Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : व्रत ः श्रमसंस्कृती जपण्याचे...

Agriculture : शेतकरी श्रमसंस्कृती जपत आहे म्हणून तर आपणां सर्वांना पोटभर अन्न मिळतेय आणि तो ठरतोय जगाचा पोशिंदा!

Team Agrowon

मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्‍वर्याचा राजा

इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा

आयुष्यभर शेतीत राबत चैतन्याच्या बागा फुलविणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनातील कृतार्थता कविवर्य ना. धों. महानोर यांची ही कविता रेखाटते. तसे पाहिले तर शेतकऱ्यांचे जीवन किती अभावग्रस्त आणि कष्टदायक आहे, याची कल्पना करवत नाही. परंतु जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन तेवढाच सकारात्मक आहे. जुने वर्ष सरते, नवे सुरू होते, शेतकऱ्यांची परिस्थिती मात्र बदलताना दिसत नाही, उलट ती अधिकच हलाखीची होत चालली आहे.

मागील दोन दशकांचे आपण अवलोकन केले, तर येणाऱ्या प्रत्येक नव्या वर्षात त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. नवे वर्ष नवी आव्हाने घेऊन त्यांच्या पुढे उभे ठाकत आहे. हंगाम दरहंगाम मातीत पैसा अन् कष्टही तो पेरत असतो. निसर्गानेही त्याची परीक्षा पाहण्याचा जणू चंगच बांधलाय. ओलीअभावी बियाणे उगवून आले नाही, उगवलेले कीड-रोगाने खाल्ले, तरी तो खचून न जाता कंबर कसून तेवढ्याच जोमाने पुन्हा पेरणीला लागतो.

निसर्गाचे दुष्टचक्र इथेच थांबत नाही. पीक हाती येईपर्यंत निसर्ग कधी घात करेल हे सांगता येत नाही. पिकविलेला शेतीमाल बाजारात नेला, तर व्यापाऱ्यासह शहरी ग्राहकांना त्यांनी हे पिकविण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या याच्याशी काही देणे-घेणे उरत नाही. शेतीमालाची खरेदी करताना व्यापारी आणि ग्राहक या दोन्ही घटकांकडून त्याची लूट होतेय. हे कमी की काय, सरकार पातळीवरील वारंवारच्या बाजार हस्तक्षेपाने शेतीमालाची माती होत आहे.

मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचा शेती करण्याचा व्यवहार फसत असला, तरी तो हे व्रत कधी सोडत नाही. अनेक जणांना वाटते शेतकऱ्यांना पर्याय नाही म्हणून तो शेती कसत असतो. यात काही अंशी तथ्य असले, तरी तो श्रमसंस्कृती जपत असतो. आणि तो श्रमसंस्कृती जपत आहे म्हणून तर आपणा सर्वांना पोटभर अन्न मिळतेय आणि तो ठरतो जगाचा पोशिंदा! शेतकऱ्यांवर आता केवळ जगाचा पोशिंदा, अन्नदाता अशी शब्दसुमने उधळून चालणार नाही, तर बदलत्या परिस्थितीत त्यांना सक्षम करावे लागणार आहे.

हवामान बदलावर अतिप्रगत तंत्राने कशी मात करता येईल, हे पाहावे लागेल. यासाठी कृषी संशोधनाची दिशा बदलावी लागेल. शेतकऱ्यांनी आता ऊर्जादाता व्हावे, असे बोलले जात असले, तरी याची योग्य दिशा मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही, ते दाखविण्याचे काम करावे लागेल. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आपण आहोत. या तंत्रज्ञानात शेतकऱ्यांचे कष्ट आणि जोखीम हे दोन्ही कमी करण्याची क्षमता आहे. प्रगत देशाने या तंत्राच्या अवलंबातून हे दाखवून दिले आहे.

आपल्याकडे मात्र या तंत्राचा शेतीत वापर अजूनही प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. हवामान बदलाबरोबर जागतिक बाजारही बदलतोय. या बदलाचा अभ्यास करून त्यासाठी शेतकऱ्यांना तयार करावे लागणार आहे. दर पाडण्यासाठी सरकारने बाजारातील हस्तक्षेप पूर्णपणे थांबविला पाहिजे. परिस्थिती कितीही बिकट असली, तरी शेतकऱ्यांना थांबता येत नाही, तो थांबतही नाही हे कोरोना महामारीने दाखवून दिले आहे.

कठीण परिस्थितीतही शेती असो की पूरक व्यवसाय, अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलताहेत. शेतकऱ्यांचे गट, कंपन्या, महिला बचत गट ही सामूहिक विकासाची मोहीमही राज्यात बहरतेय. त्यातून पीकनिहाय मूल्यसाखळ्या विकसित होताहेत, ही बाबही शेती-शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मकच म्हणावी लागेल.

मागील हंगामातील कमी पाऊसमानामुळे नवे वर्ष दुष्काळाचे आहे. दुष्काळाच्या झळा कशा कमी करता येतील, यावर ॲग्रोवनचा ‘फोकस’ असणार आहेच. काही नव्या लेखमालाही वाचकांसाठी पर्वणीच ठरतील अशा आहेत. नववर्षनिमित्त सर्वांना शुभेच्छा !

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT