Jalgaon News : शेतकऱ्यांमधील रोष, आंदोलन आणि विविध पुराव्यांची चौकशीअंती विमा कंपनीने जिल्ह्यातील १० हजार ६१९ केळी विमाप्रस्तावांपैकी ३८५६ विमाप्रस्ताव अखेर मंजूर केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने याबाबतची माहिती दिली.
विमा कंपनीने २०२२-२३ मध्ये हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव योग्य चौकशी न करता नामंजूर केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. १० हजार ६१९ शेतकऱ्यांचे केळी विमा प्रस्ताव नामंजूर झाले होते. याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष होता.
चार वेळेस शेतकऱ्यांनी आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी या प्रश्नावरून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारास कुलूप ठोकले होते. सकाळी ११ ते सायंकाळी पाच यादरम्यान उग्र आंदोलन झाले होते. राज्य शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. या सर्व बाबींची दखल घेऊन प्रशासनाने बैठक घेतली.
या बैठकीत शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, किरण गुर्जर, डॉ.सत्वशील पाटील, विनोद धनगर, सय्यद देशमुख आदी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, विमा कंपनीचे प्रतिनिधी राहुल पाटील आदी उपस्थित होते. यावल, रावेर, चोपडा व मुक्ताईनगर या तालुक्यांतील सात हजार १९१ शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव नामंजूर होते.
यातील पाच हजार २३५ शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज पुराव्यांसह दाखल झाले होते. यातील ३८५६ शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज विमा कंपनीने मंजूर केले आहेत. रावेरात एकूण चार हजार ४८५ केळी विमाधारकांचे प्रस्ताव नामंजूर केले होते. यातील तीन हजार ८१९ शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दाखल केले होते. यातील दोन हजार ३७० शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज मंजूर झाले आहेत.
चोपड्यातील एक हजार ५१८ शेतकऱ्यांचे प्रस्ताव नामंजूर होते. यातील एक हजार ३९ शेतकऱ्यांचे प्रस्ताव तक्रार अर्जांची छाननी करून मंजूर केले आहेत. यावलमध्ये ११८३ केळी विमाधारकांचे प्रस्ताव नामंजूर होते. यातील ६७१ शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. यातील ४३५ विमाधारकांचे प्रस्ताव चौकशीअंती मंजूर करण्यात आले आहेत. मुक्ताईनगरात ६५५ प्रस्ताव नामंजूर होते. यात ४५५ विमाधारकांचे तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. यातून ३२५ प्रस्ताव छाननीअंती मंजूर झाल्याची माहिती विमा कंपनीसह प्रशासनाने बैठकीत दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.