Kesar Mango Management : केसर आंबा बागेत काटेकोर व्यवस्थापनावर भर

Mango Farming : परभणी येथील अमनदीप खुराणा यांनी १५ एकर क्षेत्रावर केसर आंब्याची लागवड केली आहे. काटेकोर व्यवस्थापनातून गेल्या तीन वर्षांपासून दर्जेदार केशर आंबा उत्पादन घेत आहेत.
Mango Orchard
Mango OrchardAgrowon

Mango Orchard Management :

शेतकरी नियोजन

पीक : केसर आंबा

शेतकरी : अमनदीप खुराणा

गावः पिंगळी ता. जि. परभणी

केसर आंबा : १५ एकर

एकूण कलमे : १२००

परभणी येथील अमनदीप खुराणा यांनी १५ एकर क्षेत्रावर केसर आंब्याची लागवड केली आहे. काटेकोर व्यवस्थापनातून गेल्या तीन वर्षांपासून दर्जेदार केशर आंबा उत्पादन घेत आहेत.

खुराणा यांची परभणी शहरापासून ८ किलोमीटर अंतरावरील पिंगळी व तट्टूजवळा शिवारात १२५ एकर शेती आहे. एकूण जमीनधारणा क्षेत्रापैकी १५ ते २० एकर जमीन चोपण प्रकारची आहे. सिंचनासाठी ५ विहिरींची सुविधा आहे.

तसेच जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी सिंचनासाठी वापरले जाते. बदलत्या हवामान स्थितीत पिकांची उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी १५ ते २० एकर क्षेत्र फळपिकांखाली आणले आहे. त्यात केसर आंबा आणि पेरू या प्रमुख फळपिकांचा समावेश आहे.

Mango Orchard
Mango Orchard : केसर आंबा बागेतील मोहोर संरक्षण

केसर आंबा लागवड

काही वर्षांपूर्वी खुराणा यांच्याकडे आंब्याच्या विविध जातींची २ एकरांवर आमराई होती. परंतु या आमराईतून किफायतशीर उत्पादन मिळत नसल्यामुळे त्यांनी आमराई काढून टाकली.

बाजारपेठेत असलेली मागणी, फळांची विशिष्ट चव, चांगले उत्पादन या बाबी लक्षात घेऊन त्यांनी केसर आंब्याची लागवड करण्याचे ठरविले. त्या काळात २०१६ मध्ये परभणी जिल्ह्यात केसर आंब्याची कलमे उपलब्ध होत नव्हती.

त्यामुळे गुजरात येथून कलमे विकत आणली. दोन कलमांत व दोन ओळींमध्ये २० बाय २० फूट अंतर ठेवत लागवड केली. त्यात एकरी साधारण १०० कलमे बसली. सद्यःस्थितीत त्यांच्याकडे १५ एकरांवर केसरची १२०० कलमे आहेत. उर्वरित लागवडीमध्ये दशहरी तसेच गावरान जातीच्या आंब्याची झाडे आहेत.

सिंचन व्यवस्थापन

किफायतशीर व दर्जेदार आंबा उत्पादनासाठी सिंचन तसेच खत व्यवस्थापन, छाटणी, संजीवकांचा वापर अत्यंत महत्त्वाचा असतो. जून, २०१६ मध्ये केसर लागवड केल्यानंतर सुरुवातीला ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन केले.

सुरुवातीची दोन ते तीन वर्षे कलमांची वाढ चांगली होण्यासाठी सिंचनावर अधिक भर देण्यात आला. सध्या विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी देत आहेत. डिसेंबर, जानेवारीमध्ये फलधारणेस सुरुवात झाल्यावर दर पंधरा दिवसांनी एप्रिलपर्यंत सिंचन केले जाते.

मोहोर व्यवस्थापन

नोव्हेंबरमध्ये मोहोर फुटण्यास तर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून फलधारणा होण्यास सुरुवात होते. तत्पूर्वी बुरशीनाशक व कीटकनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातात. त्यामुळे भुरी रोगास प्रतिबंध होतो. तसेच  तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव देखील नियंत्रित करणे शक्य होते.

मोहोर टिकवून ठेवण्यासाठी नोव्हेंबरमध्ये बुरशीनाशक व कीटकनाशकांची फवारणी केली जाते. डिंक्या रोगामुळे कलमांच्या फांद्या वाळून जातात. त्याचेही व्यवस्थापन करणे आवश्यक असते. मोहोर ते फलधारणा होईपर्यंत ६ ते ७ प्रतिबंधात्मक फवारण्या घ्याव्या लागतात. वेळोवेळी बागेचे निरीक्षण करून कीड-रोगांचा प्रादुर्भाव, आर्थिक नुकसान पातळी या बाबी विचारात घेऊन रासायनिक फवारणीचा निर्णय घेतला जातो.

Mango Orchard
Kesar Mango Management : केसर आंबा बागेत काटेकोर व्यवस्थापनावर भर

छाटणी

दरवर्षी जून महिन्यात आंबा बागेची छाटणी केली जाते. छाटणीमुळे कलमांची वाढ चांगली होण्यास मदत होते. एक वर्षाआड पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केला जातो. त्यामुळे झाडांची योग्य पद्धतीने वाढ होते.

त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झाडाच्या आकारानुसार नत्र, स्फुरद, पालाश (एनपीके) खताच्या २०० ते ५०० ग्रॅम प्रमाणे मात्रा दिल्या जातात. तसेच प्रतिझाड १० ते ५० किलो शेणखत देतात.

काढणी व विक्री

मागील तीन वर्षांपासून आंबा उत्पादन सुरु झाले आहे. दरवर्षी साधारण मार्च ते एप्रिल महिन्यात आंबा काढणीस सुरुवात होते. पहिल्या वर्षी तुरळक उत्पादन मिळाले. सध्या एका आंबा फळाचे सरासरी वजन २०० ते ३०० ग्रॅम इतके भरते. मार्च महिन्यात मार्केटमध्ये केसर आंब्यांना अधिक मागणी असते.

शेतामध्ये माच लावून अमनदीप खुराणा हे स्वतः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वसमत रस्त्यावरील प्रवेशद्वारासमोर बसून आंबा विक्री करतात. दर्जेदार आंबा उत्पादनामुळे ग्राहकांची मागणी वाढली आहे. शहरापासून आंबा लागवड जवळ असल्यामुळे थेट बागेतून ग्राहकांना स्वतःच्या हाताने फळे तोडून खरेदी करता येईल, अशी व्यवस्था देखील खुराणा यांनी केली आहे. त्यामुळे ग्राहक थेट बागेतून आंबे तोडून खरेदी करतात.

आगामी नियोजन

मागील २० दिवसांपूर्वी बागेत आंतरमशागत केली आहे. झाडाच्या आकारमानानुसार १०ः२६ः२६ व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या आहेत. त्यानंतर प्रवाही पद्धतीने सिंचन केले.

सध्या काही कलमांवर मोहोर तर काही कलमांना कैऱ्या लागल्या आहेत. दहा दिवसांनी पुढील सिंचन केले जाईल.

फळमाशीच्या नियंत्रणासाठी फळमाशी सापळे लावले आहेत. फळगळ रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार फवारणी घेतली जाईल.

अमनदीप खुराणा, ७७२१९५०६५६ (शब्दांकन ः माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com