New Delhi News: कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भारतातील पहिल्या आधुनिक ऊसशेतीच्या बारामतीमधील क्रांतिकारक संशोधनाला पंतप्रधानांच्या कार्यालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बारामतीमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रयोग देशभर राबविण्याची ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि पंतप्रधानांच्या कार्यालयाने या संशोधनाचे सादरीकरण बघितल्यानंतर दिली.
बारामतीतील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक ऊसशेतीच्या प्रयोगाचे सोमवारी (ता. २१) कृषिमंत्री चौहान आणि पंतप्रधानांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले.
या वेळी ‘अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे विश्वस्त आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. मांगीलाल जाट, एडीटी बारामतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, शरद पवार यांचे स्वीय सचिव सिद्धेश्वर शिंपी, सेंटर ऑफ एक्सलन्स एआय बारामतीचे संशोधन समन्वयक डॉ. योगेश फाटके, ‘मॅप माय क्रॉप’चे संचालक स्वप्नील जाधव व राजेश शिरोळे, ‘मॅप माय क्रॉप’चे कृषितज्ज्ञ भूषण गोसावी, मायक्रोसॉफ्टच्या भारतातील कृषितज्ज्ञ आणि उद्योग संचालक सपना नौहरिया, मायक्रोसॉफ्टचे सार्वजनिक क्षेत्रातील संचालक अभिषेक बोस, मायक्रोसॉफ्टचे ‘डेटा’ आणि ‘एआय’चे तांत्रिक प्रमुख अजय बारुन, मायक्रोसॉफ्टचे गव्हर्नमेंट अफेअर्स प्रमुख संदीप अरोरा बैठकीत उपस्थित होते.
कृषिमंत्री बारामतीला भेट देणार
या सादरीकरणामुळे प्रभावित झालेले कृषिमंत्री चौहान तसेच पंतप्रधानांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बारामती येथे प्रत्यक्ष भेट देऊन हा प्रयोग बघण्याचे ठरविले आहे. ‘‘प्रत्येक क्षेत्रात सध्या कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून कृषिक्षेत्रही त्यापासून दूर राहू शकत नाही. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून तो देशभर राबविण्यात येईल,’’ अशी ग्वाही चौहान यांनी दिली. मायक्रोसॉफ्टचे चेअरमन व सीईओ सत्य नडेला यांनी बारामतीच्या या प्रयोगाच्या शेअर केलेल्या व्हिडिओची ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी दखल घेतली असल्याचे ऐकून शिवराजसिंह चौहान आणि पंतप्रधानांच्या कार्यालयाचे अधिकारी चकित झाले.
एक हजार शेतांमध्ये प्रयोग
ऊस शेतीमध्ये हवामान बदल, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), उपग्रह आधारित भौगोलिक प्रणाली (जीआयएस), मशिन लर्निंग अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यभरातील एक हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ही प्रणाली उसाच्या सहा जातींसाठी राबविण्यात आली असून, त्यामुळे उत्पादन वाढले आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ, उत्पादन खर्चात २० ते ४० टक्क्यांपर्यंत घट, तीस टक्के पाण्याची बचत, रासायनिक खतांच्या वापरात २५ टक्के घट, कापणी कार्यक्षमतेत ३५ टक्क्यांपर्यंत सुधारणा, रोगाच्या निरीक्षणामुळे औषधांच्या वापरात २५ टक्के बचत होणार आहे.
या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने उसाच्या एकरी उत्पादनात वाढ, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, मातीचे आरोग्यवर्धन, पाण्याचा अतिरिक्त वापर कमी होऊन सिंचन कार्यक्षमतेत वाढ, कीड, रोगांचे अचूक निदान असे ऊसशेतीमधील क्रांतिकारक बदल, लाभ अपेक्षित असल्याची माहिती कृषिमंत्री चौहान यांना देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.