
Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची क्रूरता दर्शविणारी छायाचित्रे प्रसारित झाल्यानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी राजीमाना दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ४) सकाळी अकराच्या सुमारास विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी राजीनामा दिला असून, पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे तो पाठविल्याचे जाहीर केले.
प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या महायुती सरकारमधील मंत्र्याच्या कारनाम्यांमुळे पहिल्या तीन महिन्यांतच राजीनामा घेण्याची नामुष्की ओढवली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची छायाचित्रे प्रसारित झाल्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्यावरून टोलवाटोलवी करणाऱ्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांपुढे पर्याय न उरल्याने मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. आपण प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे मुंडे यांनी समाजमाध्यमावर जाहीर केले आहे.
हिवाळी अधिवेशनाआधी म्हणजेच ८० दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली होती. अवादा कंपनीकडून खंडणी उकळण्यास गेलेल्या वाल्मीक कराड यांच्या टोळीला देशमुख यांनी मारहाण करत हुसकावून लावले होते. त्याचा राग मनात ठेवून देशमुख यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण आणि नंतर खून केला होता. या हत्येचा व्हिडिओ करून तो व्हायरल केला होता. वाल्मीक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे.
बीड जिल्ह्यात कराड आणि त्यांच्या टोळीने गेल्या पाच वर्षांत धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. मुंडे यांचे मंत्रिपद हुकण्याची चिन्हे असताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना संधी दिली. त्यानंतर अधिवेशनात भाजपचे आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांच्यासह अन्य आमदारांनी या प्रकरणाची दाहकता सभागृहात मांडल्यानंतर सभागृह थरारले होते. त्यानंतर मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. मात्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह महायुतीतील नेते वरवर मुंडे यांचा बचाव करत होते.
दरम्यान, मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीतील अनेक प्रकरणांवरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. कृषी विभागातील बदल्या, डीबीटी धोरण वगळून वितरित केलेल्या निविष्ठा, बीडमधील नियोजन मंडळातील निधी वितरण आणि त्यात झालेला भ्रष्टाचार आदी प्रकरणे एकापाठोपाठ एक समोर येऊ लागली. त्यावरून भाजपचे आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्यासह सर्वच पक्षांमधून जोरदार टीका होत होती.
मुंडे यांनी मंत्रिपद वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा भाग म्हणून बावनकुळे यांच्या निवासस्थानी सुरेश धस आणि मुंडे यांची भेट घडवून आणली. पण ही गोपनीय भेट माध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच बावनकुळे यांनी ही भेट साडेचार तास झाल्याचे सांगत भेटीचे समर्थन केले.
मुंडेंना नडला अतिआत्मविश्वास
विधानसभा निवडणुकीत लाखाहून अधिक मताधिक्य मिळवत मुंडे यांनी विजय मिळविला. मात्र या निवडणुकीत विरोधी उमेदवारांवर केलेली दहशत, कार्यकर्त्यांना केलेली मारहाण आदी बाबी व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्या होत्या. मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या काही कार्यकर्त्यांनी हातात, कंबरेला पिस्तूल लावलेले व्हिडिओ शेअर केले होते.
त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड आणि त्याच्या गुंडांचा सहभाग आहे हे माहीत असूनही, त्याचे उघड समर्थन मुंडे यांनी केले होते. खून कोणत्या जिल्ह्यात होत नाहीत असे उर्मट प्रत्युत्तर मुंडे यांनी माध्यमांना दिले होते. तसेच कराड हा माझा निकटवर्तीय आहे, मी कधीच नाकारत नाही, असे सांगितले होते. त्यानंतर सुरेश धस, अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतरही मुंडे यांनी प्रत्युत्तर देत असताना अतिआत्मविश्वास बाळगत वक्तव्ये केली आणि तीच त्यांच्या अंगलट येत गेली.
करुणा मुंडे यांचे भाकित खरे
अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होण्याआधी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे. दोन दिवसांत तो जाहीर केला जाईल, अशी पोस्ट समाजमाध्यमावर केली होती. पहिल्या दिवशी राजीनाम्याबाबत फारशी चर्चा झाली नाही. मात्र सायंकाळी समाजमाध्यमांवर संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजीनाम्याच्या हालचाली सुरू झाल्या. मंगळवारी सकाळी १० वाजता राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे स्वीय सहायकाकरवी दिल्याचे सांगण्यात येत असले, तरी तो आधीच दिला असल्याचेही बोलले जात आहे.
आधी राठोड आता मुंडे
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप केले होते. त्या वेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी, जर राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला आणि एक दिवस आधी राजीनामा घेण्यात आला होता. आता मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या कारनाम्यामुळे अधिवेशन सुरू असताना राजीनामा घेण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.