Agriculture University  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture University : कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ वाऱ्यावर

Recruitment Board Delay : गेल्या पाच महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे मंडळाचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या उच्चस्तरीय पदांसाठी होणारी निवड प्रक्रिया रखडली आहे.

Manoj Kapade

Pune News : महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळाला राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे मंडळाचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या उच्चस्तरीय पदांसाठी होणारी निवड प्रक्रिया रखडली आहे. कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या संख्येने पदे रिक्त असूनही वेळेवर निर्णय न झाल्यामुळे अनेक पात्र उमेदवारांना बढती न मिळताच निवृत्त व्हावे लागत आहे.

शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याकडेच सेवाप्रवेश मंडळाचे अध्यक्षपद होते. त्यांनी पाच महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्यासाठी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. निवडणुकीनंतर ते राज्याचे आरोग्यमंत्री झाले. मात्र शासनाने सेवाप्रवेश मंडळावर नवा अध्यक्ष नेमलाच नाही.

सध्या मंडळाचे सदस्य म्हणून डॉ. इंद्रमणी, डॉ. शरद गडाख, डॉ. संजय भावे या तीन कुलगुरूंसह संदीप राजपुरे हे अशासकीय सदस्य, डॉ. रविशंकर, डॉ. भगवान कापसे हे राज्यपाल नियुक्त तज्ज्ञ सदस्य यांची नियुक्ती झालेली आहे. तसेच कृषी परिषदेच्या महासंचालक वर्षा लड्डा या मंडळाच्या सदस्य सचिव आहेत. परंतु अध्यक्षच नसल्यामुळे मंडळाचे काम कोलमडले आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सेवाप्रवेश मंडळावर श्री. आबिटकर यांच्याप्रमाणे राजकीय अध्यक्ष नेमायचा नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अध्यक्षपदी माजी कुलगुरू, भारतीय कृषी संशोधन परिषेदेतील माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ किंवा माजी सनदी अधिकारी यापैकी एकाची नियुक्ती करावी, असा विचार आहे. त्यासाठी अध्यक्षपदाची पात्रता व निकष नेमके काय असावेत, याची माहिती राज्य शासनाने कृषी परिषदेकडून मागवली आहे. मध्यंतरी हे निकष निश्‍चित करून मंडळाच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया सुरू केली जाणार होती.

परंतु तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे एका पाठोपाठ एक वादाच्या भोवऱ्यात सापडत गेले. कृषिमंत्री अस्थिर असल्यामुळे अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय लांबणीवर पडला, असे सूत्रांनी सांगितले. आता कोकाटे यांच्या जागी दत्तात्रेय भरणे यांच्याकडे कृषिमंत्रिपदाची सूत्रे आली आहेत. कृषिमंत्री नवीन असल्यामुळे कृषी परिषदेच्या कामकाजाची माहिती करून घेण्यात वेळ जाईल. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

सेवाप्रवेश मंडळाचा हा घोळ पाहून विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ मात्र संताप व्यक्त करीत आहेत. ‘‘मनुष्यबळाच्या समस्येमुळे सर्व विद्यापीठे आधीच अडचणीत आहेत. त्यात पुन्हा सेवाप्रवेश मंडळाचा घोळ मिटत नसल्यामुळे भरती लांबणीवर पडत आहे.

विद्यापीठांमधील पात्र उमेदवारांना मंडळाच्या दुर्लक्षामुळे निवडीपासून वंचित राहावे लागत आहे. बहुतेक विद्यापीठांमध्ये अतिरिक्त पदभार देत कामकाज चालवले जात असून त्यातून चुकीचे निर्णय घेण्याकडे कल वाढला आहे,’’ असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील एका विभागप्रमुखाने व्यक्त केले.

महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळाच्या अध्यक्षाची निवड गुणवत्तापूर्ण व पारदर्शक पद्धतीने करण्याच्या सूचना कृषी मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यानुसार अध्यक्षपदासाठी निकष ठरविण्यात आले असून निवड प्रक्रिया लवकरच चालू होईल.
- तुषार पवार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
सेवाप्रवेश मंडळाला अध्यक्ष नसल्यामुळे मंडळाच्या बैठका झालेल्या नाहीत. राज्य शासनाने ही समस्या लवकर सोडवावी. कारण मंडळ कार्यान्वित नसल्याने कृषी विद्यापीठांमधील भरती रखडली आहे.
- डॉ. भगवान कापसे, राज्यपाल नियुक्त तज्ज्ञ सदस्य, महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahadevi Elephant : ‘महादेवी’साठी नागरिकांची नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा

Sugarcane Cultivation : महाराष्ट्र, कर्नाटकात ऊस क्षेत्रात वाढ

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचे आश्‍वासन पूर्ण करणार ः मुख्यमंत्री फडणवीस

Rural Housing Scheme : स्वामी चिंचोली येथील घरकुले प्रगतीपथावर

Rainfall Shortage Maharashtra : राज्यातील सव्वादोनशे तालुक्यांत कमी पाऊस

SCROLL FOR NEXT