Forest Conservation : देवरायाच करतील वसुंधरेचे संरक्षण

Article by Mandar Mundale : पुणे येथील महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी या संस्थेच्या माध्यमातून सुनील व प्रिया हे भिडे दांपत्य दहा वर्षांपासून देशभरातील देवरायांचा अभ्यास करते आहे. जैवविविधतेने संपन्न, अनेक जलस्रोतांचे उगमस्थान अशा या देवरायांच्या संवर्धन, जागृतीसाठी त्यांनी वाहून घेतले आहे. देवराया हे हवामान बदलावरील उत्तर आहे. नैसर्गिक आपत्तींपासून देवरायाच वसुंधरेचे संरक्षण करू शकतील हाच जणू संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिला आहे.
Vasundhara
Vasundhara Agrowon

Protection of Vasundhra : पुणे येथील सुनील व प्रिया या भिडे दांपत्याने घराच्या तीन हजार चौरस फूट ‘टेरेस’ वर ॲमॅझॉन जंगलातील ‘टेराप्रेटा’ माती तंत्रावर आधारित शेतीचा प्रयोग केला. त्या मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत नेण्यात ते यशस्वी झाले. निस्सीम पर्यावरण प्रेमी अशी या दांपत्याची ओळख आहे.

सुनील व्यवसायाने ‘चार्टर्ड अकाउंट असून पुणे येथील महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. सुमारे दहा वर्षांपासून भिडे दांपत्य देवरायांवर अभ्यास करते आहे. देशातील १०० ते १५० देवराया त्यांनी पालथ्या घातल्या असून, त्यातील ४० ते ५० महाराष्ट्रातील आहेत. देवरायांचे संवर्धन, संरक्षण, त्यांचे महत्त्व व त्याविषयी लोकजागर हा वसा घेऊन त्यांचे अखंड कार्य सुरू आहे.

हवामानबदलावर देवराया हेच उत्तर

हवामानबदलाचे परिणाम आज जग भोगते आहे. शेतशिवारे, गावे, शहरे उष्ण बेटे झाली आहेत. देवरायांचे जतन हे त्यावर प्रभावी उत्तर असल्याचे भिडे दांपत्य म्हणते. त्यांच्यासोबत देवराईचे अवलोकन हा अविस्मरणीय अनुभव असतो. सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसरात मौजे घाटवण गाव आहे. या डोंगराळ भागात श्री. घाटाईदेवी देवस्थान ट्रस्टचे सुंदर मंदिर आहे.

मंदिर परिसरात काही एकरांत घनदाट पसरलेली देवराई आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुराज्य काळ किंवा त्यापूर्वीचा मंदिर व देवराईला वारसा असल्याचे सांगण्यात येते. शंभर, दीडशे किंवा त्याहून अधिक वर्षांपूर्वीचे भव्य वृक्ष येथे एकमेकांना बिलगून उभे आहेत. तीस, चाळीस फूट उंच गगनाला भिडलेल्या या वृक्षांनी आपल्या महावेली, फांद्यांनी आभाळात नक्षीदार छत तयार केलं आहे.

त्यातून देवराईत प्रवेश करायला सूर्यकिरणांनाही संधी शोधावी लागते. उन्हाळ्यात भर दुपारी सूर्य आग ओकीत असताना देवराई बाहेरील भूमी तप्त झालेली असते. अशावेळी देवराईत जमीनभर पसरलेल्या पालापाचोळा रुपी गालीच्यावरून पावले टाकताना थंड, आल्हाददायक वातावरण आणि गर्द सावलीचा अनुभव येतो. आज अनेक प्रदेशांचे वाळवंटीकरण झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर देवराईचे हे विलोभनीय स्वरूप अनुभवताना हवामान बदलावर त्याच उपाय देऊ शकतील याची प्रचिती येते.

Vasundhara
Forest Conservation : अशीही एक ‘जंगल कप स्पर्धा’

देवरायांचे महत्त्व

देशभरात जपल्या गेलेल्या देवरायांचे आजच्या हवामान बदलाच्या काळातील महत्त्व भिडे पती-पत्नी विषद करतात. देव- देवीला वाहिलेले किंवा राखून ठेवलेले वन म्हणजे देवराई. इथली कोणतीही वनस्पती वा कोणते घटक बाहेर नेता येत नाहीत. तसे केल्यास देवीचा कोप होतो अशी श्रध्दा आहे.

मानवी हस्तक्षेपास मनाई असल्यानेच पर्यावरणाचा समतोल कायम राहतो. निसर्गाची सर्वोत्तम परिसंस्था (इकोसिस्टीम) म्हणजे देवराई. त्यास हजारो वर्षांची परंपरा आहे. इथं असंख्य दुर्मीळ, आयुर्वेदिक, वनस्पती, पक्षी, छोटे प्राणी, अन्य सजीव आढळतात. दुष्काळ, अतिवृष्टी, पर्यावरणाची सर्व स्थित्यंतरे इथल्या वृक्षांनी वर्षानुवर्षे अनुभवली आहेत. अजैविक, जैविक ताणांशी लढत उत्क्रांती घडवत अस्तित्व जपले आहे. देवराया शुद्ध ऑक्सिजनची कोठारे आहेत. येथील वातावरण नेहमीच प्रसन्न, उबदार असते. हवामान बदलाची तीव्रता कमी करायची तर देवराईप्रमाणे सर्वत्र ‘ग्रीन कव्हर’ वाढवावे

लागेल. मोट्या प्रमाणात सुरू असलेली वृक्षतोड थांबवावी लागेल. प्रत्येक भौगोलिक हवामान विभागातील देवराई व तेथील जैवविविधता भिन्न असते. ज्या ज्या भागात वनसंपदा वाढवायची

तेथे कोणती झाडे लावावीत याच्या देवराया ‘इंडिकेटर्स’ आहेत. खरं तर देवराईत झाडं लावायची नसतात. पण त्यावरील ताण कमी करायचा तर जंगलातील पद्धतीचा अवलंब होऊ शकतो. जंगलातील ‘कोअर’ झोनमध्ये कोणतीच गोष्ट करण्यास परवानगी नसते. पण ‘बफर झोन’ मध्ये काही गोष्टी आपण करू शकतो. त्यानुसार देवराई परिसरात हवामान बदलात टिकून राहणाऱ्या, तापमान प्रतिकारक वनस्पती लावणे शक्य होईल असे भिडे म्हणतात.

देवराईतील जिवंत झरे

राज्यातील विविध जलस्रोत जानेवारी- फेब्रुवारीपासूनच कोरडेठाक पडायला सुरवात झाली आहे. पाण्याच्या थेंबासाठी वणवण सुरू आहे. अशावेळी घाटाईदेवीच्या देवराईत यंदाच्या रणरणत्या मार्चमध्येही डोंगरउताराच्या दिशेने झुळझुळणारा थंड पाण्याचा झरा पाहायला मिळणे म्हणजे निसर्गाचा लघू आविष्कारच अनुभवणे आहे. भिडे सांगतात, की देवरायांमध्ये दोनशे किंवा त्याहून अधिक वर्षांचा इतिहास असलेले वृक्ष पुरुषोत्तम आहेत.

उंच भागात असलेल्या या महाकाय वृक्षांची मुळे डोंगराच्या पायथ्यापर्यंत खोल पसरत येतात. इथं दरवर्षी पाऊस भरपूर पडतो. हे पाणी वृक्षांची मुळे धरून ठेवतात. खडकांची माती होते. समृद्ध पालापाचोळ्यापासून ह्युमस तयार होतं. जमीन सच्छिद्र होते. पाणी धरून ठेवण्याची खूप मोठी क्षमता तिच्यात असते. हा वाहता झरा या सर्व प्रक्रियेचाच भाग आहे. घाटाईदेवीच्या देवराईतील झऱ्याचं पाणी तिथंच टाकीत साठवून पाइपलाइनद्वारे दुसरीकडील टाकीत नेऊन उपयोगात आणलं आहे. चर काढून पाण्याचा पाट काढला आहे. छोटे जीव, पक्षी त्यावर तहान भागवतात. सेंद्रिय कर्बयुक्त पालापाचोळा पायथ्याशी असलेल्या गावांच्या जमिनी, शेती सुपीक करतो.

पाण्याचे उगमस्थान देवराई

बऱ्याच नद्यांचे वा जलस्रोतांचे उगमस्थान देवराया आहेत. भिडे सांगतात. घोड नदी भीमाशंकर देवराईतून तर मुठा नदी मुठेश्‍वर देवराईतून निर्माण होते. म्हणून देवराया जपणे म्हणजे पाण्याचे नैसर्गिक स्रोत सांभाळण्यासारखे आहे. देवरायांत झाडांबरोबर जलस्रोतांनाही संरक्षण दिले आहे. पुणे जिल्ह्यातील धिसर भागातील देवराईतील (वेल्ह्यापासून १५ किलोमीटर) तलाव पवित्रतेचे अधिष्ठान देऊन जपला आहे. सिक्कीम येथील देवराईतही बुद्धविचारसरणीच्या समुदायाने बुद्धाचा प्रिय तलाव म्हणून त्याचा सांभाळ केला आहे.

Vasundhara
Forest Conservation : जंगलांचे संवर्धन गरजेचे...

जमिनींची सुपीकता जपते देवराई

सेंद्रिय कर्बाने भरपूर मातीत पाणी धरून ठेवण्याची मोठी क्षमता असते. भिडे म्हणतात, की अनेक शेतजमिनींमध्ये सेंद्रिय कर्ब ०.२ ते ०.३ टक्क्यापर्यंतच पाहण्यास मिळतो. पण आम्ही दोन- तीन देवरायांमध्ये तपासलेल्या सेंद्रिय कर्बाचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा जास्त आढळले. या जमिनींनी अनेक वर्षांपासून पालापाचोळ्याशिवाय काहीच खाल्लेले नाही. त्यामुळे हा कर्ब त्याहून जास्त असायला हवा. जमिनीतील लाभदायक सूक्ष्मजीवांच्या प्रजातींवर सखोल संशोधन व्हायला हवे. कारण या वृक्षवल्लीच्या पसाऱ्याला अन्न उपलब्ध करून देण्यात त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. देवराईत रोग- किडींही कमी आढळतात. सूक्ष्मजीव, मित्रकीटकांच्या प्रजाती त्यांच्यावर नियंत्रण मिळवत असतात.

उन्हाळ्यातील हिरवाई

यंदाचा मार्च हा आतापर्यंतचा सर्वांत उष्ण महिना ठरला. याच काळात घाटाईदेवीच्या देवराईत मात्र पाने- फुले, फळांनी लगडलेली वृक्षसंपदा डोळ्यात साठवणं हा वेगळाच आनंद होता. जांभूळ, लेंडी जांभूळ, अंजनी, तोरण, वाटण, गेळा, रामेथा, पांगारा, हिरडा, शिकेकाई, माकडलिंबू, चाफा, फुलराणी, आंबुळकी, डेंड्रोबियम, चंदा, तिफण, भोमा, फणस, हिरडा, रान कडूलिंब, नेचे (फर्न), आंबा, वाळुंज, निरगुडी, गुलाबवेल, करवंद. उंबर, बहावा, अळू अशी ही विविधता होती. श्री. घाटाईदेवी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष तानाजी भगत म्हणाले, की पिढ्यान् पिढ्या जपलेली ही वनसंपदा टिकवणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. सोमनाथ भगतही इथे ४७ वर्षांपासून सेवा देत आहेत.

तरुणांसाठी विशेष जागृती

हवामान बदलाविषयी आजची पिढी विशेष जागरूक आहे. म्हणूनच देवराया वाचविण्यासाठी त्यांच्यात आवड निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. हवामानाच्या नोंदी घेणाऱ्या काही उपकरणांचा वापर आम्ही युवा पिढीला करण्यास सांगतो. देवराई आणि त्याबाहेरील तापमान, आर्द्रता यांच्यात खूप फरक असल्याचं ते जेव्हा अनुभवतात त्या वेळी देवरायांकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलते, असे भिडे सांगतात. तरुण, तरुणींनो, गावोगावी जा, देवराया शोधा आणि त्या ‘गुगल मॅप’वर आणा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

‘मिशन देवराई’

‘महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी ने देवरायांच्या संरक्षणासाठी २०१४ मध्ये ‘मिशन देवराई’ उपक्रम सुरू केला. संस्थेचे संस्थापक डॉ. व्ही. डी. वर्तक, कै. माधवराव गाडगीळ, श्री. द. महाजन, शास्त्रज्ञ के. सी. मल्होत्रा, हेमा साने, डॉ. योगेश गोखले, डॉ. माधवराव गोगटे, गिरीश सोहनी आदी तज्ज्ञांचे यातील कार्य मोलाचे ठरले आहे. वनस्पती अभ्यासक गौरी भावे- सुकुमारन यांचीही मोठी मदत आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष या नात्याने भिडे सांगतात की देवरायांचे जतन होण्यासाठी त्यांचा ठावठिकाणा शोधण्यास सुरवात केली.

वन विभागाने महाराष्ट्रातील देवरायांचे गणना करण्यासाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ची मदत धेतली. त्यातून १९९६ च्या सुमारास प्रत्येक जिल्ह्यातील देवरायांचा ‘डाटा’ तयार झाला. पण तो कायम ‘अपडेट’ राहणे गरजेचे होते. अनेक भागांतील दुर्मीळ देवराया संपल्याही असण्याचा धोका होता. पण ज्या अस्तित्वात होत्या त्या लोकांना माहीत होण्यासाठी ‘गुगल मॅप’वर येण्यासाठी प्रयत्न सुरू केले. उपग्रह छायाचित्रे, नकाशे व जीपीएस यंत्रणा विषयातील तज्ज्ञ डॉ. अभिजित खांडगे यांनी त्यासाठी मेहनत घेतली. त्यामुळे २०१४ पासून देवरायांची उपग्रह छायाचित्रे, नकाशे व त्यांची स्थित्यंतरे समजू लागली.

शासकीय पातळीवर नोंद

भिडे दांपत्य सांगते, की शासकीय पातळीवर देवरायांची कुठेच नोंद नाही, कायद्यांमध्येही त्यांची व्याख्या नसल्याचे लक्षात आले. साहजिकच त्यांचे संरक्षण, त्यासाठीचे उपाय, व्यवस्थापन या बाबी अस्तित्वात असण्याची शक्यता नव्हती. शासनाच्या ‘रिजनल प्लॅन’मध्ये देवराई यायला हवी असे वृक्ष संवर्धिनीचे प्रयत्न सुरू होते. तरच विशिष्ट वास्तू, ठिकाणांना जसे कायदेशीर संरक्षण मिळते तसे ते देवरायांना मिळणार होते.

जुन्नर येथे वन विभागात कार्यरत व संस्थेचे डॉ. गोगटे यांचे विद्यार्थी अरविंद आपटे यांच्या पुढाकारातून २०१७- १८ च्या दरम्यान देवराई सर्वप्रथम वनविभागाच्या ‘वर्किंग प्लॅन’ आली. त्याचबरोबर आज आमच्या प्रयत्नांतून १५ ते २० देवराया ‘गुगल मॅप’वर आल्याचे सांगताना भिडे यांचा ऊर अभिमानाने भरून येतो. भारतात सुमारे लाखभर तर राज्यात शासनाच्या अहवालानुसार तीन हजार सातशेपर्यंत देवराया आहेत. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील ५५ गावांतील सर्वेक्षणात लक्षात आले की ‘रेकॉर्ड’पेक्षाही जास्त देवराया आपल्याकडे आहेत. जेवढा भाग दुर्गम तेवढ्या देवराया अधिक असे भिडे म्हणाले. वृक्ष संवर्धिनीने देवराई जागृतीसाठी विविध उपक्रम आतापर्यंत यशस्वी केले आहेत.

सुनील भिडे, ९४२०४८१७५१

missiondevrai@gmail.com

प्रिया भिडे, ९९२२१४६५५५

(भिडे दांपत्य सध्या अमेरिकेत असल्याने व्हॉट्‍सॲप व ई-मेलद्वारे संपर्क साधता येईल.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com