Grape Production Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Production : दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी हवे काटेकोर व्यवस्थापन

पुणे येथे २८ ते ३० ऑगस्ट या काळात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन पार पडले. या वेळी अंतिम दिवशी झालेल्या चर्चासत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

टीम ॲग्रोवन

विषय : द्राक्ष हंगामातील अवशेष निरीक्षण कार्यक्रमाचे अनुभव

युरोपीय देशांनी रासायनिक कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबतचे निकष अत्यंत कडक केले आहेत. त्यामुळे मर्यादांचे पालन करून निर्यातीमध्ये अडचणी येऊ शकतात. याबाबत द्राक्ष संशोधन केंद्राने द्राक्षातील अंश नियंत्रित करण्यासाठी प्रपत्र ५ (अनेक्श्‍चर ५) तयार केले आहे. त्यात शिफारस केलेली यादी सतत आपल्या हाताशी असली पाहिजे. प्रत्येक वापरावेळी कीडनाशकांचा योग्य प्रमाणात काटेकोरपणे वापर करणे गरजेचे आहे. कीडनाशक शिफारशीत प्रमाणापेक्षा अधिक मात्रेने वापरल्यास द्राक्षात कमाल मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक अंश येऊ शकतात. तसेच काढणीपूर्व कालावधी वाढण्याची शक्यता असते. प्रत्येक घटकाचा काढणी पूर्व कालावधी जाणून घ्यावा. कोणत्याही जैविक घटकांचा वापर करताना त्यांचे अंश राहत नसल्याची एकदा तरी तपासून खात्री करावी. २००४ पासून आजपर्यंत रासायनिक अंश नियंत्रण कार्यक्रमात द्राक्ष पिकात मोठे बदल झाले. त्यानंतर २६९ प्रकारच्या रसायनांची तपासणी केली जात आहे. त्यानुसार शासनाला तसे कळवून निर्यातसंबंधी उपयुक्त लेबल क्लेमनुसार व्यवस्थापन केल्यास गुणवत्तेची हमी प्रदान करता येणार आहे.

- डॉ. कौशिक बॅनर्जी, प्रमुख शास्त्रज्ञ,

कृषी रसायन विज्ञान, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे

विषय : द्राक्ष प्रक्रिया, द्राक्षांचे मूल्यवर्धन उत्पादने आणि विपणन धोरण

अनेक वेळा गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. अशा वेळी द्राक्षावर प्रक्रिया करून निर्यातक्षम उत्पादने तयार करण्याच्या व्यवसायामध्येही मोठ्या संधी उपलब्ध आहेत. सध्या द्राक्षापासून नावीन्यपूर्ण उत्पादने बनविण्यासंदर्भात संशोधन आणि विकासाचे काम सुरू आहे. उदा. फ्रिज ड्राइड द्राक्ष, हॅण्ड क्राफ्टेड चॉकलेट्स, व्हॅक्यूम आधारित बिस्किट्स, व्हॅक्यूम फ्राइड द्राक्ष उत्पादने, द्राक्ष रस, जाम, जेली, चटणी, मुखवास इ. उत्पादनांना ग्राहकांची चांगली मागणी आहे. त्यातून नव्या बाजारपेठाही मिळू शकतील. त्यासाठी सुरुवातीच्या काळात थोड्या प्रयत्नांची गरज आहे.

- डॉ. अभय शेंड्ये, फळ प्रक्रिया तज्ज्ञ

विषय : द्राक्षवेलीमध्ये प्रकाशाची गरज आणि त्याचे व्यवस्थापन

द्राक्षवेलीच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. किंबहुना, द्राक्षांचे दर्जेदार उत्पादन हे प्रकाश संश्‍लेषणासाठी उपलब्ध प्रकाशचे प्रमाण आणि गुणवत्तेवर अवलंबून असते. सावलीमध्ये येणाऱ्या वेलीत प्रकाश संश्‍लेषण कमी होते. अशा ठिकाणी कीड आणि रोगांची समस्याही वाढते. द्राक्ष मण्यांचा रंग विकसित होत नाही. यासह विविध जैव रासायनिक प्रक्रियेचा वेग मंदावतो. प्रकाशाच्या तीव्रतेमधील दैनंदिन फरकामुळे प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया आणि कार्बन डायऑक्साइडचे स्थिरीकरण कमी जास्त होते. त्यामुळे इतर मेटाबोलाइट उदा. शर्करा आणि सेंद्रिय आम्लाचे उत्पादन कमी होते.

- डॉ. नि. आ. देशमुख, प्रमुख शास्त्रज्ञ,

फळ विज्ञान, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे

विषय : नावीन्यपूर्ण फॉस्फेट तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन सुधारणा

प्रत्येक पिकात फॉस्फेट हे प्राथमिक अन्नद्रव्य असून, त्याच्या कमतरतेमुळे वेलीच्या पानांचा रंग बदलतो. तसेच विविध लक्षणे दिसून येतात. वेळीच या अन्नद्रव्यांची उपलब्धता केल्यास पिकांची वाढ चांगली होते. द्राक्षांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी फॉस्फेट तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत शक्य होते. या घटकाची कमतरता असल्यास फळधारणेवर परिणाम होतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. आगामी काळात पाणी टंचाई हे आव्हान आहे. सिंचनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अलीकडे सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर वाढला आहे. मात्र त्यातून विद्राव्य खतांचे योग्य व्यवस्थापन न केल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाही. अलीकडे आपण पिकांना खते देण्याऐवजी जमिनीला देतो. त्यामुळे एकूण दिलेल्या खतांपैकी ७९ टक्के मात्रा वाया जाते. मात्र पॉली फॉस्फेटच्या वापरातून वेळ, श्रम व पैशांची बचत होते. वेळीच अन्नद्रव्यांची उपलब्धता झाल्यामुळे पिकाचे आरोग्य, अन्नग्रहण क्षमता वाढते. पर्यायाने उत्पादनही वाढते.

-डॉ. डेव्ह पिंक्सटेरॉन, बेल्जियम

विषय : हवामान अंदाजानुसार व्यवस्थापन

शेतकऱ्यांना हवामान बदलांचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच हवामान अंदाज व इशारे मिळायला हवेत. त्यानुसार शेतकऱ्यांचे आगामी नियोजन ठरवता येईल. विशेषतः द्राक्षासारख्या प्रचंड उत्पादन खर्च असलेल्या पिकांच्या बाबतीत होणारे नुकसानही मोठे असते. प्रत्येक संभाव्य नुकसान कशा प्रकारे टाळता येईल, या दृष्टीनेच हवामान अंदाजांची अचूकता असली पाहिजे. शासनाकडून जिल्हे व तालुकानिहाय हवामानाचे किमान पुढील ४८ तासांचे अंदाज त्वरित उपलब्ध झाले पाहिजे. त्यासाठी ‘वेदर चॅनेल’ असणे गरजेचे आहे. ही बाब ३० वर्षांपूर्वी मी स्वतः अमेरिकेत पाहिली होती. ३० वर्षांनंतर भारत म्हणून आपण तशी व्यवस्था उभी करू शकलो नाहीत. द्राक्षासारख्या निर्यातक्षम आणि उच्च मूल्य असलेल्या पिकांमध्ये सर्वांनीच अत्यंत दक्षतेने आणि काटेकोरपणे काम करण्याची आवश्यकता आहे.

भविष्यात अतिवृष्टीमुळे नुकसान होण्याची शक्यता वाढत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञांमध्ये आहे. त्यानुसार आपले भविष्यातील नियोजन असले पाहिजे. परिस्थितीला अचूक हवामान अंदाजाची जोड देणे, अंदाज वेळीच पोहोचवणे, त्यासंबंधी काम करणारी आपत्ती व्यवस्थापन सदृश यंत्रणा कृषी विभागातही कार्यरत होणे आणि एखाद्या परिस्थितीमध्ये शासनासह शेतकऱ्यांतील प्रत्येक घटकांने कसे वागावे, याची एक कृती योजनाही तयार असावी. याची सुरुवात सर्वात प्रगतीशील राज्य असलेल्या महाराष्ट्रातून व्हावी, असेच वाटते.

- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ

विषय : द्राक्षामध्ये सोर्स : सिंक संबंधाचा उत्पादनावर होणारा परिणाम

द्राक्ष बागेत कॅनॉपी व्यवस्थापन महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर घड वाढ व गुणवत्ता प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरते. द्राक्ष बागेत वेलीवर घडांची संख्या अधिक असल्यास वेलीमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांचा वापर अधिकाधिक होतो. घडांची वाढ योग्य प्रमाणात न होता ते लहान राहतात. त्यामुळे वेलीचे आकारमान पाहून द्राक्ष घडांची संख्या निश्‍चित करणे महत्त्वाचे ठरते. निर्यातीकरिता प्रति दीड वर्गफूट क्षेत्रफळाकरिता एक घड, तर स्थानिक बाजारपेठेकरिता प्रति वर्ग फूट या प्रमाणात पाऊण ते एक घड असे नियोजन असावे. बेदाणा निर्मितीसाठी प्रति वर्गफूट २ ते २.५ द्राक्षघड ठेवावेत. उर्वरित घड काढून टाकावेत.

- डॉ. प्रकाश निकुंभे, शास्त्रज्ञ, फळ विज्ञान, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT