Ahilyanagar News: ‘‘कर्जमाफीची रक्कम शेतकरी लग्नसमारंभावर उधळतात,’’ अशा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या विधानानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधासह शेतकरी संघटनांनी याबाबत मंत्री कोकाटे यांना चांगलेच सुनावले आहे. कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी आणि राज्य सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत निषेध व्यक्त केला आहे.
जाहीर माफी मागा : काँग्रेस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे, पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजप युती सरकार सोडत नाही. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे, की ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत.
शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न, साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का, असे अजब प्रश्न विचारून पुन्हा एकदा अपमान केला आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कोकोटे यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
सपकाळ पुढे म्हणाले, की सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते ते अद्याप पाळलेले नाही, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असे सरकार म्हणते, त्यात कर्जमाफीवरून कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना प्रश्न म्हणजे ‘चोर तो चोर आणि वरून शिरजोर’ असा प्रकार आहे. शेतकऱ्याला सरकार मदत करते किंवा कर्जमाफी करते म्हणजे काही उपकार करत नाही. मूठभर उद्योगपतींना १६ लाख कोटींचे कर्जमाफ केले, तेव्हा असा प्रश्न विचारण्याची धमक कोकाटे किंवा सरकारने दाखवली नाही. ‘कृषिमंत्र्यांना जाण नाही’
याबाबत प्रसिद्धिपत्रक देत किसान सभेने, ‘‘हे विधान संतापजनक असून महाराष्ट्राचे शेतकरी कशा प्रकारे शेती करतात आणि त्यांच्यापुढे काय समस्या आहेत याची जाण कृषिमंत्र्यांना नाही, कृषिमंत्र्यांनी आपल्यातील असंवेदनशीलपणा दाखवून दिला आहे. कृषिमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा,’’ अशी मागणी किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
कृषिमंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्याचा किसान सभेकडून तीव्र निषेध करण्यात आला. यापूर्वीही या कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर करून आपण किती असहिष्णू आणि असंवेदनशील आहोत, हे दाखवून दिले आहे.
सरकारच्या धोरणांमुळे शेतीचा उत्पादन खर्च सातत्याने वाढतो आहे. सरकार मतांच्या राजकारणासाठी शेतीमालाचे भाव सातत्याने पाडत असल्याने शेतीतील तोटा वाढतो आहे. शेतकऱ्यांना यामुळे हंगाम उभा करण्यासाठी सातत्याने कर्ज घ्यावे लागते. प्रत्येक हंगाम तोट्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर वाढत राहतो. त्यातच भर म्हणजे सरकारने कॉर्पोरेट धार्जिणे नियम केल्याने नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना भरपाईपासून दूर राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था संपूर्णपणे रसातळाला जाते.
सरकारच्या या धोरणाकडे काणाडोळा करून कोकाटे यांच्यासारखी माणसे अशी विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना कार्यमुक्त केले पाहिजे,’’ अशी मागणी किसान सभेने केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.