Mango Cultivation : अत्याधुनिक अतिघन आंबा लागवड

Intensive mango cultivation : आंब्याचे मूळ उगमस्थानच भारत असून, एकूण जागतिक उत्पादनाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आंबा भारतात पिकतो. भारताव्यतिरिक्त मेक्सिको, ब्राझील, चीन, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इस्राईल अशा अनेक देशांमध्ये आंबा उत्पादन होते.
 Mango Cultivation
Mango Cultivation Agrowon

डॉ. भगवानराव मा. कापसे

Kesar Mango Cultivation : आंब्याचे मूळ उगमस्थानच भारत असून, एकूण जागतिक उत्पादनाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आंबा भारतात पिकतो. भारताव्यतिरिक्त मेक्सिको, ब्राझील, चीन, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इस्राईल अशा अनेक देशांमध्ये आंबा उत्पादन होते. एकूण लागवडक्षेत्रामध्ये भारत आघाडीवर असला तरी भारताची हेक्टरी आंबा उत्पादकता (हे. ८ टन) अत्यंत कमी असून, तुलनेत दक्षिण आफ्रिका (४० टन), इस्राईल (३५ टन) आघाडीवर आहेत. त्यातही महाराष्ट्राची उत्पादकता सव्वाचार टन इतकीच आहे. निर्यातीमध्येही बराच मागे (१३ व्या क्रमांकावर) आहे. गेल्या पंधरा वीस वर्षांपासून भारत ४० ते ६० हजार टन आंबा निर्यात करत आहे. त्यातही एकूण निर्यातीच्या ५१ टक्क्यांपर्यंत केसर आंबा आहे. या एकूण केसर निर्यातीपैकी १२ टक्के महाराष्ट्रातील केसर आंब्याची आहे. आपल्या तुलनेत पाकिस्तानची निर्यात गेल्या सात-आठ वर्षांत चार ते पाच पट वाढल्याचे दिसते.

उत्पादकतेमध्ये मागे असण्यामागे आजही कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाच्या वापराविना पारंपरिक पद्धतीनेच लागवड केली जाते, हेच मुख्य कारण दिसते. हे लक्षात येताच १९९० ते १९९५ या काळात औरंगाबाद (आता छत्रपती संभाजीनगर) भागात गुजरातमधून केसर आंबा कलमे आणून आधुनिक सघन लागवडीला सुरुवात केली. बऱ्यापैकी हेक्टरी उत्पादकता वाढली. नंतर प्रस्तुत लेखकाने २००५ ला साऊथ आफ्रिका भेटीमध्ये पाच हजार एकरचा आंबा व मोसंबी फार्म पाहिला. त्यात अडीच हजार एकर अतिघन पद्धतीने १.५ × ५ मीटर अंतरावर पंधरा वर्षांपूर्वी लावलेली आंबा बाग होती. त्यांची उत्पादकता ४० ते ४२ टन प्रति हेक्टर होती. अशाच सहा बागा पाहून बागेचे सर्व व्यवस्थापन तंत्र आम्ही समजून घेतले. महाराष्ट्रात आल्यानंतर या अतिघन लागवडीचा प्रसार सुरू केला. कारण भारतामध्ये लागवडीच्या शिफारशी १९८० पर्यंत १३ × १३ मीटर होती, ती कमी होऊन १९९५ पर्यंत १० × १० मीटर (एकरी ४० झाडे) झाली. पुढे ५ × ५ मीटरवर आली होती. आम्ही २००५ पासून १.५ × ४ मीटर या अंतरावर ६६६ झाडांची लागवड सुरू केली. मशागत व व्यवस्थापनाचे तंत्र सांभाळल्यामुळे कोकण विभागाव्यतिरिक्त अन्य विभागामध्ये ही पद्धत यशस्वी ठरली. १९९० पासून राज्यामध्ये आंबा लागवड वाढू लागली. केसरबरोबरच वनराज, हापूस, रत्ना, राजापुरी, दशहरी, लंगडा, मलिका, आम्रपाली, सिंधू इ. जातीचीही लागवड झाली, तरी केसरव्यतिरिक्त अन्य जाती राज्यामध्ये मागे पडल्या. कोकणातील हापूसचा पट्टा वगळता राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र या अन्य भागामध्ये पस्तीस -चाळीस हजार हेक्टरवरील आंब्यामध्ये ९५ टक्के प्रमाण केसरच आहे.


 Mango Cultivation
Mango Cultivation : अति घन आंबा लागवड करा

वातावरणाचा चांगला आणि वाईट परिणाम ः

केसर हा मूळचा गुजरातचा. दक्षिण गुजरातचे हवामान दमट म्हणजे उन्हाळ्यात आपल्यापेक्षा २ ते ३ अंशांनी कमी तापमान आणि तुलनेने जास्त आर्द्रता असल्यामुळे तिथे केसर आंब्यांचा आकार व वजन जास्त येते. कारण आंब्याची फळधारणा हिवाळ्याच्या शेवट होऊन नंतरची फळाची पूर्ण वाढ ही फेब्रुवारी ते मे अशा उष्ण हवामानात म्हणजे उन्हाळ्यात होते. आपल्याकडे या काळात कोकणव्यतिरिक्त महाराष्ट्रातील अन्य भागात मात्र हवामान अतिशय कोरडे आणि जास्त उष्ण (म्हणजे ४३ ते ४८ अंश सेल्सिअस तापमान) असते. या वाढलेल्या तापमानात प्रकाश संश्‍लेषणाची म्हणजेच अन्न तयार करण्याची प्रक्रिया चांगली होत नाही. उन्हाच्या झळांमुळे फळास इजा पोहोचते. त्यामुळे फळांचा आकार लहान राहतो. फळधारणा झाल्यानंतर सुरुवातीच्या महिन्यात फळे बाजरी ते वाटाण्याच्या आकाराची असताना साधारण फेब्रुवारीमध्ये तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास फळातील ऑक्झिन्सचा नाश होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होते. अशा अनेक नैसर्गिक अडचणी आपल्याकडे येतात. त्यावर मात केल्यास आपल्याकडेसुद्धा फळाचा आकार व उत्पादन चांगले मिळू शकते.
आपल्याकडील कोरड्या व उष्ण हवामानात फळांचा आकार थोडा लहान राहत असला, तरी त्यातील गोडी म्हणजे साखर व आम्लतेचे (Ratio) गुणोत्तर चांगले राहते. परिणामी फळांना सुगंध
चांगला येतो. आपल्या फळांची टिकवण क्षमता जास्त राहते. त्यामुळे आपल्या राज्यातील फळांना देशांतर्गत आणि परदेशातील ग्राहकांकडूनही चांगली पसंती मिळते. परदेशामध्ये जपान, युरोप आणि अमेरिकेतील बाजारामध्ये महाराष्ट्रातील केसर आंब्याचा दबदबा तयार होत आहे.

 Mango Cultivation
Mango Orchard : अति घन लागवड आंबा बागेत आधुनिक पद्धतीने छाटणी फायद्याची

केसर लागवडीबाबत महत्त्वाच्या बाबी ः
१) चुनखडी जमिनीत लागवड न करणे.
२) खात्रीची सिंचनाची व्यवस्था असणे.
३) संरक्षित सिंचनासाठी शक्यतोवर अस्तरीकरणासह शेततळे आवश्यक.
४) अतिघन लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणे.
५) आधुनिक पद्धतीने घेर नियंत्रण (Canopy Management) करणे.
६) विद्राव्य खतांचा योग्य पद्धतीने वापर करणे.
७) ३ ते ४ आठवडे अगोदर म्हणजे एप्रिलच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात फळकाढणी सुरुवात होईल असे नियोजन करणे.

अतिघन लागवड म्हणजे काय?
अति घन लागवड म्हणजे एकरी जास्तीत जास्त झाडे बसवणे होय. या पद्धतीमध्ये सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साइड, जमीन व अन्य संसाधने, तंत्रज्ञानाचा काटेकोर वापर करून एकरी जास्तीत जास्त उत्पादन व नफा मिळवणे शक्य आहे. सर्वसाधारण शिफारशीत १० × १० मीटर अंतराऐवजी लागवडीचे अंतर अर्धे म्हणजे ५ × ५ मीटर केल्यास दुप्पट झाडे बसतात. त्याला घन लागवड म्हणतात. त्याही पुढे जाऊन १.५ × ३ मीटर किंवा १.५ × ४ मीटर असे अंतर ठेवल्यास एकरी झाडांची संख्या आठ ते दहा पट जास्त होते. त्यास अतिघन लागवड असे म्हणतात.
फक्त ही लागवड चौरस पद्धतीने करण्याऐवजी आयताकृती (एकीकडून अंतर कमी करावे, तर दुसरी बाजू सर्वसाधारण ठेवावी.) व दक्षिणोत्तर पद्धतीनेच करावी. त्यामुळे दिवसभर झाडांना सूर्यप्रकाशाचा लाभ मिळू शकतो.

या पद्धतीमुळे होणारे फायदे ः
१) सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येतो.
२) कार्बनडाय ऑक्साईड (CO२) हा हवेपेक्षा जड असल्यामुळे झाडांकडून खालच्या थरात जास्त शोषण होते.
३) बाग लवकर फळात येते.
४) एक अंतर सर्वसाधारण ठेवल्यामुळे आंतरमशागत, फवारणी, खते देणे, फळांची अंतर्गत वाहतूक इ. कामे ट्रॅक्टरने करणे सोईस्कर.
५) जमीन आणि संसाधने यांचा उत्तम वापर.
६) फळांची निर्यातयोग्य गुणवत्ता मिळण्यासाठी उपाययोजना उदा. विरळणी, काढणी इ. सहज करता येतात.
७) उत्तम प्रतीची फळे आणि जास्त उत्पादन शक्य.
८) आधुनिक तंत्रज्ञानाचा सहज वापर करता येतो.

अतिघन लागवडीचे तोटे :
१) फळबाग उभारणीस सुरुवातीला जास्त खर्च लागतो.
२) बागेचे आयुष्यमान तुलनेने कमी.
३) झाडाचे घेर नियंत्रण थोडे खर्चिक होते.

कलमांचे इनसीटूमध्ये रूपांतर
अ.क्र. --- गुणधर्म --- पारंपरिक पद्धत --- घन लागवड --- अतिघन लागवड
१ --- फळधारणेला सुरुवात --- ७-८ वर्षे --- ५-६ वर्षे --- ३ वर्षे
२ --- पूर्ण उत्पादकतेस सुरुवात (वर्ष) --- १५ --- ८ --- ५
३ --- उत्पादकता --- मध्यम --- चांगली --- फारच चांगली
४ --- छाटणी --- फारच अवघड --- करता येणे सोपे --- फारच सोपी
५ --- फवारणी --- अवघड --- सोपी --- फारच सोपी
६ --- फवारणीची परिणामकारकता --- साधारण --- चांगली --- फारच चांगली
७ --- फळांची काढणी --- अवघड --- सोपी --- सोपी व परिणाम कारक हाताने फळे काढणी शक्य
८ --- फळांची प्रत सुधारणा --- अशक्य --- शक्य --- फारच सोपी
९ --- बागेचे आयुष्य (वर्ष) --- ५० --- ३०-३५ --- २०-२५
१० --- उत्पादकता (टन/हे)
०० --- चांगल्या उत्पादक जातीची --- १२ --- १८-२० --- २०-२५
०० --- कमी उत्पादक वाणात --- ६ --- १० --- १०-१२
(संदर्भ : एन. कुमार, कुलगुरू, तमिळनाडू कृषी विद्यापीठ, ‘हाय डेन्सीटी प्लँटिंग इन मँगो’ - ‘ॲडव्हान्स ॲग्रिकल्चरल रिसर्च अँड टेक्नॉलॉजी जर्नल. Vol. III, जानेवारी-२०१९’ पान २५८१-३७४९)

सर्वसाधारण लागवड , घन व अतिघन लागवडीची तुलना
१) आंबा लागवडीसाठी साधारणतः १ × १ × १ मीटरचा खड्डा खोदून भरून घ्यावा लागतो. अतिघन लागवडीत दोन झाडांतील अंतर अतिशय कमी असल्याने खोदकाम यंत्राद्वारे एक मीटर रुंद व एक मीटर खोल नाली खोदून घेता येते. जमीन हलकी असेल, तर ६० टक्के गाळ आणि ४० टक्के नालीतील मुरमाड माती अशा मिश्रणाने भरून घ्यावी.
२) आच्छादन वापर : अतिघन लागवड केलेल्या बागेत दरवर्षी कलमाखालील संपूर्ण सावलीत उसाचे पाचट, वाळलेले गवत, साळीचे तणसाचे आच्छादन करावे. आच्छादन करताना त्यात शिफारशीत कीडनाशक पावडर धुरळावी. त्यामुळे वाळवीचा त्रास होणार नाही. सेंद्रिय पदार्थ उपलब्ध नसल्यास प्लॅस्टिकचे आच्छादन करावे.
३) वारा प्रतिबंधक झाडांची लागवड : कलमांना हिवाळ्याच्या शेवटी फळधारणा सुरू होते. फळांची संपूर्ण वाढ ही भर उन्हाळ्यात होते. या काळात ऊन तसेच गरम हवेपासून बाग व फळांचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती सुरू, महागनी या उंच वाढणाऱ्या वारा प्रतिबंधक वृक्षाची लागवड करावी.
४) फळांसाठीची छाटणी : फळधारणा सुरू झाल्यानंतर दरवर्षी बागेत शास्त्रीय पद्धतीने छाटणी करावी. दरवर्षी फळकाढणी होताच झाडांनी छाटणी करावी. छाटणीवेळी शक्यतोवर मागील वर्षाची अर्धी किंवा पूर्ण फूट छाटून घ्यावी. छाटलेल्या ठिकाणी झाडावर बोडो पेस्ट लावावी. नवी पालवी येत असताना पावसाळा सुरू होतो. त्यामुळे पानावर करपा रोग किंवा पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव ओळखून नियंत्रण करावे.
५) कलमांना वळण ः लागवडीनंतर कलमांना शिफारशीप्रमाणे खत, पाणी द्यावे. प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीड, रोगनियंत्रण करावे.
कलम दीड ते दोन फिट उंचीचे होईपर्यंत एकच खोड राहू द्यावे. नंतर शेंडा मारावा. त्या ठिकाणाहून ३ ते ४ फांद्या निघतील.
त्यातील चांगल्या व भरघोस तीन फांद्या ठेवाव्यात. परत त्या फांद्यांना दोन ते तीन पेरांनंतर शेंडा मारावा. अशा प्रकारे कलमांचा सांगाडा तयार करून घ्यावा. सांगाडा तयार झाल्यानंतर तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला कलमांची चांगली वाढ होऊन त्यावर भरपूर मोहोर येतो.
-----------------
डॉ. भगवानराव कापसे, ८३२९६७६८७१
ई-मेल - bmkapse@gmail.com
(गटशेती प्रणेते तथा तज्ज्ञ संचालक, महाकेसर आंबा बागायतदार संघ)


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com