सुनील तांबे
Tribal Afforestation Project: अरुणाचल प्रदेशातील एका नापिक वैराण जमिनीच्या पट्ट्यावर जंगल उभारण्याची कल्पना एक रेंज फॉरेस्ट ऑफिसरने मांडली. ते आव्हान ३५ बोडो तरुणांनी स्वीकारलं. तब्बल वीस वर्षांनंतर तिथे एक घनदाट जंगल उभं राहिलं आहे. हत्ती, हरणं, बिबटे, रान मांजरं अशा अनेक प्राण्यांचा तो अधिवास झाला आहे. हातावर पोट असणारी गरीब माणसं केवळ झाडांवरच्या प्रेमामुळे असा चमत्कार घडवतात.
विलुप दाएमारी हे या जंगल व्यवस्थापनाचे जनरल सेक्रेटरी. ही झाडं जेव्हा मोठ्ठी होतील आणि त्यांची कापणी होईल त्या वेळी एकूण उत्पन्नाच्या ६० टक्के रक्कम या शेतकरी गटाला आणि ४० टक्के वन विभागाला, असा करार झाला आहे. परंतु आम्हाला ही झाडं कापायची नाहीत, पोटच्या मुलांप्रमाणे आम्ही त्यांना वाढवलं आहे, ते सांगतात.
मी सध्या एका शैक्षणिक प्रकल्पाच्या निमित्ताने अरुणाचल प्रदेशातील वेस्ट कामेंग जिल्ह्यात वास्तव्यास आहे. आसाममधील उदालगुडी जिल्ह्याच्या उत्तरेला भूतान आणि अरुणाचल प्रदेशाची हद्द भिडली आहे. भूतान आणि अरुणाचल प्रदेश डोंगराळ आहेत. आसामच्या सरहद्दीपासून त्यांच्या टेकड्यांची उंची वाढू लागते आणि हवामान थंड होऊ लागतं. मॉन्सूनचे वारे मेघालयाचं पठार पार करून आसामात पोचतात. या वाऱ्यांची गंमत अशी की त्यांना अडथळा झाला की ते उंच जाऊ लागतात. आणि उंच गेल्यावर म्हणजे थंड वातावरणात गेल्यावर त्यांची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. पाऊस कोसळू लागतो. म्हणून तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नेपाळ, भूतान, अरुणाचल प्रदेशात ढगफुटी होते.
भूतान आणि अरुणाचल प्रदेशातून येणाऱ्या नद्या वेगाने खाली येतात आणि मातीची धूप जोरदार होते. फक्त रेती, दगडगोटे उरतात. मोठ्ठाल्या शिळा. धानसरी नदीमुळे वरच्या बाजूला जोरदार धूप होते. जंगलानंतर उघड्या, नापिक जमिनीचा पट्टा दिसतो. या वैराण जमिनीवर जंगल उभारण्याची कल्पना एका रेंज फॉरेस्ट ऑफिसरने मांडली. आणि ३५ बोडो तरुणांनी ते आव्हान स्वीकारलं. संयुक्त वन व्यवस्थापन या कार्यक्रमाखाली हा प्रकल्प सुरू झाला. या प्रदेशातील वनस्पतींची, त्यातही विविध प्राणिपक्ष्यांचं अन्न असलेल्या वनस्पती आणि झाडं लावायची असं ठरलं. उदा. बांबूची बेटं हत्तींना खूप प्रिय असतात.
हे काम सुरू झालं २००३ मध्ये. त्या वेळी हे सर्व ३५ तरुण ऑल बोडो स्टुडंट युनियनचे सभासद होते. वन विभागाने रोपं पुरवली. ती लावण्याचं काम करण्यासाठी या ३५ तरुणांना आणि गावकऱ्यांना मजुरी मिळाली. मात्र केवळ मजुरी मिळाली म्हणून झाडं रुजत नाहीत, टिकत नाहीत. त्यांचं संगोपन करावं लागतं. गाई, बकऱ्या त्या परिसरात चरायला जाणार नाहीत, लोक तिथलं गवत कापणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागते. साडेचारशे हेक्टर जमिनीवर या तरुणांनी पोटच्या पोरासारखी माया केली. आसपासच्या गावकऱ्यांमध्ये अनेक अफवा पसरल्या, उणीदुणी काढण्यात आली. कधी गाईगुरं त्या जमिनीत घुसवायची तर कधी आग लावायची, असे उपद्व्याप सुरू झाले. हे ३५ लोक पाठीवर पाण्याच्या टाक्या घेऊन धावत वणव्याच्या ठिकाणी जाऊन स्प्रेअरने पाणी शिंपडून आग आटोक्यात आणायचे.
तब्बल वीस वर्षांनंतर तिथे एक घनदाट जंगल उभं राहिलं आहे. हत्तीही तिथे येऊ लागले आहेत. हरणं, बिबटे, रान मांजरं असे इतर अनेक प्राण्यांचा तो अधिवास झाला आहे. अगदी गरीब, हातावर पोट असणारी माणसं केवळ झाडांवरच्या प्रेमामुळे असा चमत्कार घडवतात. विलुप दाएमारी हे या जंगल व्यवस्थापनाचे जनरल सेक्रेटरी. माझ्याशी बोलताना त्यांनी कोणत्याही बाता मारल्या नाहीत, बढाया तर दूरची गोष्ट. आम्ही शेतकरी आहोत त्यामुळे आम्हाला हे जमलं, झाडांनाही माया लागते असं ते म्हणाले. ही झाडं जेव्हा मोठ्ठी होतील आणि त्यांची कापणी होईल त्या वेळी एकूण उत्पन्नाच्या ६० टक्के रक्कम या शेतकरी गटाला मिळेल आणि ४० टक्के वन विभागाला, असा करार झाला आहे. परंतु आम्हाला ही झाडं कापायची नाहीत, पोटच्या मुलांप्रमाणे आम्ही त्यांना वाढवलं आहे, ते मला म्हणाले. मग सध्या तुमचं उत्पन्नाचं साधन काय, असं विचारल्यावर ते बोलते झाले.
‘‘आमची स्थिती जाळ्यात अडकलेल्या मासोळीसारखी झालीय. उत्पन्न काहीही नाही सध्या, पण प्रेमामुळे आम्ही जंगल राखतो आहोत. आता पशू चराईला आले तर काही बिघडत नाही, कारण जंगल खूपच वाढलं आहे. मात्र आता टिंबर माफियांची भीती वाटते. ते येतात यांत्रिक करवती, बंदूक आणि ट्रक घेऊन. आमच्या दुचाकी या जंगलात चालूही शकत नाहीत आणि आमच्याकडे फारतर लाठी असते. काही एनजीओ मदत करायला पुढे आल्या आहेत, सीएसआर मधून काही निधी मिळतो,’’ ते सांगतात.
विलुप दाएमारी यांचा तरुण मुलगाही याच कामात आहे. राजकारण्याचा मुलगा राजकारणी होतो ना तसाच आमचा मुलगाही हेच काम करायचं म्हणतो, ते म्हणाले.
या जंगलात त्यांनी एक कॉटेज उभारली आहे, पर्यटकांसाठी. एका रात्रीचे अडीच हजार रुपये. एकच खोली आहे. त्यामध्ये एक मोठ्ठा बेड आहे. माणसं कितीही असली तरी दर एकच. टुरिझममधून पैसे मिळवावे लागतील, कारण आमच्या कार्यालयाचा खर्च तर निघायला हवा. मात्र त्यामुळे जंगलाची नासाडी होणार नाही, याचीही खबरदारी घ्यायला हवी असं आमच्या कमिटीने ठरवलंय, असं त्यांनी सांगितलं.
कमिटीतील जवळपास प्रत्येक व्यक्तीची उपजीविका शेतीवर आहे. मात्र त्यांचे हौसले बुलंद आहेत. कारण कुणालाही सत्तेची- राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक- आकांक्षा नाही. थोडा हैं, थोडे की जरुरत हैं ही त्यांची जीवनदृष्टी आहे. ते सर्व ख्रिश्चन आहेत. म्हणून तर या मानवनिर्मित जंगलाचं नाव आहे- गेटसेमाने जंगल. येशू ख्रिस्ताला अटक होण्यापूर्वी तो ज्या बागेत होता त्याचं नाव त्यांनी जंगलाला दिलं आहे. बोडो अस्मिता आणि ख्रिश्चन धर्मश्रद्धा यांचा हा मिलाप आहे. धर्मश्रद्धेचं हे रूप कमालीचं लोभस आहे.
हिंदू, मुसलमान, बौद्ध, जैन, इत्यादी सर्व धर्मांच्या अनुयायांनी यापासून बोध घ्यायला हवा. मात्र त्यासाठी धर्मावर श्रद्धा हवी. अडचण अशी की अस्मितेसाठी श्रद्धेची नाही तर शत्रूची गरज असते, अशी आधुनिक धारणा आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.