Nagpur News : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर ओपन कास्ट कोळसा खाण परिसरातील मसाळा (तुकुम) गावाचे अखेर पुनर्वसन होणार आहे. वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेडने (डब्लूसीएल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही माहिती दिली.
या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, दुर्गापूर ओपन कास्ट कोळसा खाणीसाठी सिनाळा, नवेगांव, मसाळा (जुना) आणि मसाळा (तुकुम) या एकूण चार गावांची जमीन संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
परंतु, प्रत्यक्षात मासाळा (तुकुम) सोडून चारपैकी फक्त तीन गावांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आणि त्यांचे पुनर्वसनही करण्यात आले. पण गेल्या पाच वर्षांपासून, मसाळा (तुकुम) अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे, गावकऱ्यांनी मसाळा (तुकुम) पुनर्वसनाची मागणी केली आहे.
डब्लूसीएलने नियमांवर बोट ठेवत गावाच्या पुनर्वसनाच्या जबाबदारीतून माघार घेतली. ही खाण मसाळा या गावापासून १ हजार ९०० मीटर अंतरावर आहे. नियमानुसार त्याचा गावावर कोणताही परिणाम होत नसल्याचे उत्तर डब्लूसीएलने १४ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाला दिले होते. त्यामुळे, गावाच्या पुनर्वसनाची गरज नसल्याचे नमूद करीत आपले हाथ झटकले होते.
पर्यावरण मंजुरीतून उघडले सत्य
डब्लूसीएलने स्वतःच कोळसा खाणीसाठी चार गावांचे पुनर्वसन करण्यासाठी पत्रे जारी केली आहेत. तसेच, पर्यावरण मंजुरीचा दाखला देत मंजुरी घेताना सुद्धा या चार गावांचा उल्लेख करूनच खाणीसाठी मंजुरी घेण्यात आली असल्याची बाजू ॲड. शिल्पा गिरटकर यांनी न्यायालयासमक्ष मांडली. असे असूनही गावाचे पुनर्वसन केले जात नाही.
याची गंभीर दखल घेत न्यायालयाने यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश डब्लूसीएलला दिले होते. त्यानुसार, डब्लूसीएलने न्यायालयाला पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. शिल्पा गिरटकर यांनी, डब्लूसीएलतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आनंद जयस्वाल यांनी बाजू मांडली.
पुनर्वसन किती घरांचे?
मसाळा (तुकुम) गावात खासगी एजन्सीने सर्वेक्षण केले तेव्हा घरांची संख्या १५५ होती. आता घरांची संख्या ६२६ आहे. त्यामुळे, गावात एकूण ६२६ घरे अधिकृत असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. त्यांनी कर पावत्या आणि नमुना ८-अ देखील जोडला आहे. तसेच, या ६२६ घरांचे पुनर्वसन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.