Grape Advisory : वाढीच्या अवस्थेनुसार पावसाळी स्थितीतील उपाययोजना

द्राक्ष विभागामध्ये सततच्या पावसामुळे बागेत तापमान कमी होऊन आर्द्रता वाढत आहे. यामुळे काही अडचणी उद्‍भवू शकतात. अशा वेळी बागेत वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांचा विचार करता करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.
Grape Advisory
Grape AdvisoryAgrowon

जुन्या बागेतील समस्या

द्राक्ष काडी (Grape Stem) परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात असताना बागेत जास्त प्रमाणात पाऊस (Heavy Rain In Vineyard) सुरू असल्यास शेंडा वाढ जास्त होईल. यामुळे परिपक्व होत असलेली काडी तशीच हिरवी राहून पुढे पुढे वाढत जाईल. काडी परिपक्व होणार नाही किंवा ती लांबणीवर जाण्याची शक्यता वाढेल. आपल्याजवळ फळछाटणीकरिता कालावधी अजूनही आहे. हा कालावधी काडी परिपक्वतेकरिता जरी पुरेसा असला तरी पावसाचा कालावधी वाढल्यास फळछाटणी संकटात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण कच्च्या काडीमध्ये द्राक्षघड (Grape Fruit) पूर्णपणे विकसित झालेला नसतात. फळछाटणीनंतर या घडांचे रूपांतर एकतर गोळीघडात होते किंवा बाळीमध्ये रूपांतर होते. सततच्या पावसामुळे रोगनियंत्रण (Grape Disease Control) सुद्धा कठीण होत असल्यामुळे बागेत पानगळसुद्धा होऊ शकते. काडी परिपक्वतेसाठी कमी कालावधी असल्यामुळे खालील उपाययोजना कराव्यात.

Grape Advisory
Grapes :उत्पादन खर्च कपातीसाठी करणार आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मार्गदर्शन

शेंडा पिंचिंग त्वरित करावे.

बगलफुटी काढून काड्या मोकळ्या करून तारेवर बांधून घ्याव्यात.

बोर्डो मिश्रणाची एक टक्का प्रमाणे फवारणी करून रोगनियंत्रणात ठेवावा. त्यामुळे पानांची देठाशी असलेली पकड मजबूत राहील. पानगळीची शक्यता कमी होईल.

रंगीत द्राक्षजातीमध्ये बोर्डो मिश्रण फवारणीची संख्या नियंत्रणात असावी. यामुळे पानांवर क्लोराइडची टॉक्सिसिटी टाळता येतील.

बागेमध्ये ५० ते ६० टक्के पानगळ झालेली असल्यास व छाटणी उशीर घेणार असल्यास शेंड्याकडील फुटी थांबवण्याचे टाळून पुन्हा पाच ते सहा पाने वाढू द्यावीत. यानंतर बोर्डो मिश्रणाची एक टक्का तीव्रतेची फवारणी करावी. कोवळ्या पानांवर स्कॉर्चिंग आल्यामुळे अशी पाने मरणार नसली तरी आवश्यक तितके अन्न तयार करणार नाहीत. त्यामुळे काडीमधील अन्नद्रव्याचे नुकसान टळेल व काडीची परिपक्वता मिळवता येईल.

पूर्णपणे पानगळ झालेल्या परिस्थितीत पाच ते दहा दिवस थांबता येईल. त्यापेक्षा पुढे छाटणी ढकलल्यास मागील डोळे आपोआप फुटू लागतील. अशा परिस्थितीतील बागेत डोळे फुगलेले असल्यास हायड्रोजन सायनामाईडचा वापर करून फळछाटणी घ्यावी.

Grape Advisory
Grapes: काडीच्या परिपक्वतेसाठी करावयाच्या उपाययोजना

फळछाटणी केलेल्या बागेतील समस्या

नुकतीच छाटणी झालेल्या बागेत पाऊस सुरू असल्यास घड जिरण्याची समस्या आढळून येईल. फळछाटणीनंतर साधारणतः आठ ते नऊ दिवसांत डोळे फुटायला सुरुवात होऊन पोंगा अवस्था सुरू होते. या अवस्थेत बागेत पाऊस जास्त झालेला असल्यास जमिनीत मुळांच्या कक्षेत पाणी साचलेले असल्यामुळे वेलीत जिबरेलिनचे प्रमाण जास्त वाढते. व सायटोकायनीनची पातळी कमी होऊन अडचणी येतात. या वेळी वाढीचा जोम जास्त असल्यामुळे घड सावकाश बाहेर पडत नाही, तर त्याचे रूपांतर गोळी घडात होते. पावसाळी वातावरणामध्ये दोन ओळींच्या मध्ये असलेली मुळे जास्त प्रमाणात कार्यक्षम होते. मुळांद्वारे तयार केलेली अन्नद्रव्ये व संजीवके वेलीला पुरवते. पाऊस नसलेल्या परिस्थितीत वातावरण जेव्हा कोरडे असते, अशा वेळी वेलीमध्ये सायटोकायनीनची मात्रा वाढत जाते. त्याचा परिणाम म्हणून फुटीची वाढ नियंत्रणात दिसते. अशा परिस्थितीत निघालेले घड सशक्त व जोमदार असतात. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. यावर पुढील प्रकारे उपाययोजना करता येतील.

मुळांच्या कक्षेत पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.

दोन ओळींमध्ये चारी घेऊन बोदातील पाण्याचा निचरा होईल, असे नियोजन करावे.

सायटोकायनीनयुक्त संजीवकांची फवारणी उदा. ६ बीए १० पीपीएम प्रमाणे पोंगा अवस्थेनंतर करून घ्यावे. बऱ्याचदा बागायतदार डोळा फुगत असलेल्या परिस्थितीत संजीवकांची फवारणी दोन पेक्षा जास्त वेळा करतात. डोळ्यावरील आवरण

निघालेले नसेल आणि त्या डोळ्यातून पान बाहेर निघालेले नसल्यास आपण केलेल्या फवारणीच्या द्रावणाचे शोषण होणे शक्य नाही. त्यामुळे केलेली फवारणी व्यर्थ जाते. तेव्हा हीच फवारणी एक ते दोन पान अवस्थेत केल्यास परिणाम चांगले मिळतील. या अवस्थेत अर्धा ते एक ग्रॅम ०-०-५० किंवा अर्धा ग्रॅम ०-९-४६ प्रति लिटर पाणी या प्रमाणे एक ते दोन फवारण्या करता येतील. असे केल्यास पुढील काही दिवसात होणारी जास्त वाढ नियंत्रणात राहू शकेल. जमिनीतून एकरी तीन ते चार किलो ०-९-४६ किंवा ०-४०-३७ ठिबकद्वारे तीन ते चार वेळा विभागून देता येईल.

- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com