Rajmata Jijau Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review : राजमाता जिजाऊचा एक आश्‍चर्यकारक धांडोळा

Article by Matin Shaikh : एक वैचारिक, राजकीय, पुरोगामी, आधुनिक विचारांचे तत्कालीन कालखंडाचा विचार करता परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. हा दृष्टिकोन इतिहासाच्या पुस्तकात धूसर राहिलेला दिसतो.

Team Agrowon

Rajmata Jijau Book : छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या जिवंतपणीच आख्यायिका बनले होते. त्यांच्या कुशल राज्य कर्तृत्वाच्या जडणघडणीमध्ये त्यांची आई जिजाऊ नावाचा एक भक्कम स्तंभ उभा होता. जिजाऊंनी बाल शिवाजीला रामायण, महाभारतातील शौर्य आणि नीतिकथा ऐकवल्या अन् शिवरायांनी थेट रायरेश्‍वरावर स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला.

जिजाऊंच्या शिवरायांवरच्या संस्काराबद्दल इतक्या मोघम वाक्यांमध्ये पाठ्यपुस्तकातून शिकवले गेल्यामुळे तोच समज सार्वत्रिक होत गेला आहे. मात्र राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या संकल्पक होत्या. ते एक वैचारिक, राजकीय, पुरोगामी, आधुनिक विचारांचे तत्कालीन कालखंडाचा विचार करता परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.

हा दृष्टिकोन इतिहासाच्या पुस्तकात धूसर राहिलेला दिसतो. मराठी जनांच्या मनातील जिजाऊंच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची ही धूसरता कमी करण्याचे काम राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्रकाश पवार यांनी लिहिलेल्या व ‘सकाळ’ प्रकाशनाच्या ‘राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ या पुस्तकाच्या निमित्ताने होऊ शकते.

मध्ययुगीन मराठा इतिहासात जिजाऊंच्या कार्य कर्तृत्वाची मांडणी ही बहुतांश वेळा कथात्मक स्वरूपात झालेली आढळते. मात्र डॉ. प्रकाश पवार हे जिजाऊंचा एकरेषीय जीवनपट मांडण्याऐवजी संशोधन लेखनातून जिजाऊंचे चरित्र मुक्त अवकाशात उलगडत नेतात. हा

चरित्र ग्रंथ जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध छटांचा एकत्रित मिलाप असून, जिजाऊंना केवळ मातृरूपातून बाहेर काढतो. तत्कालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींमध्ये जिजाऊ विवेकी, वैचारिक, तर्कशुद्ध आधारांवर कशा पद्धतीने मार्गक्रमण करत गेल्या यांची नोंद घेतो. लेखकाने या चरित्र ग्रंथाची विभागणी भूमिका, पूर्वसुरी, जडणघडण, समतेच्या मूल्यांची पेरणी, स्वराज्य जडणघडण आणि स्थापना, चिरंतन प्रेरणा : जिजाऊ अशा एकूण सहा भागांत केली आहे.

जिजाऊंच्या ‘सर्वसमावेशक स्वराज्य’ या संकल्पनेमागील प्रेरणांचा धांडोळा घेताना लेखक वडील लखुजी जाधव यांच्याकडून मिळालेला वारसा, सासू उमाबाई यांनी जिजाऊंची केलेली जडणघडण स्पष्ट करतात. त्यातून लेखक स्वराज्याच्या संकल्पनेची मुळे किती खोलवर पसरलेली होती, याचे सूतोवाच करतात.

समाजाभिमुख, पुरोगामी, मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या स्वराज्याच्या मागे नैतिक अधिष्ठान उभे करण्यामध्ये जिजाऊंनी दिलेले नेमक्या योगदानाची चर्चा हे या पुस्तकाचं महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते. जिजाऊंचा राजकीय प्रक्रियेतील सहभाग, त्यांची राजकीय नेतृत्व आणि प्रशासक म्हणून असलेली पात्रता असे गुण हेरून शहाजीराजे त्यांना केवळ पाठिंबाच देत नाहीत, तर एक अधिमान्यता देत असल्याचे लेखक नमूद करतात.

दोन स्वतंत्र बाण्याच्या आणि दूरवर राहणाऱ्या व्यक्तींमध्ये दुरावा शोधत राहणाऱ्या कोत्या मनोवृत्तीला टाळत त्यांच्यातील प्रेम, एकमेकांबद्दलचा आदरभाव व्यक्त करणारी ‘सखा-सखी’ ही अनोखी संकल्पना डॉ. पवार ग्रंथात मांडतात. जिजाऊंनी अनेक अंधश्रद्धा, कालबाह्य परंपरा आपल्या विवेक बुद्धीने नाकारल्या. त्यातूनच हिंदवी स्वराज्यात सामाजिक पुनर्रचनेचा अनोखा प्रयोग साकारला गेला. जिजाऊंच्या सृजनशीलतेला, कृषिजन संस्कृतीला व्यापक करण्याच्या विविध प्रयत्नांच्या नोंदी या ग्रंथात नमूद आहेत.

जिजाऊंच्या ‘जगदंब’ या भक्ती संकल्पनेचा मार्मिक अर्थ आणि न्याय, आत्मबळाची उदात्त चेतना लेखक अधोरेखित करतात. त्यांची भक्ती परंपरा महादेव, वारकरी परंपरेशी कशी जोडली जाते, याचा शोधही घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत चरित्रात दिसतो. जिजाऊंचे कार्य हिंदुत्वाच्या चौकटीत मांडण्याचा मोह यापूर्वी अनेकदा झाल्याचे दिसते. मात्र लेखक या चौकटीच्या बाहेर जाऊन विवेचन करतात. भाषा, धर्म, जातिसंस्था इ. संदर्भात जिजाऊंचा विचार सामाजिक सलोख्याचा असल्याची अनेक उदाहरणे नोंदवतात.

सर्वधर्मसमभाव, धर्म स्वातंत्र्याचा पुरस्कार करत जिजाऊंनी हिंदू - मुस्लिम सलोख्याला अग्रक्रम आणि पाण्यावर सर्व जाती-धर्माच्या लोकांना सामाईक व समान अधिकार देत समतेचा क्रांतिकारी संदेश त्या देत असल्याचे लेखक समोर आणतात. इतिहासात झाकोळले गेलेल्या अनेक संदर्भाचा धांडोळा लेखक घेतो. पितृसत्तात्मक विचार पद्धतीच्या पलिकडे जात जिजाऊंचे आदर्श प्रारूप, वैचारिक जीवनपट मांडण्याचा प्रयत्न डॉ. प्रकाश पवार यांनी या चरित्र लेखनातून केला आहे.

मतीन शेख ९७३०१२१२४६

(लेखक शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्राचे संशोधक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

Agriculture Irrigation Scheme: शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

Post-Harvest Packaging : किरकोळ ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहोचविण्यासाठी पॅकेजिंग

Orchard Farming : नवीन फळझाडांची रोपे, कलमांची निवड

Herbal Processing Business : कोकणात सुगंधी, वनौषधींपासून तेल, पावडर निर्मिती

SCROLL FOR NEXT