Indian Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Pesticides : कीडनाशके अचूक वापराच्या दिशेने एक पाऊल

आयातीच्या कीडनाशकांच्या फॉर्म्यूलेशनसह सक्रिय घटक नोंदणी बंधनकारक केल्याने ते कीडनाशक नेमक्या कोणत्या पिकावरील कोणत्या किडीसाठी परिणामकारक आहे, याची माहिती मिळेल.

Team Agrowon

भारतात कीडनाशकांची बाजारपेठ (Pesticides) मोठी आहे. या उद्योगात (Market) सातत्याने वाढत होत आहे. २०२२ मध्ये कृषी रसायने उद्योग ८ ते १० टक्क्यांनी वाढला. चांगल्या पाऊसमानाने देशभर वाढलेले पिकांचे क्षेत्र आणि बदलत्या हवामानात (Change Weather) पिकांवर वाढलेला कीड-रोगांचा प्रादुर्भाव हे त्या मागील कारण आहे.

काही स्वदेशी कंपन्याही कीडनाशकांसह इतर शेती उपयोगी रसायनांची निर्मिती करीत असल्या तरी आपण वापरत असलेली बहुतांश कीडनाशके, तणनाशके, वाढ रोधके-प्रवर्तके, संजीवके, शक्तिवर्धक (टॉनिक्स) यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा दबदबा आहे.

त्यामुळे त्यांची आयातच आपण मोठ्या प्रमाणात करतो. महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत आपण तयार कीडनाशकांचे फॉर्म्यूलेशन त्यांच्यातील ‘टेक्निकल ग्रेड’, अर्थात सक्रिय घटकाच्या नोंदणीशिवाय आयात करीत होतो. त्यामुळे आयात केलेल्या कीडनाशकांमधील सक्रिय घटक आपल्याला माहीत राहत नव्हते. सक्रिय घटक माहीत नसल्यामुळे त्यांची देशात निर्मितीवरही मर्यादा येत होत्या. यातून काही ठरावीक कंपन्यांची या उद्योगात मक्तेदारी वाढत चालली होती.

भारतीय कीडनाशके उद्योगाला यामुळे चालना मिळत नव्हती. अनेक वेळा आयातदारांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, पिळवणूकही होत होती. या सर्व बाबी भारतीय कीडनाशके उत्पादक व फॉर्म्यूलेशन उत्पादने संघटना (पीएमएफएआय) २०११ पासून केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या लक्षात आणून देत होते. शिवाय ‘केंद्रीय कीडनाशके बोर्ड व नोंदणी समिती’कडे (सीआयबीआरसी) आयात होत असलेल्या कीडनाशकांच्या सक्रिय घटकाच्या नोंदणीबाबत पाठपुरावादेखील करीत होते.

एक दशकानंतर त्यांना याबाबत यश आले असून, येथून पुढे आता फॉर्म्यूलेशनयुक्त कीडनाशकांबरोबर त्यातील सक्रिय घटकाची नोंदणीदेखील आता बंधनकारक करण्यात आली आहे. या देशातील कीडनाशके उद्योग, तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय असून, त्याचे स्वागतच करायला हवे.

भारत देशात आजही कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यांचे वेळेत नियंत्रण होऊ न शकल्यामुळे पिकांच्या उत्पादनात १५ ते २५ टक्क्यांपर्यंत घट आढळून येत. देशात परिणामकारक कीडनाशके निर्मितीचा अभाव, आयातीच्या कीडनाशकांबाबतची संदिग्धता शेतकऱ्यांना कीड-रोगाची ओळख वेळीच न पटणे, बाजारात बनावट, भेसळयुक्त कीडनाशकांचा सुळसुळाट, कीड-रोग नियंत्रण मार्गदर्शनात कृषी सेवा केंद्र चालकांची आघाडी, अनेक वेळा त्यांच्याकडून चुकीच्या कीडनाशकांची, त्यांच्या प्रमाणाची शिफारस अशी अनेक कारणे उत्पादनातील घटीमागे आहेत.

विशेष म्हणजे कीडनाशकांच्या अनियंत्रित वापराचे दुष्परिणामही शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. आता आयातीच्या कीडनाशकांच्या फॉर्म्यूलेशनसह सक्रिय घटक नोंदणी बंधनकारक केल्याने ते कीडनाशक नेमक्या कोणत्या पिकावरील कोणत्या किडीसाठी परिणामकारक आहे, याची माहिती मिळेल. त्यामुळे कीड-रोगांचे अचूक नियंत्रण शेतकऱ्यांना करता येईल.

एकाच परिणामकारक फवारणीने त्यांचा खर्च, वेळही वाचेल. कीड-रोगांमुळे उत्पादनात होत असलेली घट काही प्रमाणात भरून काढता येईल. परंतु यासाठी देशातील शेतकऱ्यांचे योग्य प्रबोधनदेखील होणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विस्तार यंत्रणेने पुढाकार घेतला पाहिजे.

कीडनाशकांचे फॉर्म्यूलेशन करताना सक्रिय घटकांबरोबर फवारणी परिणामकारक होण्यासाठी इतरही अनेक सहायक घटकांचा (ॲडज्युव्हंट) वापर होतो. हे घटकही शेतकऱ्यांसह कीडनाशकासंबंधी सर्वांना माहीत असायला पाहिजेत. त्यामुळे अशा सहायक घटकांची नोंदणीदेखील बंधनकारक करायला पाहिजेत.

दरम्यान, आयातीच्या कीडनाशकातील सक्रिय घटकांची माहिती मिळाल्याने अशी कीडनाशकांची निर्मिती आपल्या देशातदेखील करता येऊ शकते. परंतु यासाठी देशी उद्योजकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे त्यांना इतर अनेक पायाभूत सुविधा, भागभांडवल पुरविण्यासाठी केंद्र सरकारने देखील पुढे यायला पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT