Air Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Air Pollution : सामूहिक प्रयत्नांतून करू वायू प्रदूषणावर मात

Air Pollution Problem : भारतामध्ये वायू प्रदूषणाची समस्या थंडीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवते. हवा प्रदूषणाचे सर्वांत घातक परिणाम मानवाच्या श्‍वसनसंस्थेवर होतात. त्याचे विपरीत परिणाम जमिनीवर व पिकांवर होतात.

Team Agrowon

India's Air Pollution : देशात मागील काही वर्षांपासून हवा प्रदूषण फारच वाढले आहे. मानव जातीला निरोगी राहण्यासाठी स्वच्छ हवा आवश्यक आहे. हवेच्या संरचनेतील बदल आरोग्यासाठी खूप गंभीर धोका मानला जातो. कोविड महामारीनंतर अनेकांना श्‍वसनाचा त्रास होत आहे.

वायू प्रदूषणामुळे मज्जासंस्था, श्‍वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, क्षयरोग आदी विकार वाढले आहेत. त्यात वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील वायू प्रदूषण दरवर्षी १२ कोटी लोकांचा बळी घेत आहे. हा एक प्रकारचा अदृश्य हत्याकांडच आहे जो लवकर थांबला पाहिजे.

मनुष्याचा निरंतर विकास होत आहे. मात्र पर्यावरणामधील हे असंतुलन या विकासमार्गात मोठा अडथळा निर्माण करीत आहे. भारतामध्ये वायू प्रदूषणाची समस्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवते. वायू प्रदूषणाकरिता कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये कार्बन, नायट्रोजन, सल्फर, सूक्ष्म कण यांचा समावेश आहे.

हे घटक वाहनांच्या इंधन ज्वलनातून, औद्योगिक प्रक्रियेतून, वीजनिर्मितीसाठी जाळल्या जाणाऱ्या कोळशापासून, बांधकामाच्या प्रक्रियेतून तसेच शेतातील उरलेल्या पदार्थांच्या जाळण्यातून निर्माण होतात आणि हवेत पसरतात. वातावरणाच्या कमी तापमानामुळे व हवेच्या कमी गतीमुळे ही प्रदूषित हवा जमिनीलगत स्थिरावते.

त्याचा दुष्परिणाम मनुष्याच्या तसेच इतर प्राणी व वनस्पतींवर होतो. प्रदूषणाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा खूपच जास्त झाल्याने जीवसृष्टीच्या जीवनास धोका निर्माण झालेला आहे. २०१७ मध्ये जगभरात प्रदूषणामुळे एक कोटीवर लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या काही भागांत कोविडचा नवा व्हेरियंट आला असे सांगितले जातेय. हवा प्रदूषणामुळे आजारी पडले असले तरी त्याला कोविड झाला असं दाखविले जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील दहा प्रदूषित शहरांपैकी नऊ शहरे भारतात आहेत. वायू प्रदूषणाची झळ जगातील अनेक देशांनी आणि त्या देशातील शहरांनी सोसली आहे. मात्र संकटावर परिश्रमपूर्वक उपायही शोधून काढला आणि नियंत्रण मिळविले आहे. लंडन शहराला १९५२ मध्ये औद्योगिक व वाहनांच्या प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या धुक्याचा सामना करावा लागला होता.

ग्रेट स्मॉग ऑफ लंडन’ म्हणून हे ओळखले जाते. त्यामुळे दृश्यमानतेत कमालीचे अडथळे निर्माण झाले. हजारो लोकांचा जीव गेला. तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. धूरविरहित इंधनाचा वापर करून स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यात आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. हवा प्रदूषणाचे सर्वांत घातक परिणाम श्‍वसनसंस्थेवर होतात.

विविध प्रदूषक घटक श्‍वसन व्यवस्थेवर हल्ला चढवितात. नायट्रोजन डायऑक्साइड हे फुप्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतो. फुप्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुप्फुस कमजोर करतो. त्यामुळे दमा वाढीस लागतो. नायट्रोजन डायऑक्साइड श्‍वसननलिकेत व फुप्फुसांत गेल्यानंतर फुप्फुसे व श्‍वसननलिका ते विरघळवण्यासाठी जास्तीत जास्त कफाची निर्मिती करतात. त्यामुळे आपणास सर्दी होते. ही सर्दी अनेक दिवसांची जुनी झाल्यास जिवाणूंचा संसर्ग होतो व परिस्थिती गंभीर होते.

कार्बन मोनॉक्साइड रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणाऱ्या हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनाऐवजी मिसळला जातो व शरीरातील सर्व भागांत पोहोचतो. हा वायू अत्यंत विषारी असून, काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो. केवळ मनुष्यच नव्हे तर निसर्गातील इतर घटकांवर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होतात.

सल्फर डायऑक्साइड व नायट्रोजन डायऑक्साइड यामुळे आम्लधर्मी पावसाची निर्मिती होते व त्याचा विपरीत परिणाम जमिनीवर व पिकांवर होतो. रबर ओझोनच्या संपर्कात आल्यामुळे ते कडक बनते व त्याचे आयुष्य कमी होते. मोठमोठ्या शहरांत होणारे सिमेंट रस्ते बांधणे थांबवले पाहिजे. रस्ता असावा पण त्यामुळे प्रदूषण होईल असे करून एक प्रकारे मृत्यूचा सापळा तयार केला जातो आहे.

भारतात गेल्या काही वर्षांत वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने अतिसूक्ष्म धूलिकणांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. शास्त्रीय नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या माहितीनुसार शहरातील PM१० (दहा मायक्रोमीटर व्यास अथवा त्यापेक्षा कमी) कणांत PM2.5 कणांचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.

हे प्रमाण दोन ते तीन दशकांपूर्वी ५ टक्क्यांपेक्षाही कमी होते. भारतातील सर्वच मोठी शहरे या प्रदूषणाच्या विळख्यात असून दिल्ली, कानपूर, पुणे व बंगलोर ही शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत मोडतात. सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांची आरोग्यासाठी मर्यादा काही तासांसाठी ५० पीपीएम (Parts per Million) इतकी आहे. परंतु वर नमूद केलेल्या शहरांत जवळपास वर्षातील सर्वच ३६५ दिवस ही मर्यादा ५० पीपीएम पेक्षा कितीतरी पटींनी अधिक असल्याचे आढळून आले आहे.

वायू प्रदूषणात प्रदूषके एकाच जागी तयार होतात. केंद्रीय उत्सर्जन (Point sources) अथवा सर्वत्र थोड्या थोड्या प्रमाणात सार्वत्रिक उत्सर्जन (Diffused sources) तयार होतात. केंद्रीय उत्सर्जन होण्याचे उदाहरण म्हणजे औद्योगिक ठिकाणे, वीजनिर्मिती कारखाने, तर सार्वत्रिक उत्सर्जनाचे उदाहरण आपली वाहतूक व्यवस्था धरता येईल. जर प्रदूषण एकाच जागी होत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे असते.

परंतु सर्वत्र थोड्या थोड्या प्रमाणात होणाऱ्‍या सार्वत्रिक उत्सर्जन प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे खूपच अवघड आहे. विविध प्रकारचे कडक नियम व कायदे यांनी औद्योगिक क्षेत्रातून होणाऱ्‍या प्रदूषणावर विकसित देशांत बऱ्‍याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. परंतु भारत व इतर विकसनशील देशांत अजूनही म्हणावे इतके यश मिळालेले नाही. कायद्याच्या कडक अंमलबजावणीतील त्रुटी, तंत्रज्ञान वापरण्याबद्दल असलेली आर्थिक उदासीनता (तंत्रज्ञान महाग पडते म्हणून न वापरणे) व माहितीचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत.

सार्वत्रिक उत्सर्जनाच्या प्रदूषणावर तंत्रज्ञानातील सुधारणा व ऊर्जेचा कमी वापर यातूनच अंशतः मात करता येते. या संकटावर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करायला हव्यात. वाहनांचा वापर कमी करण्याकरिता नागरिकांना शेअरिंगची सवय लावणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देणे, वाहतुकीकरिता कार्यक्षम इंधनाचा वापर, सायकलींचा वापर, रस्त्यांची देखभाल, सौरऊर्जेचा वापर, घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट यावर भर द्यायला हवा.

असे अनेक उपाय वायू प्रदूषण कमी करण्यास व त्यावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त आहेत. ही जबाबदारी एकट्या कोणाची नसून ती सामूहिक आहे. याकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल.

(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT