Pune News : राज्य सरकारने अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजनेतून जुलैपासून महिलांना १५०० रुपये महिना मिळणार आहेत. योजनेचे अर्ज भरण्यासाठी सध्या सर्वांचीच लगबग सुरू आहे. तरीही आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि अपात्रता, अर्ज कसा भरावा, याविषयी मोठा संभ्रम आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेनुसार २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटीद्वारे महिन्याला १,५०० रुपये जमा होतील. ही योजना जुलै महिन्यापासूनच सुरू करण्यात आली आहे.
महिला इतर योजनांचा फायदा घेत असतील तर?
राज्यात अनेक महिलांना पीएम किसान, संजय गांधी निराधार योजना आणि इतर योजनांमधून थेट आर्थिक मदत मिळत असते. एखाद्या महिलेला केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे १,५०० रुपयांपेक्षा कमी पैसे मिळत असतील तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.
उदा. एखाद्या महिलेला केंद्र किंवा राज्य शासनाच्या योजनांमधून १००० रुपये मिळत असतील आणि त्या महिलेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला तर त्या महिलेला ५०० रुपये मिळतील. पण जर त्या महिलेला आधीच १५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपये मिळत असतील तर ती महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
...या निकषपात्र महिलांना मिळेल लाभ
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी
- किमान वयाची २१ वर्षे पूर्ण असावीत. कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभ मिळेल
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील एक अविवाहित महिला लाभासाठी पात्र राहील
- बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी ज्यांचे उत्पन्न २.५ लाखांपर्यंत आहे, त्या कुटुंबातील महिलांनाही लाभ मिळेल
- लाभ घेण्यासाठी अर्जदार लाभार्थ्यांचे बँक खाते असावे
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे
- पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्राच्या अटीतून वगळले आहे म्हणजेच यांना उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार नाही.
...या महिला पात्र ठरणार नाहीत
- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे
- ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहने कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नसावीत
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे
- कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे, किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तिवेतन घेत नसावेत.
- शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे महिन्याला १,५०० किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा.
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार नसावा
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत, अशा महिला
आवश्यक कागदपत्रे
- ऑनलाइन अर्ज
- आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. पण जर महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. परराज्यातील महिलेने राज्यात अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्या महिलेने पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र सादर करावे.
- सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा २.५ लाखांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला. पण पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही
- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्ड
- योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
...असा करा अर्ज
- योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. त्यासाठी ऑनलाइन पोर्टल, मोबाईल अॅपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राव्दारे अर्ज भरता येईल
- अंगणवाडी केंद्रात, तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी, ग्रामीण आणि आदिवासी), ग्रामपंचायत, वॉर्ड, सेतू सुविधा केंद्रांमध्ये अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध
- महिलांनी भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी, ग्रामीण आणि आदिवासी), सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल. तसेच प्रत्येक यशस्वीरीत्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
- अर्जदार महिलेने स्वतः अर्ज भरताना उपस्थित राहणे आवश्यक. जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल. यासाठी महिलेने अर्ज भरताना रेशनकार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे.
...असा करावा अॅपद्वारे अर्ज
- गुगल प्ले स्टोअरवरून मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्राचे नारीशक्ती दूत अॅप डाऊनलोड करावे.
- माबाईल क्रमांक टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन करावे. त्यानंतर नाव, ईमेल, जिल्हा, तालुका आणि नारीशक्ती पर्याय निवडून प्रोफाइल तयार करावे
- अॅपच्या होमपेजवर जाऊन ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन अर्ज उघडावा.
- त्यानंतर आवश्यक सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर माहिती जतन करून अर्ज पुन्हा चेक करून सबमीट करावा
- अर्ज भरण्याआधी आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बॅंक पासबुक, महिलेचा जन्म परराज्यातील असेल तर पतीची कागदपत्रे, अर्जदाराचा फोटो
ऑनलाइन अर्जाची नाही सुविधा
सरकारने ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज भरण्याची सुविधा असल्याचे सांगितले. पण सध्या तरी पोर्टलद्वारे अर्ज भरण्याची सुविधा सामान्य जनतेसाठी उपलब्ध नाही. ग्रामीण भागात ग्रामपंचायत, अंगणवाडी, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यामार्फत अर्ज स्वीकारणे सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र अॅप आणि सेतू सुविधा केंद्रे तसेच सीएससी केंद्रांवर अर्ज भरणे सुरू आहे.
आवश्यक तारखा
- अर्ज सादर करण्याची मुदत ः ३१ ऑगस्ट २०२४
- योजनेचा लाभ ः ०१ जुलै २०२४ पासून
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.