Mango Farming
Mango Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Orchard Management : निर्यातयोग्य केसर आंबा उत्पादनासाठी करावयाची कामे

डॉ. भगवानराव कापसे

Kesar Mango Orchard : केसर आंबा पिकासाठी या वर्षीचे मराठवाडा भागातील हवामान कसे होते, हे प्रथम जाणून घेऊ. या वर्षी सुरुवातीला पावसाळा बऱ्यापैकी झाला. पण तो लगेच बंद होऊन सप्टेंबरअखेरपर्यंत ताण दिला. साधारणपणे ऑगस्ट - सप्टेंबर या महिन्यामध्ये आंब्याला नवती येत असले ती काही येऊ शकली नाही. परिणामी, पूर्वीचीच काडी जास्त पक्व झाली.

पक्व झालेली काडी आणि सप्टेंबरपर्यंत मिळालेला ताण यामुळे काही बागांमध्ये सप्टेंबरमध्येच थोड्याफार प्रमाणात मोहर सुरू झाला. बऱ्याच प्रमाणात ऑक्टोबरमध्ये बाहेरही पडला. याच काळात पुन्हा पावसाचे सात, आठ दिवसांसाठी आगमन झाले. त्यामुळे राहिलेल्या काडीला परत नवती आली.

अशा प्रकारे हा मोहर अतिशय मागे पुढे झाला. या वर्षी हिवाळासुद्धा सर्वसाधारणच राहिला, त्यामुळे बहुतेक बागांमध्ये जुन्या काडीवर नोव्हेंबरअखेरपर्यंत सर्वत्र मोहर दिसला. ऑक्टोबरच्या पावसामुळे काही बागांमध्ये पुन्हा आलेल्या नवतीवर आतापर्यंत मोहर येणे चालू आहे. असा टप्प्याटप्प्याने मोहर आल्यामुळे आंब्याच्या काही पेट्या बाजारातही आल्याचे दिसते. पंढरपूरमधील एका शेतकऱ्याच्या केसर आंब्याच्या दोन, तीन पेट्या बाजारात आल्याचे समजते.

सामान्यतः पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केलेल्या केसर आंबा बागेमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंबा काढण्यास सुरुवात होते. मी पूर्वी अंदाज वर्तविल्याप्रमाणे या वर्षी २० मार्चच्या दरम्यान आंबा काढणी सुरू होईल. हा आंबा वीस मार्चपासून सुरू होऊन अगदी शेवटच्या मोहराची फळे जूनअखेरपर्यंत येत राहतील, असा अंदाज आहे.

या वर्षी उशिरा का होईना, पण थोडाफार पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती थोडीशी कमी झाली असली, तरी अद्यापही अनेक बागायतदारांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासू शकते. पाण्याची तीव्र टंचाई भासल्यास, त्याचा फटका सरळ कलम लावून केलेल्या नव्या लागवडीला अधिक बसू शकतो. कारण अशा बागा कोयी लावून तयार केलेल्या बागांच्या तुलनेत पाण्याच्या कमतरतेला अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे आपल्याकडील उन्हाळ्यातील पाण्याचा अंदाज घेऊन आतापासूनच काही उपाययोजना केल्यास हा ताण कमी करता येईल.

बागेमध्ये जैविक आच्छादन करावे. आच्छादनासाठी शक्यतो उसाचे पाचट वापरल्यास अधिक चांगले. आता बहुतांश भागांमध्ये उसाचे पाचट उपलब्ध होते. हे ऊस पाचट तीन चार इंच जाडीमध्ये अतिघन लागवड केलेल्या बागांत दोन्ही ओळींमध्ये टाकून घ्यावे. त्यावर थोडीशी आजूबाजूची माती खोऱ्याने टाकावी. त्यामुळे पाचट हवेने उडून जाणार नाही आणि त्यास आगही लागणार नाही. अशा पाचट अंथरलेल्या बागेत पाणी देत राहिल्यास गवतही उगवणार नाही. बागेत दीर्घकाळ गारवाही राहील.

सतत ऊनवाऱ्याच्या संपर्कात आल्याने हेच पाचट कुजण्यास सुरुवात होईल. पावसाळ्यात एक, दोन पावसांनंतर संधी मिळताच मोगडा चालविल्यास पाचट जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळून जाईल, यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढून, जमिनीचा पोतही सुधारेल. अशा प्रकारचे आच्छादन दरवर्षी करत गेल्यास अतिशय हलकी जमीनही सुपीकतेकडे वाटचाल करू लागते. काही वर्षांतच हलकी आणि मुरमाड माती मऊशार होऊ लागते. जमिनीचा सामू (पीएच) जास्त असल्यास तो कमी होण्यास मदत होते.

ज्याच्याकडे सेंद्रिय आच्छादन उपलब्ध नाही आणि आर्थिकदृष्ट्या शक्य आहे, अशा शेतकऱ्यांना बागेमध्ये प्लॅस्टिकचे आच्छादनही करता येईल. मात्र प्लॅस्टिकचे पुनर्चक्रीकरण होत नाही आणि त्याचे आपली शेती आणि एकूणच पर्यावरण यासाठी होणारे संभाव्य धोके लक्षात घेता शक्यतो सेंद्रिय आच्छादनालाच प्राधान्य द्यावे.

सध्या बहुतेक बागांमध्ये अगदी शंभर- दीडशे ग्रॅम वजनापर्यंतची फळे दिसत आहेत. कदाचित त्याच बागेत किंवा त्याच झाडावर काही फळे वाटाण्याच्या आकाराची आहेत आणि काही ठिकाणी तर अजूनही मोहोर दिसायला लागला आहे. अशा ठिकाणी बागायतदाराने पंधरा- वीस दिवसांपूर्वी आलेला मोहर किंवा आता येत असलेला मोहर काढून टाकावा.

कारण या मोहराला होणारी फळधारणा अगदी लिंबाच्या आकाराची फळे होईपर्यंत फारसा प्रश्‍न निर्माण होत नाही. मात्र नंतर उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास आठ दिवसांच्या आत ही फळे संपूर्णपणे गळून जातात. मात्र त्यांनी अन्य फळांशी अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा केलेली असल्यामुळे आधीची फळेही लहान राहण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळीच हा मोहर काढणे अधिक फायद्याचे ठरते.

फळगळ नियंत्रण

आता बहुतेक बागामध्ये केसर फळे अगदी वाटाण्याच्या आकारापासून ते दीडशे ग्रॅमपर्यंत झालेली आहेत. अशा वेळेस जी मध्यम लिंबाच्या आकाराची किंवा त्यापेक्षा लहान असलेल्या फळांची गळ होण्याची समस्या उद्‍भवते. अशा बागेत नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एन.ए.ए.) (१५ पीपीएम) अधिक युरिया (दीड टक्के) अधिक कार्बेन्डाझिम एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे १२ ते १५ दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या घ्याव्यात. मध्ये एखाद्या फवारणीमध्ये एन.ए.ए. ऐवजी जीए (१५ ते २० पीपीएम) घेणेसुद्धा फायद्याचे ठरते. (लेबल क्लेम आहे.)

फळगळीच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे चढत जाईल, तशी फळगळ आणखी वाढत असते. अशावेळी आपल्याकडे पाण्याची बऱ्यापैकी व्यवस्था असल्यास एक किंवा शक्य झाल्यास दोन मोकळे पाणी बागेत सोडावे. हे पाणी झाडासाठी नसून, ते बागेत गारवा आणि आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवावे.

निर्यातयोग्य फलोत्पादनासाठी...

बागेतील खराब, डागी फळे आताच काढून टाकावीत.

गुच्छामध्ये जास्त फळे असल्यास दोन किंवा फार झाले तर तीनच फळे ठेवावीत. फळाला बाजूचा फळधारणा न झालेला सर कात्रीने छाटून टाकावा. तो तसाच राहिल्यास वाऱ्यामुळे फळाला सारखा घासत राहून इजा करतो व त्याचा डाग पडतो.

अतिघन लागवड केलेल्या बागेत फळांना हाताने बॅगिंग करणे शक्य होते. त्यामुळे उत्तम प्रतीचे फळ मिळविण्यासाठी बॅगिंग करावी. काढणीच्या वेळी एकाच पक्वतेची फळे समजून यावीत, यासाठी बॅगवर खुणा तारखेच्या खुणा कराव्यात. त्याचा फायदा एकाच पक्वतेची फळे काढणीसाठी होतो.

सध्या परिस्थितीत फळांचा आकार वाढण्यासाठी ०ः०ः ५० (पोटॅशिअम सल्फेट) १० ग्रॅम प्रति लिटर अधिक जीए (२० पीपीएम) यांची फवारणी घ्यावी. (ॲग्रेस्को शिफारस आहे.) त्याचबरोबर जमिनीतून ०ः०ः ५० (पोटॅशिअम सल्फेट) एकरी दीड किलो या प्रमाणात ८ ते १० दिवसांच्या फरकाने पाण्यातून द्यावे.

ठिबकद्वारे खताचे वेळापत्रक पाळावे.

बागेभोवती वारा प्रतिबंधक झाडे असल्यास फळांवर उन्हामुळे येणारे डाग कमी प्रमाणात पडतात. बागेतील आर्द्रता जपली जाऊन फळांचा आकार वाढण्यास मदत होते. हे लक्षात ठेवावे. जर अशी झाडे नसल्यास पावसाळ्यात झाडे लावून घ्यावीत.

नवीन बागेतील छाटणी

आता नवीन लागवड केलेल्या बागेमध्ये छाटणी आवश्यक आहे. ही छाटणी करत असताना एक वर्षाची अतिघन लागवडीची बाग असल्यास झाडाचे एकच खोड ठेवून ५० सेंटिमीटर वर त्याचा शेंडा मारावा.

त्यावर नंतर आलेल्या फुटींपैकी तीनच सशक्त फांद्या ठेवाव्यात. या फांद्या जूनपर्यंत वाढू द्याव्यात. जूनमध्ये पुन्हा या फांद्या चाळीस - पन्नास सेंटिमीटर अंतरावर एकच फांदी ठेवून शेंडे मारावेत. अशा रीतीने झाडाला एकास तीन, तीनवर परत तीन - तीन अशा प्रकारे प्रत्येक झाडाचा सांगाडा तयार होईल असे पाहावे.

नवीन बागेतील छाटणी

आता नवीन लागवड केलेल्या बागेमध्ये छाटणी आवश्यक आहे. ही छाटणी करत असताना एक वर्षाची अतिघन लागवडीची बाग असल्यास झाडाचे एकच खोड ठेवून ५० सेंटिमीटर वर त्याचा शेंडा मारावा. त्यावर नंतर आलेल्या फुटींपैकी तीनच सशक्त फांद्या ठेवाव्यात. या फांद्या जूनपर्यंत वाढू द्याव्यात. जूनमध्ये पुन्हा या फांद्या चाळीस - पन्नास सेंटिमीटर अंतरावर एकच फांदी ठेवून शेंडे मारावेत. अशा रीतीने झाडाला एकास तीन, तीनवर परत तीन - तीन अशा प्रकारे प्रत्येक झाडाचा सांगाडा तयार होईल असे पाहावे.

पीक संरक्षण

केसर आंब्यासाठी विशेषतः कोकणाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात फारसा कीड रोगाचा प्रादुर्भाव जाणवत नाही. मात्र विशेषतः उशिरा येणाऱ्या आंबा बागेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता सर्वाधिक असते. अशा फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फळ काढणीच्या पंचेचाळीस दिवस आधी पुढील उपाययोजना कराव्यात.

दर आठवड्याला प्रादुर्भावग्रस्त गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.

मिथाईल युजेनॉलचे सहा रक्षक सापळे प्रति एकर लावावेत.

फळ काढणीच्या तीन आठवडे आधी डेल्टामेथ्रीन अर्धा मि.लि. अधिक ॲझाडिरेक्टीन दोन मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

फळमाश्यांची संख्या प्रति रक्षक सापळा पाचपेक्षा अधिक आढळल्यास, दहा ग्रॅम गूळ मिसळलेल्या एक लिटर पाण्यात डेल्टामेथ्रीन दोन मि.लि. मिसळून तयार आमिषाची फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस आहे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT