श्रीनिवास हेमाडे
माणूस रोजीरोटीसाठी नोकरी, धंदा इत्यादी प्रकारच्या विविध कृती करतो. त्यांचे साधारणपणे नोकरी (service) आणि धंदा (Business) असे वर्गीकरण केले जाते. त्यात आणखी भेद स्पष्ट करणे आवश्यक आहे. पेशा (Vocation) म्हणजे आवड, छंद म्हणून काहीतरी करणे. व्यवसाय (Profession) म्हणजे ज्यात काहीएक प्रशिक्षण घेऊन तज्ज्ञता प्राप्त करून समाजाला सेवा देणे, अर्थात नोकरी करणे. भांडवलाच्या आधारे तज्ज्ञ लोक नोकरीवर ठेवून धंदा करणे, केवळ पैसा आणि पैसाचं कमावणे म्हणजे व्यापार किंवा शुद्ध नफेखोरीचा धंदा (Trade) करणे.
अशा वेगवेगळ्या धंद्यांची साखळी निर्माण करणे म्हणजे उद्योगसमूह (Corporation/Company) स्थापन करणे. परस्परांना ओळखणाऱ्या आणि केवळ आपलाच फायदा बघणाऱ्या काही निवडक लोकांनी धंदा करणे म्हणजे कंपनी. ओळखीच्या आणि अनोळखी हजारो लोकांच्या कंपन्यांची साखळी म्हणजे उद्योगसमूह. त्याचप्रमाणे पोट भरलेले असो अथवा नसो पण सामाजिक सुधारणा करण्याच्या हेतूने समाजसेवा (Social Service) करणे. अर्थात, समाज सेवेची पदवी मिळवून सेवा करणे ही नोकरीचं असते.
राजकारण, समाजकारण, धर्मकारण, तत्त्वकारण, शिक्षण आदी काही सेवा निःस्वार्थी समजल्या जातात. पण आजच्या विद्यमान ‘साटेलोटे भांडवलशाही’ अर्थव्यवस्थेत कोणतीही समाजसेवा पैसा मिळविण्यासाठीचे असते, हे वास्तव आहे. या सेवांमध्ये सरकारी नोकरी आणि बिगर सरकारी नोकरी तसेच सरकारी संस्था आणि बिगर सरकारी संस्था यांचाही समावेश होतो, असे स्पष्टपणे दिसून येईल.
मूळ समाजसेवेचे व्रत असणारे राजकारण हाच नफेखोरीचा धंदा बनल्याने संपूर्ण जगणेच एक नफेखोरीचा धंदा बनत चालल्याचा अनुभव रोज येत आहे. जगण्यासाठी काही कृती करणे आणि पैसे कमावणे या बाबतीत मानवी प्रजातीच्या इतिहासात आणि समाज निर्मितीच्या इतिहासात ‘शेती’ तीन घटकांनी नियंत्रित होते. (१) शेती ही कृती (२) शेतीचे उत्पादन (३) या दोन्हीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. या तिसऱ्या घटकाचे आणखी दोन भाग आहेत.
पहिला भाग आहे शेतीकडे, उत्पादनाकडे स्वतः शेतकरी आणि शेतमजूर, पूरक कामे करणारा इतर कष्टकरी कोणत्या दृष्टीने पाहतो. म्हणजेच शेती ही समाजसेवा आहे, की नोकरी आहे, की व्यवसाय आहे, की धंदा आहे, की आवडीचा पेशा आहे, की कंपनी आहे, की उद्योगसमूहाची कृती आहे, हा मुख्य प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. मग शेतीच्या बाबतीत इर्जिकचे नेमके स्वरूप काय आहे? इर्जिक हा परंपरागत केवळ सेवाभाव आहे की वरीलपैकी कोणती कृती आहे, हेही प्रश्न उद्भवतात.
दुसरा भाग आहे; शेतीकडे, शेतकऱ्याकडे, शेतमजूर व कष्टकरी वर्गाकडे आणि उत्पादित शेतीमालाकडे सारा समाज कोणत्या दृष्टीने पाहतो. उत्पादक शेतकरी व शेतमजूर, शेतीमाल विक्रेते, शेतीविषयक धोरण निश्चिती करणारे तज्ज्ञ, सरकार- शेतकी खाते, नोकरशाही, बाजारपेठ, तेथील व्यापारी, दलाल, छोटे विक्रेते आणि अमर्याद ग्राहक वर्ग या तिन्ही घटकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?
भारतीय शेतकरी शेतीला सेवाधर्म मानतो. शेतीकर्मातच ईश्वर पाहतो. संतांनी तशा अभंग रचना केल्या. शेतकरी अन्नधान्य पिकवतो. त्याकडे तो समाजाच्या पोषणाचे मूल्य म्हणून पाहतो. पण त्याच वेळेस शेतीमालाची बाजारपेठ धंदा म्हणून विकसित होते. त्यात प्रथम उत्पादक शेतकरी उत्पादनापासून तोडला जातो. शेतीमाल ही बाजारू वस्तू बनते.
भाव ठरवणे हे शेतकऱ्याच्या हातातून काढून घेतले जाते आणि नियंत्रक ठेकेदारी, दलाल, व्यापारी, सरकार, नोकरशाहीच्या हातात जाते. हमीभाव ही फसवी गोष्ट शेतकऱ्यांच्या माथी मारली जाते (तिचेच रूपांतर ‘नशीब, दैव, नियतीमध्ये होते). अशा रीतीने ‘सेवे’चे रूपांतर ‘नफेखोरीच्या धंद्या’त होते. जोडीला वर्ण, जातीजमात, लिंगभेद आणि भयानक भक्कम असलेली पुरुषप्रधानता या व्यवस्थांनी शेती, शेतकरी, शेतमजूर आणि शेतीपूरक व्यवसाय या सर्वांचे मूलभूत शोषण केले, हे उघडच आहे.
मानवप्रजातीच्या इतिहासात शेतकरी शेतीकडे कसा पाहतो आणि धर्म, राजकीय सत्ता, सामाजिक सत्ता, शैक्षणिक सत्ता आणि प्रत्येक काळातील बाजारपेठीय अर्थव्यवस्था शेतीकडे शोषणाचे साधन म्हणून पाहते की जगण्याचे साधन पाहते की साध्य म्हणून पाहते यातचं शेतीच्या व शेतकऱ्यांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक शोषणाची बीजे दडलेली असतात.
ही शेतीची मूल्यव्यवस्था बदलली तर आणि तरच शेती ऊर्जित अवस्थेला येऊ शकते. भारतीय शेती, शेतकरी आणि भारतीय समाज, अर्थात लोक, नोकरशाही, सरकार, अर्थव्यवस्था, धर्मव्यवस्था, जातिव्यवस्था, लिंगभेद व्यवस्था शेतीकडे कसे पाहते? शेतीच्या पारंपरिक आणि आधुनिक स्वरूपावर या सर्व व्यवस्थांचा नेमका कोणता परिणाम झाला? कोणते फरक कोणत्या कारणांनी पडले? शेती ही अत्यावश्यक सेवा आहे की सेवेचा धंदा आहे की शोषणाचे साधन आहे? प्रश्न ऐरणीवर आहेत.
श्रीनिवास हेमाडे
९१५८६५८०६६
(लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक तसेच व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.