Nagar News : पावसाळ्यापासून चांगला पाऊस नसल्याने खरीप गमावला, मात्र सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसाने बऱ्यापैकी पावसाची तूट भरून काढली आहे. प्रशासनाकडे असलेल्या नोंदीचा विचार करता आत्तापर्यंत नगर जिल्ह्यातील ३६ महसूल मंडलांत २ ऑक्टोबरपर्यंतची पावसाची सरासरी ओलांडली आहे.
कोपरगाव महसूल मंडलांत मात्र सर्वांत कमी म्हणजे सरासरीच्या केवळ २९ टक्के पाऊस झाला आहे. संपूर्ण नगर जिल्ह्याचा विचार करता आतापर्यंतच्या सरासरीच्या ७७ टक्के पाऊस झाला.
नगर जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पाऊस नाही. अल्प पावसावर खरिपाच्या पेरण्या झाल्या असल्या, तरी मध्यंतरीच्या काळात पावसाने सुमारे दीड महिना खंड दिला. त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. तूर, मूग, उडीद, बाजरी, मका, सोयाबीनसह कापसाला मोठा फटका बसला. नुकसानीमुळे उत्पादनात घट होणार हे निश्चित झाले.
आता सप्टेंबरमध्ये गणेश उत्सवाच्या काळात बऱ्यापैकी झालेल्या पावसाने काहीशी तूट भरून काढल्याचे नोंदीवरून दिसून येत आहे. नगर जिल्ह्यात ९७ महसूल मंडले असून, २ ऑक्टोबरच्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत ३५ महसूल मंडलांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत ७१०.५ मिलिमीटर सरासरी पाऊस होणे अपेक्षित होते. त्यापैकी आत्तापर्यंत ५४७.१ मिलिमीटर म्हणजे ७७ टक्के पाऊस झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव महसूल मंडलांत सरासरीच्या २९ टक्के तालुक्यात ७० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे अजूनही अनेक भागांत पुरेसा पाऊस नसल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत पावसात पडलेली तूट काही प्रमाणात सप्टेंबर महिन्यातील पावसाने भरून काढली असली, तरी दक्षिणेतील अनेक भागात अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने त्या भागातील नदीनाले तलाव कोरडे आहेत.
पावसाची सरासरी ओलांडलेली मंडले
नालेगाव, सावेडी, कापुरवाडी, केडगाव, भिंगार, चिचोंडी, चास, रुईछत्तीशी, पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, निघोज, टाकळी, पळशी, श्रीगोंदा बेलवंडी, चिंभळा, कोळगाव, मिरजगाव, माही, जामखेड, नायगाव, शेवगाव, बोधेगाव, चापडगाव, माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, मिरी, सलाबतपुर, साकुर, साकीरवाडी, शेंडी, ब्राह्मणवाडा.
खरीप तर वाया गेलाच....
नगर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र असून ६ लाख ६९ हजार ३६२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र यंदा पावसाळ्यापासूनच पुरेसा पाऊस नाही. त्यात मध्यंतरीच्या काळात पावसाने दिलेल्या तुटीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, ८० टक्के खरिपाची पिके वाया गेली आहे.
मागील सप्टेंबरमहिन्यात शेवटच्या दहा दिवसांत बऱ्यापैकी अनेक भागांत पाऊण झाला असला, तरी त्याचा खरिपाला काहीही फायदा नाही. आता पावसाने तूट काही प्रमाणात भरून काढली असली, तरी खरीप तर वाया गेलाच, असे शेतकरी बोलत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.