Snails Outbreak  Agrowon
ॲग्रो विशेष

Snails Outbreak : गोगलगायींनी काढले पोटातले पाय

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : म्हणतात ना, ‘गोगलगाय अन् पोटात पाय’ पण या शंखी गोगलगायींनी आपले पोटातले पाय बाहेर काढणे सुरू केले आहे. गेल्या खरीप व रब्बी हंगामात धुमाकूळ घातला होता. यंदाही खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांना या गोगलगायींनी लक्ष करणे सुरू केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपरी राजा परिसरात तसेच फुलंब्री तालुक्यातील पाल परिसरात या गोगलगायींचा उपद्रव पुन्हा प्रकर्षाने दिसून आला आहे.

गतवर्षाच्या खरीप हंगामात शंखी गोगलगायींनी मराठवाड्यातील जवळपास ५५ हजार २७७ हेक्टरवरील शेती पिकाला दणका दिला होता. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक जवळपास ४८ हजार हेक्टर वरील पिके या गोगलगायींनी फस्त केली होती. याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील ४५७८ हेक्टर, बीडमधील ४७८ हेक्टर, जालन्यातील ३११ हेक्टर, छत्रपती संभाजी नगरमधील १९५ हेक्टर, हिंगोलीतील ६० हेक्टर, परभणीतील ३३ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे गोगलगायींमुळे नुकसान झाले होते.

आता पुन्हा एकदा गोगलगायी शेतकऱ्यांचे पीक फस्त करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचं पिंपरी राजा चितेगाव परिसरातील पाहणीत शंखी गोगलगायीच्या मोसंबी पिकावरील आक्रमणाची नोंद घेतली आहे. पिंपरी राजा येथील गोरखनाथ घोरपडे यांच्या शेतातील कपाशीसह इतर पिकांना गोगलगायींनी लक्ष केले आहे.

याच गावातील बंडू घोरपडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकातही गोगलगायींचा उपद्रव दिसून आला. याशिवाय फुलंब्री तालुक्यातील पाल गाव परिसरातील जाधववाडी शिवारातील साहेबराव गोल्हारे यांच्या शेतातील कोबीच्या पिकालाही शंखी गोगलगायींनी आपले लक्ष केले आहे. गतवर्षी श्री. गोल्हार यांना आपल्या शेतातील वांगी, कोबी, मिरची आदी पिकांचे मोठे नुकसान गोगलगायींच्या उपद्रवामुळे सहन करावे लागले होते.

धाकाने केले नाही मल्चिंग...

फुलंब्री तालुक्यातील पाल येथील जाधववाडी शिवारातील साहेबराव गोल्हारे यांनी गत दोन्ही हंगामांत मल्चिंगवर भाजीपाला पिके घेतली होती. यंदा मात्र केवळ गोगलगायींच्या धाकापाई त्यांनी मल्चिंगवर फायद्याचे असूनही कोबीची लागवड न करण्याला पसंती दिली आहे. गतवर्षी मल्चिंगखाली लपून बसणाऱ्या गोगलगायी रात्रीच्या वेळी पिकावर आक्रमण करून त्याचे नुकसान करत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती.

त्यामुळे यंदा मल्चिंगविना भाजीपाला पीक घेण्याचा निर्णय घेतल्याचे साहेबराव गोल्हारे यांचे चिरंजीव उत्तम गोल्हार यांनी सांगितले. जसा पाऊस सुरू झाला तसा सकाळी उठून गोगलगायी वेचून त्यांना पोत्यात भरून त्यात मीठ टाकून दूरवर फेकून देत आपलं पीक वाचविण्याचा प्रयत्न दोन महिन्यांपासून सुरू असल्याचेही उत्तम गोल्हारे यांनी सांगितले. गाव शिवारातील गिरजा, बाबरा नदीच्या काठावरील शेतात गोगलगायींचा उपक्रम मोठा असल्याचे ते म्हणाले.

शंखी गोगलगायींनी माझ्या शेतातील सोयाबीन, कपाशी, मोसंबी आदी पिकांवर आक्रमण सुरू केले. गतवर्षीही नुकसान झाले होते त्याची भरपाई मिळाली नाही. यंदाही नुकसान होतंय. मोसंबीची फळ, कोवळी पान, खोडाची साल त्या खातात. कपाशीचा कोवळा शेंडा खातात, सोयाबीनचे तर मोठा नुकसान केले.
गोरखनाथ घोरपडेपिंपरी राजा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर

शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन

जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील गोगलगायी व तिची अंडी उघडी पडून सूर्यप्रकाश व नैसर्गिक शत्रूमुळे नष्ट होतील.

गोगलगायी हाताने वेचून मिठाच्या द्रावणात (१ किलो मीठ + ४ लिटर पाणी) टाकून नष्ट करावे.

पावसाळ्यामध्ये सायंकाळी गोणपाट गूळ / मीठ याच्या द्रावणात बुडवून किंवा पपईच्या खोडाचे तुकडे /पानकोबीची पाने गोगलगायी लपण्याच्या संभाव्य ठिकाणी व शेतामध्ये ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी जमा झालेल्या गोगलगायी वेचून मिठाच्या द्रावणात टाकून नष्ट कराव्यात.

चुना किंवा ब्लिचिंग पावडर पिकाभोवती टाकावी. साधारणपणे २-३ इंचांचा पट्टा असावा. ही क्रिया दुपारनंतर करावी आणि पावसाची शक्यता असल्यास करू नये.

मेटाल्डीहाइड २.५ टक्के गोळी शेतामध्ये जागोजागी टाकावे (२-३ गोळ्या/ठिकाणी). १ एकरासाठी २ किलो मेटाल्डीहाइड वापरावे.

गव्हाचे पीठ / भाताचा भुसा (१ किलो) + गुळाचे पाक (२०० ग्रॅम गूळ) + कीटकनाशक (मिथोमिल ४० एसपी २५० ग्रॅम) याचे विषारी आमिष तयार करावे. याचे लहान गोळे करून १० ठिकाणी / एकर ठेवावे.

काटेकोर दक्षता, लोक शिक्षण, कीड जमा करून नष्ट करणे, मेटाल्डीहाइड व विषारी आमिषांचा वापर करून सामूहिक प्रयत्न केल्यास शंखी गोगलगायीचे यशस्वी नियंत्रण होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT