवश्यक पाणी ७.००

ड. भविष्यासाठी संवर्धित जलसाठा

उपलब्ध पाणी- आवश्यक पाणी

(३५०.११ - ३३३.३२) १६.८

(संदर्भ : हिवरे बाजार ग्रामपंचायत अहवाल, २०२३)

Hivare Bajar Gaon
Watershed Development : वनस्पती आच्छादनाच्या बदलाचा निर्देशांक

१०

∑ मोजलेले गुणांकन

i = १

लोक सहभागीय पाणलोट विकास निर्देशांक (PWDI) = X १००

१०

∑ सर्वाधिक मिळालेले गुण

i =१

निर्देशांक क्रमांक २ ः

मोजलेले गुणांकन

= X १००

सर्वाधिक मिळालेले गुण

(दुरुस्ती ः मागील लेखामध्ये अनवधानाने गणितीय सूत्रांमध्ये चूक राहिली होती. कृपया या लेखांतील वरील सूत्रांचाच संदर्भ आणि अभ्यासासाठी वापर करावा.)

वर नमूद लोकसहभागी पाणलोट क्षेत्र विकास निर्देशांक व प्रकल्प पश्चात पाणलोट क्षेत्रातील विस्मयकारी बदलांचा निर्देशांक या दोन्ही निर्देशांकांची किंमत ० ते १०० यादरम्यान कितीही येऊ शकते. ती जेवढी जास्त किंमत, तेवढा जास्त लोकसहभाग आणि त्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचे शाश्वत व्यवस्थापन असा अर्थ निघतो.

हिवरे बाजारचा हा निर्देशांक १०० इतका निघतो. याचाच अर्थ या गावामध्ये योग्य पाणलोट व्यवस्थापनातून उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर ग्रामस्थांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केला जातो. यामुळे हिवरे बाजारची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती अन्य कोणत्याही गावापेक्षा प्रगत आहे. आपण तुलनेसाठी तडसर (ता. कडेगाव, जि. सांगली) या गावाचे उदाहरण घेऊ. या गावात हा निर्देशांक ७८ इतका नोंदविला आहे.

म्हणजेच पाणलोट व्यवस्थापनाच्या सर्वच घटकांमध्ये हिवरे बाजारच्या तुलनेमध्ये तडसर ग्रामस्थांचा कमी लोकसहभाग दिसून येतो. दुसरी एक बाब म्हणजे तडसर या गावामध्ये ऊस हे प्रमुख पीक आहे. पाणलोटाच्या कामांनंतरही पुढील पीक पद्धती व व्यवस्थापनात मागे पडल्यामुळे २०२४ च्या उन्हाळ्यामध्ये तडसरमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाणलोट क्षेत्राच्या कामातून शाश्वत विकासासाठी लोकसहभागातून पुढील व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे यातून स्पष्ट होते.

तक्ता २ : हिवरेबाजार आणि तडसर गावांची लोक सहभागाची तुलनात्मक आकडेवारी व निर्देशांक

निर्देशांकातील घटक लोक-सहभाग व्यवहारातील पारदर्शकता पाणलोट क्षेत्र विकास आराखडा तयार करणे पाणलोट क्षेत्रामधील लाभार्थ्यांची संस्थात्मक रचना पाणलोट विषयक बैठका जमा खर्च तपशील संनियंत्रण व बहिर्गमन धोरण सामूहिक नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण पाणलोट विकास समिती आणि समानता

गाव ः हिवरे बाजार गावातील लोकसहभाग

मोजलेले गुणांकन १० १० १० १० १० १० १० १० १० १०

सर्वाधिक मिळालेले गुण १० १० १० १० १० १० १० १० १० १०

लोकसहभागामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला विस्मयकारी बदलाचा निर्देशांक २ (PPDI) १०० १०० १०० १०० १०० १०० १०० १०० १०० १००

लोक सहभागीय पाणलोट विकास निर्देशांक (PWDI) (१० + १० + १० + १० + १० + १० + १० + १० + १० +१०)

(१० + १० + १० + १० + १० + १० + १० + १० + १० + १०)

गाव ः तडसर गावातील लोकसहभाग

मोजलेले गुणांकन ८ ९ १० ९ ९ ७ ५ ६ ६ ९

सर्वाधिक मिळालेले गुण १० १० १० १० १० १० १० १० १० १०

लोकसहभागामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला विस्मयकारी बदलाचा निर्देशांक २ (PPDI) ८० ९० १०० ९० ९० ७० ५० ६० ६० ९०

लोक सहभागीय पाणलोट विकास निर्देशांक (PWDI) (८ + ९ + १० + ९ + ९ + ७ + ५ + ६ + ६ + ९)

(१० + १० + १० + १० + १० + १० + १० + १० + १० + १०)

डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे)

डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

(हा लेख लिहिण्यासाठी पद्मश्री श्री. पोपटराव पवार, श्री. दीपक पवार, श्री. हबीब सय्यद आणि हिवरे बाजार ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने मोलाची मदत केली आहे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com