Nashik News : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या नाहीत, तर काही ठिकाणी झाल्या त्या पावसाअभावी जळून गेल्या. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात फक्त सिन्नर, येवला व मालेगाव तालुके दुष्काळी यादीत आले.
मात्र नांदगाव तालुका नसल्याने आमदार सुहास कांदे यांनी सरकार विरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका जाहीर केली होती. अखेर तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. अखेर जिल्ह्यातील ४६ महसूल मंडले गुरुवारी (ता.९) दुष्काळसदृश म्हणून घोषित करण्यात आली आहेत
मंत्रालयात नैसर्गिक आपत्तीमध्ये आपद्ग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची गुरुवारी (ता. ९) बैठक झाली. यात हा निर्णय झाला. दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार ज्या तालुक्यात मध्यम अथवा गंभीर दुष्काळी परिस्थितीची शक्यता संभवते, अशा ४० तालुक्यांमध्ये यापूर्वीच ट्रिगर २ लागू झाला आहे. त्यानुसार यापूर्वीच ४० तालुक्यांतील २६९ महसुली मंडळांत दुष्काळ लागू झाला. त्यात नाशिक जिल्ह्यातील येवला, सिन्नर व मालेगावचा समावेश झालेला होता.
बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष आणि मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, ‘रोहयो’मंत्री संदीपान भुमरे याबरोबरच संबंधित विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही पाऊस न आल्याने कापूस, मका, कांदा, भुईमूग, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जमिनीतील पाणीपातळीत घट झाली. खरीप हंगामातील संपूर्ण पिके वाया गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
अनेक गावांना टँकरने पाण्याचा पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झाली. या ४६ महसूल मंडलांचा दुष्काळसदृश म्हणून समावेश करण्यात आला आहे. या महसुली मंडलांतील गावांना दुष्काळी भागातील गावांसाठी देय असलेल्या सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
तालुका समाविष्ट झालेले महसूल मंडळ
निफाड लासलगाव, देवगाव, नांदूरमध्यमेश्वर,
निफाड चांदोरी, रानवड, पिंपळगाव बसवंत, सायखेडा, ओझर
नांदगाव नांदगाव, मनमाड,
वेहेळगाव जातेगाव, हिसवळ बुद्रुक
नाशिक नाशिक, देवळाली, पाथर्डी, माडसांगवी, मखमलाबाद, शिंदे, सातपूर, गिरणारे
कळवण कळवण, नवी बेज, मोकभणगी, कनाशी
बागलाण सटाणा, नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, वीरगाव, मुल्हेर
चांदवड चांदवड, रायपूर, दुगाव, वडनेरभैरव, वडाळीभोई, दिघवद
देवळा देवळा, लोहोणेर, उमराणे
नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर होती त्यामुळे येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता,अखेर त्याकडे शासनाने लक्ष दिले आहे. नांदगाव तालुक्यातील आठपैकी पाच महसुली मंडळांचा दुष्काळसदृश म्हणून समावेश करण्यात आला आहे. इतर तीन मंडळांचाही समावेश होण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील यांना विनंती केली आहे.प्रशासनाऐवजी मी स्वतः मंत्र्यांच्या बैठकीत तालुक्यातील स्थितीचा वास्तववादी आढावा सादर केला.- सुहास कांदे,आमदार,नांदगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.